बीड — मांजरसुंबा येथील एक महिला उपचारासाठी बीडच्या आई हॉस्पिटलमध्ये आज सकाळी आली असता डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदरील महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. केवळ आई हॉस्पिटलच्या दुर्लक्षपणामुळे आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू.झाला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
मांजरसुंबा येथील नाझमीन शकील सय्यद वय 21 वर्ष या महिलेला आईव्हीएफ करण्यासाठी बीड येथील आई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांकडून मोठा हलगर्जीपणा झाला. विशेष
म्हणजे या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग नसल्याचे सांगण्यात येते. महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आई हॉस्पिटलमध्ये नाझमीन यांचा दुर्देवी मृत्यू झाला.त्यानंतर त्या महिलेला बीडच्या दीप हॉस्पिटलमध्ये आई हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने दाखल केले. मात्र ती आधीच मृत्यू पावल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी आई हॉस्पिटल व्यवस्थापन आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचे सांगत मृतदेह घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. या ठिकाणी नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन करून डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्राप्त अहवालानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

