परळी — घरात बोलावून घेत तोंडात बोळा कोंबून अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना तालुक्यातील धारावती तांडा येथे घडली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पीडित मुलगी १६ वर्षांची अल्पवयीन असून दोन जणांनी तिला गोड बोलून आपल्या घरी बोलावले.मुलगी घरात जाताच आरोपींनी घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर एका नराधमाने पीडितेचे हात-पाय घट्ट बांधले व ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. यानंतर दोन्ही नराधमांनी तिच्यावर क्रूरपणे लैंगिक अत्याचार केला.
अत्याचारानंतर पीडितेची सुटका करताना नराधमांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला संपवून टाकू, असे म्हणत तिला दहशतीखाली ठेवले. धमकीमुळे प्रचंड घाबरलेल्या मुलीने कशीबशी आपली सुटका करून घर गाठले आणि घडलेला सर्व संतापजनक प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. पालकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली.
पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४, १२७(२), ३५१(२), ३५२, ३(५) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ च्या कलम ४ आणि १७ नुसार गुन्हा रजिस्टर नंबर १२५/२०२६ दाखल केला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून या प्रकरणाचा सखोल तपास अंबाजोगाई उपविभागाचे पिंक पथक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव करत आहेत.

