Sunday, December 14, 2025

अंजली दमानिया नामदेव महाराज शास्त्रींना भेटून मुंडें विरोधात पुरावे देणार !

 बीड — भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री महाराज यांना मुंडे विरोधात पुरावे देणार असल्याचं एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितलं.

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चोहोबाजूंनी आरोपांच्या फैरी झडत असून अजित पवार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.
सर्व बाजूंनी खिंडीत सापडलेले धनंजय मुंडे हे नुकतेच भगवानगडाला शरण गेले. DPDC ची बैठक झाल्यानंतर ते तडक भगवानगडावर मुक्कामी पोहचले. त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. त्यानंतर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचा इशारा दिला. मात्र त्यांच्या या विधानानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ धनंजय मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहीत नसावी. मी धनंजय मुंडेविरोधातील कागदपत्रं महंत शास्त्रींपर्यंत पोहोचवणार ‘ असं अंजली दमानिया म्हणाल्या. नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण केल्यानंतर दमानिया यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीडच राजकारण ढवळून निघालं आहे.या हत्येमध्ये राज्याचे अन्न आणि नागरी
पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही जणांनी केले आहेत. याच मुद्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडूनही सातत्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी भूमिका त्यांच्यासमोर मांडली होती. आता नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण केल्यानंतर टीव्ही9 शी बोलत अंजली दमानियांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया ?

भगवानगड हे आपल्या सर्वांसाठीच एक पवित्र स्थान आहे. आणि अशा ठिकाणाहून पत्रकार परिषद घेणं ,एखाद्या राजकारण्याची पाठराखण केली जावी, ते पाहून मला वाईट वाटलं. आपण कोणीही किंव धनंजय मुंडे असोत, मंदिरात किंवा पवित्र स्थानी जाताना, तिथलं आपलं वागणं वेगळं असतं. त्यामुळे नामदेव शास्त्रींनी त्यांचं ते वागणं बघितलं असेल, पण त्यांची (धनंजय मुंडे) जी दुसरी बाजू आहे ती नामदेव शास्त्रींना कदाचित माहीत नसावी, म्हणूनच त्यांनी असं विधान केलं असावं असं मला वाटतंय, असं दमानिया म्हणाल्या.

मला त्यांना अतिशय आदरपूर्वक सांगायचं आहे, की तुम्हाला जर याची माहिती नसेल तर मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवते. ती सगळी कागदपत्र तुमच्या पर्यंत पोहोचवेन. मुंडेंविरोधात बोलणारे जे लोक आहेत ते कोणत्याही आकसापोटी बोलत नाहीयेत. जी खरी वस्तुस्थिती आहे, तीच दाखवली गेली आहे. परळीत जी दहशत आहे तीच दाखवली गेली आहे. मी जे धनंजय मुंडे विरोधात बोलले ते सुद्धा त्यातलं तथ्य जे आहे, तेच आम्ही सांगितलं आहे. कोणीही त्यामध्ये स्वत:ची मीठ , मिरची लावून बोलत नाहीये. राजकारण हे वेगळं असतं, तिथे अशा शूचिर्भूत ठिकाणाहून हे झालं, ते पाहून मला दु:ख झालं, असं दमानिया म्हणाल्या.

नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भगवान गडावरून त्यांनी सध्याच्या राजकीय चिखलफेकीवर, सामजिक ध्रुवीकरण, समाजातील तेढ यावर भाष्य केले. त्यांनी धनंजय मुंडे यांना सर्वच प्रकरणात क्लीनचिट दिली. इतकेच नाही तर भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचा थेट संदेश दिला. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने सांप्रदायाचे नुकसान आहे. भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे,असे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles