गेवराई — पोटच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच दुःख सहन न झाल्याने आईनेही विष पिऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला येथे घडली.
अभिमन्यू भागवत खेत्रे वय- 45 वर्ष व कौशल्या भागवत खेत्रे वय-70 वर्ष रा. वाहेगाव -आमला, ता. गेवराई, जि. बीड असे आत्महत्या केलेल्या माय लेकराचे नाव आहे.सोमवारी सकाळी अभिमन्यू याने घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.आपल्या मुलाने आत्महत्या करुन जीवन संपविल्याने आई कौशल्या खेत्रे यांना दुःख सहन न झाल्याने त्यांनी देखील विष घेतले. आधीच मुलगा गेला त्यातच आईने विष घेतल्याने कुटुंबीयाने कौशल्या खेत्रे यांना तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. मात्र, आज सकाळीच आई कौशल्या खेत्रे यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.या दोन्ही घटना घडल्यानंतर तलवाडा पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अभिमन्यू खेत्रे याचा मृतदेह शवविच्छेदन जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. तर आई कौशल्या खेत्रे यांच्या मृतदेहाचे बीड जिल्हा रुग्णालयात आज शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे कळताच आईने ही संपवले जीवन
काय सांगता राव ? चक्क विहिरीतील पाणी चोरीला गेलं!
बीड — बीड जिल्ह्यात कधी काय घडेल याचा नेम नाही.चोरीचा नवा धक्कादायक पॅटर्न उघडकीस आला असल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे. एका शेतकऱ्याच्या विहिरीतील सहा टँकर पाणी चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जनावरांना पाणी कोठून आणायचं? आंब्याची झाड कशी जगवायची? असा प्रश्न शेतकऱ्यांने विचारला आहे. ही घटना साक्षाळ पिंपरीत घडली आहे.
चोरीच्या घटना सामान्य बनलेल्या आहेत. पैसे दाग दागिने किमती वस्तू चोरीला गेल्याचे प्रकार आजपर्यंत ऐकल्या गेले. मात्र बीडच्या साक्षाळ पिंपरीत त्रिंबक काशीद या शेतकऱ्याच्या विहिरीमधील चक्क सहा टँकर पाणी चोरीला गेलं आहे. जिल्ह्यामध्ये भयंकर दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची भासत असलेली टंचाई या अनुषंगाने त्रिंबक काशीद या शेतकऱ्याने गेल्या दोन महिन्यांपूर्वी आपल्या शेतातील असलेल्या विहिरीमध्ये अडीच परस पाणी साठवून ठेवलं होतं.हे पाणी त्यांच्या गुरा-ढोरांसाठी त्याचबरोबर त्यांनी वीस गुंठ्यामध्ये आंब्याचे झाड लावले आहेत, ते जगवण्यासाठी साठवून ठेवलं होतं. मात्र पाणी चोरण्याचा उद्योग काही चोरट्यांनी केला आहे. तसेच काही पाणी शेतामध्ये वाया घालवले आहे.
शेतकरी त्रिंबक काशीद व पत्नी रंभा काशीद हे दोन दिवस आपल्या नातेवाईकांकडे लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. याचाच फायदा घेऊन हे कृत्य केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. घटना घडल्यानंर महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. जाणून-बुजून कोणीतरी खोडसाळपणा केल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे.
”मला पाणी मागितलं असतं तर आम्ही दिला असतं. मात्र कोणीतरी जाणून-बुजून हे केलं आहे. आमचे जनावर त्याचबरोबर आंब्याची झाडं आम्ही जगवायची कशी? असा प्रश्न रंभा काशीद यांनी उपस्थित केला. संबंधित पाणी चोरणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान पाण्याची चोरीला गेल्याची चर्चा जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आहे.
येवलवाडीत लोकशाहीची (प्र)विण उसवली; राजकारण्यांचं बाहुलं असल्याचं “वाण” खडे होऊन पायात रूतू लागलं!
बीड — पाटोदा तालुक्यातील येवलवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच विजया नागरगोजे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला होता. या ठरावाला ग्रामसभेची मंजुरी घेण्यासाठी गुप्त मतदाना ऐवजी खुले मतदान घेण्यासाठी गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांनी लोकशाहीची थट्टा लावत संविधानाला बट्टा लावण्याच काम केलं आहे. त्यामुळे गावात गेल्या तीन ते चार तासापासून तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे.
मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करत संविधान आणि लोक मताचा अनादर करण्याचा चंग गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांनी बांधला आहे. विशेष म्हणजे नुकतीच भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. त्याच आंबेडकरांच्या शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं. या शिकवणीला वानखेडे काळीमा लावत असल्याचे चित्र येवलवाडीत निर्माण झाला आहे. अधिकार पदावर बसल्यानंतर डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण विसरून राजकारणाची पाया चाटण्यात ते धन्यता मानत आहेत. सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणल्यानंतर ग्रामसभेच्या मंजुरीसाठी गुप्त मतदान घेण्याची तयारी प्रशासनाने केली. त्यासाठी मतपत्रिका ही गावात आणल्या गेल्या. मात्र ऐनवेळी वानखेडे यांनी वेशीत घोडं अडवलं. गावकरी गुप्त मतदानाचा आग्रह करत असताना लोक मत पायदळी तुडवत हम करे सो कायदा ही भूमिका त्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे आक्रमक गावकऱ्यांना हा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा आदेश असल्याचं ते सांगत आहेत. खुल्या पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली तर येणाऱ्या काळात यांचा त्रास ग्रामस्थांना भोगाव लागणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असताना वानखेडे मात्र लोकांचे मुडदे पाडण्याचं षडयंत्र रचत आहे. कायदा सुव्यवस्थेची लत्तर वेशीवर टांगून बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचं पाताळ यंत्री धोरण अवलंबलं आहे. येवलवाडीतील मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीने पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांना वेळीच समज देऊन त्यांचे अधिकार काढून घ्यावेत कायदा व्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हस्तक्षेप करून खुल्या पद्धतीने होणारी मतदान प्रक्रिया बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाभरातून होत आहे.
देशी हातभट्टीचा गुटखा,मटक्याचा खटका; ललनांच्या झटक्यात गरिबांचा संसार थोटका
बीड — “सकाळून चौसाळा दुपारून बावचळला” ही म्हण प्रचलित आहे. त्याला कारणही तसंच आहे. हातभट्टीसह देशी दारूचा झटका शहराच्या वातावरणात नवा तडका लावण्याच काम करतय तर शहराची अर्थव्यवस्थाच मटक्यावर तरली आहे. हे कमी की काय म्हणून वेश्याव्यवसाय देखील फुलू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यात गरिबांचे संसार मात्र उध्वस्त होऊ लागले आहेत.
चौसाळा जि प शाळेच्या प्रांगणातच जुगाऱ्यांचे अड्डे निर्माण झाले आहेत. झाडांच्या सावलीला बसून राजरोस मटका नावाचा जुगार घेत स्वतःचं बुकी वाले कल्याण करून घेण्यात दंग आहेत. या ठिकाणी ज्ञानार्जनाचं काम चालतं याचा विसर देखील पडला आहे. मटक्यातल्या प्रोफेसरांची वाढती वर्दळ विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढवू लागले आहेत. नुसतं मटक्यावरच काम भागत नाही तर त्याला जोड हातभट्टी, देशी दारूची ही लागत आहे. राजरोसपणाने विक्री होणाऱ्या दारूला अवैध तरी कसं म्हणायचं? त्याला नेकनूर ठाणे प्रमुखाची मूकसंमती आहे. झिंगाटलेले बेवडे रस्त्यावर सुखाची लोळण घेत रहदारीला अडथळा निर्माण करत आहेत. स्वर्ग सुख मदिराधीन झालेल्यांना मिळत असलं तरी बस स्थानकासमोरील त्यांचं भजनासह सुरू असलेलं कथ्थक महिला प्रवाशांना डोकेदुखीच बनलं आहे. अहो स्वर्ग सुख काय असतं हे पाहायचं असेल जीवाची मुंबई करायची असेल तर रंभा अप्सरा उर्वशी मेनका देवाची नाव वापरत असलेल्या हॉटेल मधून आंबट शौकिनांना उपलब्ध आहेत. मग सकाळून चौसाळा दुपारून बावचळला ही म्हण का प्रचलित होऊ लागली आहे याची अनुभूती शहरात प्रवेश केल्यावर आल्याशिवाय राहत नाही. गोरगरिबांचे संसार उघड्यावर पडत अंगाला राख फासून ” संन्यासी “बनण्याची वेळ अनेकांवर येऊन ठेपली आहे.
कायदा सुव्यवस्था याच्याशी देणं घेणं नाही. पोलीस अधीक्षक नवनीत कावत किती जरी अवैध धंद्यावर लगाम लावण्याचे काम करत असले तरी त्यांच्या प्रामाणिकतेला सुरुंग लावण्याचे काम केलं जात आहे. वरिष्ठांचं ऐकायचं नाही याचा विडा उचललाय की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे.यावर आळा घालण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.
तुझी मुलगी मला दे.. !म्हणत शिक्षक वडीलावर जीवघेणा हल्ला; ट्रॅक्टरची कारला धडक
केज — तुमची मुलगी मला का देत नाहीत? म्हणून मुलीच्या शिक्षक वडिलांच्या गाडीला ट्रॅक्टरने धडक देऊन नंतर बंदुकीच्या धाक दाखवत बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वरपगाव शिवारात आज, मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान घडली. जखमी शिक्षकावर बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केज तालुक्यातील वरपगाव येथील जय किसान विद्यालयात शिक्षक असलेले बाजीराव डोईफोडे हे बीडहून आपल्या कारमधून शाळेला येणे जाणे करतात. मंगळवारी डोईफोडे हे त्यांच्याच शाळेतील गर्जे नावाच्या शिक्षकासोबत आपल्या कार क्र. एम एच 23 / बी एच 8161 ने गावी परतत होते.केज-नांदूरघाट-चौसाळा या रोडवर असलेल्या हनुमंत पिंपरीच्या बोरगाव चौकाजवळ ते आले असता सुरज दिलीप गुंड रा. गुंड गल्ली केज याने ट्रॅक्टरने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. त्यानंतर बंदुकीच्या धाकावर तुझी मुलगी मला का देत नाहीस म्हणत मारहाण केली. डोईफोडे यांना गंभीर जखमी करत गुंड तेथून पसार झाला. कारमधील दुसरे शिक्षक गर्जे यांनी डोईफोडे यांना बीड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे आणि पोलीस नाईक शिवाजी कागदे हे पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी बाजीराव डोईफोडे यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात त्यांचा जवाब घेण्यासाठी गेले असता त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी डोईफोडे हे बेशुद्ध असल्याने ते जवाब देवू शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र संशयित आरोपीला शोधून त्याला बेड्या ठोकण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर आहेत.
दरम्यान या प्रकरणी मुलीचे आजोबा महादेव रंगनाथ भुमरे यांनी सांगितले की, सुरज दिलीप गुंड याचे शिक्षकाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे. यातून त्याने यापूर्वी ही आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ व्हायरल केले. त्यावरून त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. शिक्षक कुटुंबियांचा या विवाहाला विरोध असला तरीही गुंड हा मुलीचा पिच्छा सोडायला तयार नाही यातूनच हा प्रकार घडला आहे.
विद्या वैष्णव यांचे निधन
बीड — बीड तालुक्यातील हिंगणी बु. येथील रहिवाशी विद्या पितांबरदास वैष्णव (बैरागी) यांचे (वय60) हृदयविकाराच्या धक्क्याने मंगळवारी पहाटे निधन झाले . त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी हिंगणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात 5 मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवडे असा परिवार आहे. दैनिक पुण्यनगरी चे जिल्हा प्रतिनिधी व्यंकटेश वैष्णव यांच्या त्या चुलती होत्या. मनमिळावू स्वभावामुळे त्या सर्वत्र परिचित होत्या. त्यांच्या निधनाने चौसाळा परिसरावर शोक कळा पसरली
वैष्णव कुटुंबाच्या दुःखात ” सह्याद्री माझा” परिवार सहभागी आहे.
पवनचक्की कंपन्यांसाठी शेतकऱ्यांचे लचके तोडणाऱ्या अविनाश पाठक यांची बदली; ” “जॉन्सन” त्या जखमांवर विवेकाचा मलम लावणार?
बीड — शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडून पवन चक्की ,सौर ऊर्जा कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी पदाचा वापर करणाऱ्या अविनाश पाठक यांची बदली झाली असून चंद्रपूर जि प चे कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी म्हणून कारभार पाहणार आहेत. शेतकऱ्यांच्या खरवडलेल्या जखमेवर मलम म्हणून ते काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पवनचक्की सौरऊर्जा कंपन्यांनी जिल्ह्यात पाय ठेवल्यानंतर अविनाश पाठक यांनी शेतकरी विरोधी भूमिका घेत आपला कारभार हाकण्याचं काम केलं. शेतकऱ्यांच्या जमिनीवर अक्षरश: कंपन्यांनी दरोडे घातले त्याला अविनाश पाठक यांनी जिल्हाधिकारी पदाच्या अधिकाराचा वापर करून पाठबळ दिलं. परिणामी जिल्ह्यात कंपन्यानी पाळलेले गुंड, त्यांच्या मदतीला पाठकांच्या आदेशामुळे पोलीस यंत्रणेची तगडी फौज शेतकऱ्या विरोधात उतरवली. परिणामी जिल्ह्यात रझाकाराच्या जमान्याची आठवण शेतकऱ्यांना आली. पवन ऊर्जा कंपन्यांना घातलेल्या पायघड्यामुळे अविनाश पाठक जिल्ह्यात वादग्रस्त ठरले. शेवटी त्यांच्या बदलीचे आदेश आज निघाले. अविनाश पाठक यांच्या शेतकरी विरोधी भूमिकेला “सह्याद्री माझा” ने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून परखड भाषेत विरोध केला होता.त्यांच्या जागी चंद्रपूर जि प चे सीईओ विवेक जॉन्सन हे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. नवनियुक्त जिल्हाधिकारी तरी शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या जखमांवर विवेकाची फुंकर घालून त्या जखमा बऱ्या करण्यासाठी जॉन्सन मलम म्हणून काम पाहतील अशी अपेक्षा त्राहिमां झालेल्या शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे.
फडणवीस साहेब…! दरोडे घालायलाही पोलीस संरक्षण देणार का? पवनचक्की कंपन्याही तेच करत आहेत
पाठकांच्या मोगलाईत शेतकरी लाडका कसा?
बीड — जिल्ह्यात पवनचक्की सौर ऊर्जा कंपन्यांनी गुंडांच्या मदतीने हैदोस घातला आहे. या नंगा नाचाला जिल्हाधिकारी अविनाश पा”ठक”यांच्या अधिकाराचं बळ मिळत आहे. इतका कर्मदरीद्री शेतकरी विरोधी जिल्हाधिकारी बीडच्या इतिहासात कधीच झाला नाही. न्याय भूमिका न घेता अविनाश पाठक यांनी शेतकरी कसा “ठक”वता येईल यावरच डोळा ठेवला मोगलाईचा काळ सुरू झाला अशी स्थिती शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्माण केली. मग मुख्यमंत्री साहेब थाटात “लाडका शेतकरी” अशी घोषणा तुम्ही केली. मग बीड जिल्ह्यात मोगलाई का? मोगलाईत शेतकरी लाडका कसा?शेतकऱ्यांना लालूच दाखवायची जमीन ताब्यात घ्यायची,नाहीच एखाद्या शेतकऱ्याने दिली तर गुंडा मार्फत दमदाटी करायची, गुंडानाही घाबरला नाही तर पोलीस बळाचा वापर करून ,गुन्हे दाखल करण्याची धमकी देत पोलीस ठाण्यात नेऊन डांबून ठेवायचा एवढा एकमेव उपक्रम राबवला जात आहे. कंपन्यांना ते संरक्षणाचे पैसे भरतात म्हणून आम्ही येतो असं पोलीस दल सांगत.मग उद्या दरोडे टाकायला पोलीस संरक्षण मागितलं तर ते मुख्यमंत्री साहेब देणार का? विशेष म्हणजे कंपन्यांच्या पाळलेल्या गुंडा नाही हे संरक्षण दिलं जात आहे. कंपन्याही शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडत आहे, शेतकरी नागवण्याचं काम करत आहे. अक्षरशः त्यांच्या भाकरीवर दरोडा घातला जात आहे. मग दरोड्याची वेगळी व्याख्या काय? कमीत कमी जिल्ह्यात आल्यानंतर सरकारचे प्रमुख म्हणून न्याय भूमिका आपण घेताल शेतकऱ्यांना दिलासा देताल पाठकांच्या मनमानीला आळा घालताल एवढीच आस लावून शेतकरी आपल्याकडे सध्या तरी पहात आहे.
आजपर्यंत जिल्ह्याला लाभलेल्या नेत्यांनी जिल्हा भिकारी कसा राहील याकडेच लक्ष ठेवलं. पाचवीला पूजलेलं दारिद्र्य जपत ऊसतोड करून उपजीविका करायची हेच आज पर्यंत नशीबी आहे. त्यातच पुन्हा उरली सुरली लूट करायला पवनचक्की, सौर ऊर्जा कंपन्यांनी जिल्ह्यात पाय ठेवला. विकासाच्या नावाखाली जिल्ह्यातील शेतकरी उध्वस्त करायचा. तो लुटायचा एवढाच उपक्रम राबवला जात आहे. पवनचक्क्या कंपन्यांनी पाळलेले पाच 25 गुंड, 50 — 60 पोलिसांचा फौज फाटा, शेतकऱ्यांकडे एरवी डूंकून न पाहणारे तहसीलदार, गिरदावर, तलाठी यांची कुमक, सोबत कंपन्यांचे अधिकारी, मजूर, कर्मचारी तितक्याच संख्येने काळ्या स्कॉर्पिओ गाड्या शेतकऱ्यांची उभी पिक उध्वस्त करीत शेतकऱ्याच्या जमिनीवर हल्लाबोल करत ताब्यात घ्यायचा त्यात गोंधळलेला शेतकरी दबावात घेऊन आपलं काम करून घ्यायचं, नाहीच एखाद्या शेतकऱ्याने काम करू दिलं तर गुंडा मार्फत दमदाटी करायची, दमदाटी करूनही भागत नसेल तर पोलीस यंत्रणेचा वापर करायचा, शेतकरी धमकावल्यानंतरही काम करू देत नसेल तर गुन्हे दाखल करण्याची धमकी देत पोलीस ठाण्यात नेऊन डांबून ठेवायचा हे चित्र बीड जिल्ह्यात सध्या निर्माण झाला आहे. रजाकारी, मोगलाई, इंग्रजांची कूटनीती या तिन्ही काळातील शेतकऱ्यांची जी स्थिती होती तीच स्थिती जिल्ह्यात कंपन्यांनी निर्माण केली आहे. त्याला पूरक जिल्हाधिकारी कंपन्यांनी आपल्या दावणीला बांधून घेतला आहे. अधिकाराचा वारे माप वापर करून शेतकरी उध्वस्त कसा करायचा? याकडेच अविनाश पाठक यांचं सध्या तरी लक्ष आहे. इतका कर्म दरिद्री जिल्हाधिकारी बीड जिल्ह्याच्या नशिबी आतापर्यंत तरी आला नाही.
शासनाच्या उद्योग ऊर्जा विभागाने 21 ऑक्टोबर 2023 रोजी पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स नियंत्रण समिती स्थापन करून पवन ऊर्जा कंपन्यांबाबत असलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत कायदेशीर बाबी व अनिश्चितता तपासून जमिनीच्या व्यवहारात योग्य मोबदला देण्यासाठी योग्य नियोजन लावण्याची जबाबदारी दिली होती ती पार पाडायला देखील अविनाश पाठक तयार नाही. न्यायालयाच्या आदेशाने गाडी जप्त झाली, कैदेत ठेवण्याचे आदेश दिले गेले. जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चीची इज्जत अविनाश पाठक यांनी धुळीला मिसळवली. शेतकरी विरोधी भूमिका व कंपन्यांपुढे गोंडा घोळणं एवढंच काम त्यांनी सध्या हाती घेतलेलं दिसू लागला आहे. अधिकाराच्या गैरवापराचाच परिणाम अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव मधील शेतकऱ्यांची घरं अविनाश पाठकांनी उध्वस्त केली. 1981 पासून भूमिहीन शेतकरी कसत असलेली गायरान जमीन कंपनीच्या घशात घातली, ती जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांना विष पिऊन आत्महत्या करण्याची वेळ आणली गांधीजीच्या आंदोलनाला इंग्रज ही किंमत देत होते. मात्र इंग्रज मोगल, रझाकार यांचे कॉम्बो पॅक असलेल्या जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने धरणे आंदोलनाला ही भिक घातली नाही. त्याचवेळी पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथील शासकीय साठवण तलावात पाच कोटी रुपये खर्च करून विद्युत उपकेंद्र उभा करत कंपन्यांनी तलाव बळकावला.
यापेक्षा वेगळी परिस्थिती बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द ची नाही. या ठिकाणावरून टी इ क्यू ग्रीन पॉवर कंपनीची टॉवर लाईन गेली आहे. या गावातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई म्हणून कवडीमोल रक्कम दिली गेली. त्यानंतर एक फुटकी कवडी देखील बाधित शेतकऱ्यांना दिली नाही. टॉवर उभारणीसाठी जमीन घेतली मात्र आता त्याचा पैसा द्यायला कंपनी तयार नाही. काम होऊन गेलं आहे. आता काय करायचं ते करा? तिथला गुत्तेदार वेगळा होता आमचा संबंध नाही? असं म्हणत कंपनी अधिकाऱ्यांनी हात झाडले. या टॉवर लाईन खाली येणारे बोअरवेल, फळझाड याचा मावेजा म्हणून एक रुपयाही दिला नाही. आता मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना कंपनीचे गुंड धमकावत आहेत. पोलीस यंत्रणादेखील त्यांना साथ देत आहे. तीच स्थिती चौसाळा शहराजवळ असलेल्या भागाची झाली.फुटकळ रक्कम देऊन शेतकऱ्यांना चुना लावण्याच्या तयारीत कंपनी आहे. कोट्यावधी रुपये भाव असणारी हायवे टच ही जमीन कवडी मोल दराने कंपनी बळकवण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे ही जमीन बळकवण्यासाठी पोलीस यंत्रणे सह महसूल प्रशासनाने पूर्ण ताकत लावली आहे. या टॉवर लाईन खाली बाधित क्षेत्रात आलेल्या फळझाडांची कवडी मोल दराने किंमत कंपनीने केली आहे. पंधरा-सोळा वर्षाच्या उत्पादन देणारी आंब्याची झाडं आठ हजार रुपये दहा हजार रुपये अशी किरकोळ रक्कम देऊन तोडून टाकणार आहे. विशेष म्हणजे या टॉवर लाईन खाली आलेले शेतकरी अत्यल्प भूधारक आहेत. ही कैफियत आहे हिंगणी बू. शिवारातील रेखा सुमंत जगदाळे या एक एकर जमिनीवर मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या महिलेची कंपनी असे शेतकरी उपजीविकेचे साधन असलेली फळझाडे तोडून किरकोळ रक्कम देऊन उध्वस्त करत आहे. हीच स्थिती हिंगणी खुर्द ची देखील आहे. यासारखी प्राथमिक उदाहरण अनेक आहेत. कंपनीकडे जिल्हाधिकारी सारख्या माणसाला पायावर लोळण घेण्यास भाग पाडण्या इतका, दलाला ना देण्या इतका, पोलीस ठाणे प्रमुखांना, आपलीच भाषा बोलायला लावणे इतका, महसूल प्रशासनाची टीम प्रामाणिकपणे काम करायला लावण्या इतका, गुंड पोसण्याईतका पैसा आहे. तर शेतकऱ्यांना द्यायला का नाही असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
कंपनी शेतकऱ्यांच्या जमिनीवर पोलीस संरक्षणात, महसूल यंत्रणेच्या साक्षीने, जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने दरोडे घालत आहे. तर मुख्यमंत्री साहेब उद्या एखाद्या दरोडेखोराला दरोडा टाकायला पोलीस संरक्षणासाठी पैसे भरले तर संरक्षण देणार का? विकासाच्या नावाखाली जिल्ह्यात आराजकता माजवणार का? जिल्हाधिकारी अविनाश पाठक सारखे अधिकारी खुर्चीला न्याय देणार नसतील? शेतकऱ्यांचा सूड उगवणार असतील? रजाकारी , मोगलाई कशी होती हे दाखवून देत असतील? हे दाखवताना कंपन्यांचे पाय चाटत असतील? तर असल्या बाजारबूणग्या अधिकाऱ्यांच्या कारभारातील शेतकरी लाडका कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुख्यमंत्री साहेब..! पाठक नावाचा रझाकार हाकला; शेतकऱ्यांना न्याय द्या
जिल्हाधिकारी म्हणून स नियंत्रण समितीमार्फत शेतकऱ्यांना मावेजा मिळायला हवा. शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेत दखल घ्यायला हवी.जमिनी बळकावणाऱ्या कंपन्यावर कारवाई करायला हवी. पोलीस कर्मचारी शेतकऱ्यांना दमदाटी करत आहेत. पोलीस संरक्षण देताना शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्या अशी मागणी आम्ही केली होती. मात्र पोलीस अधीक्षकांनी या मागणीला केराची टोपली दाखवली. आता कंपन्यांच्या गुंडांना पोलीस संरक्षण देत आहेत. याला आळा घातला गेला पाहिजे. शेवटची अपेक्षा म्हणून मुख्यमंत्र्यांनी तरी ऊसतोड मजुरांचा घास घ्यायला टपलेल्या पवनचक्की कंपनी तसेच जिल्हाधिकारी अविनाश पाठकच्या कारभाराला आळा घालावा ही अपेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
सामाजिक कार्यकर्ते
50 हजाराची लाच घेताना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात
माजलगाव — पात्रुड येथील विज वितरणच्या कार्यकारी अभियंत्याससह लाईनमन व खाजगी इसमासह चोरीचा दोन लाखाचा दंड न टाकण्यासाठी 50 हजार रुपये ची लाच स्विकारणारा लाईनमनने कार्यकारी उपअभियंता यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याचे कबूल केले.असल्याचे सांगितले.या प्रकरणी महावितरणचे कार्यकारी उपअभियंता विवेक जनार्धन मवाडे, वायरमन शेख जलील शेख अब्दुला, खाजगी इसम मोईन रशीद मोमीन यांच्या विरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणात वाढ झाली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायाने अधिकारी कर्मचारी जाळ्यात अडकत आहेत माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे तक्रारदाराचे चहापाण्याचे, वडापाव स्नॅक्सचे हॉटेल आहे. त्यांचे मीटर जळाल्यामुळे वायरमनच्या परवानगीने दुसरीकडून लाईट घेतली. ही बाब वायरमनने कार्यकारी उपअभियंता यांना सांगून दंडाची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्लॅन बनवला. त्याप्रमाणे हॉटेलची झडती घेऊन वीजचोरी पकडली व एक लाख 82 हजार रुपये दंडाची भीती दाखवली. याप्रकरणी कारवाई करायची नसेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगण्यात आले होते. तडजोडीत 50 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. यावरून बीड एसीबीने सापळा रचला. कार्यकारी उपअभियंत्याच्या सांगण्यावरुन वायरमनने ही लाच खाजगी इसमाच्या स्वाधीन केली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या उपस्थितीत सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, भरत गारदे, खरसाडे, राठोड, हनुमान गोरे, गणेश म्हेत्रे, पुरी यांनी केली
वक्फ’मधील ‘त्या’ तरतुदींच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली — सर्वोच्च न्यायालयात आज (दि.१७) वक्फ दुरूस्ती कायदा प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने या कायद्यातील काही तरतुदींच्या अंमलबजावणीला पुढील सुनावणी पर्यंत स्थगिती दिली आहे.
नवीन कायदा वक्फ बोर्डांच्या रचनेत गैर-मुस्लिमांना सदस्य म्हणून समाविष्ट करणे अनिवार्य केले आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले की, वक्फ बोर्डांमध्ये कोणत्याही नवीन नियुक्त्या केल्या जाणार नाहीत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारच्या वतीने आश्वासन दिले की, पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत, २०२५ च्या कायद्याअंतर्गत बोर्ड आणि कौन्सिलमध्ये कोणतीही नियुक्ती होणार नाही. तसेच केंद्राने याबाबत उत्तर दाखल करण्यासाठी ७ दिवसांचा वेळ मागितला. त्यानंतर पाच दिवसांच्या आत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना त्यांचा प्रतिवाद दाखल करण्याची परवानगी दिली.वक्फ याचिकांवर सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमाोर सुनावणी झाली. या प्रकरणातील पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार असल्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला माहिती दिली की, “केंद्र सरकार सात दिवसांत उत्तर सादर करेल. त्यांनी न्यायालयाला असेही आश्वासन दिले की वक्फ कायद्याच्या कलम ९ आणि १४ अंतर्गत केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डांमध्ये कोणत्याही नियुक्त्या केल्या जाणार नाहीत. याव्यतिरिक्त, पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत, कोणत्याही वक्फ मालमत्तेला – अधिसूचनेद्वारे वापरकर्त्याने वक्फ म्हणून नोंदणीकृत किंवा घोषित केलेल्या मालमत्तेसह – अधिसूचित केले जाणार नाही किंवा नियुक्त कलेक्टरमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. न्यायालयाने हे विधान रेकॉर्डवर घेतले आहे.
कायद्यावर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय
खंडपीठ म्हणाले, या कायद्यामध्ये काही सकारात्मक बाबी आहेत. त्यामुळे यावर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना कोणताही बदल होणार नाही याची खात्री न्यायालयाला करावी लागेल. यानंतर SG मेहता म्हणाले की, मला एका आठवड्याचा कालावधी लागेल.
अनेक गावांइतक्या जमीनी वक्फच्या नावावर; तुषार मेहता
केंद्र सरकारच्या वतीने युक्तीवाद करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, “अनेक गावांइतक्या जमीनी वक्फच्या नावावर आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांच्या मालमत्तेवर प्रश्न आहेत. याबाबही न्यायालय सुनावणी घेऊ शकते”. या कायद्याला स्थगिती देणे हे कठोर पाऊल असेल. आम्हाला काही कागदपत्रे सादर करण्यासाठी १ आठवड्याचा कालावधी हवा आहे, असेही मेहता म्हणाले.
वक्फ दुरूस्ती कायद्याविरुद्ध याचिका दाखल
वक्फ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या एकूण १० याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिका एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, आप नेते अमानतुल्ला खान, असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स, अर्शद मदनी, समस्थ केरळ जमियातुल उलेमा, अंजुम कादारी, तैय्यब खान सलमानी, मोहम्मद शफी, मोहम्मद फजलुररहीम आणि आरजेडी नेते मनोज कुमार झा यांनी दाखल केल्या होत्या. तसेच तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि समाजवादी पक्षाचे नेते झिया-उर-रहमान बर्क यांनी दाखल केलेल्या नवीन याचिका दाखल केल्या आहेत.
बुधवारी झालेल्या सुनावणीत काय झाले?
‘वक्फ (सुधारणा) कायदा-२०२५’ विरोधी याचिकांवर बुधवारी याचिकाकर्त्यांच्यावतीने युक्तिवाद करताना वरिष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, वक्फ कायद्यातील सुधारणा भारतीय संविधानाच्या कलम २६ च्या विरुद्ध आहेत. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने कायद्यातील काही प्रमुख तरतुदींना स्थगिती देण्याचा प्रस्ताव मांडला. ज्यामध्ये न्यायालयांनी वक्फ घोषित केलेल्या मालमत्ता रद्द करण्याचा अधिकार आणि केंद्रीय वक्फ परिषदा आणि मंडळांमध्ये गैर-मुस्लिमांचा समावेश यांचा समावेश आहे.











