अंबाजोगाई — लग्न समारंभासाठी जात असलेली कार अंबाजोगाई आडस रोडवरील उमराई पाटी जवळ आली असता दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या नादात पलटी झाली. या अपघातात 3 ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
माजलगाव तालुक्यातील पाथरूड येथून एम एच 05 सी व्ही 9186 या क्रमांकाच्या कारमधून अंबाजोगाईकडे एका विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी एक कुटुंब जात होते. आडस अंबाजोगाई रोडवरील उमराई पाटी जवळ असलेल्या दत्त मंदिरासमोर एक दुचाकीस्वार अचानक आडवा आला. या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार जागीच पलटी झाली. यात शौकत अहमद शेख वय 46 वर्ष आणि खय्युम अब्बास अत्तार वय 45 वर्ष हे दोघे जागीच ठार झाले.तर आरेफ जागीरदार, नवाब मिया शेख, वाजेद आबेद मोमीन, खाजा अमीर शेख, शरीफ इस्माईल मोमीन हे 5 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान अपघातानंतर दुचाकी स्वार दुचाकीसह घटनास्थळावरून पसार झाला जखमीं पैकी शामू जागीरदार या जखमीची प्रकृती चिंताजनक होती उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
दुचाकीला वाचविताना कार उलटली;3 ठार,4 जण गंभीर जखमी
नरेगाच्या बोगस आणि निकृष्ट कामांचा आ.क्षीरसागरांकडून ‘पोस्टमार्टम’
भ्रष्टाचारात समावेश असलेल्या प्रत्येकावर कारवाईसाठी पाठपुरावा करणार- आ.संदीप क्षीरसागर
बीड — बीड विधानसभा मतदारसंघात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगाच्या अंतर्गत अनेक निकृष्ट दर्जाची आणि बोगस कामे झाली आहेत. शासकीय अधिकारी यांच्याशी संगनमत करून अनेकांनी यामध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. या सर्व प्रकरणांचे आता आ.संदीप क्षीरसागर यांनी पोस्टमार्टम करायला सुरुवात केली आहे, म्हणजेच झालेल्या कामांची स्वतः आ.संदीप क्षीरसागर जाऊन पाहणी करत आहेत. नरेगा अंतर्गत झालेली कामे अत्यंत निकृष्ट आणि काही ठिकाणी तर चक्क बोगस असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

बीड विधानसभा मतदारसंघातील बीड आणि शिरूर कासार तालुक्यात अनेक ठिकाणी बोगस कामे झाल्याचा तक्रारी होत्या. अनेक कामे हि अतिशय निकृष्ट झालेली आहेत. काही विशिष्ट लोक, ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांनी संगनमत करून भ्रष्टाचारी पॅटर्न राबवला आहे. या गंभीर विषयाची दखल घेत आ.संदीप क्षीरसागर यांनी झालेल्या बोगस आणि निकृष्ट कामांची पाहणी आणि चौकशी सुरु केली आहे. बुधवारी (दि.१४) रोजी बीड तालुक्यातील नाळवंडी आणि काळेगाव हवेली या गावांमध्ये आ.संदीप क्षीरसागर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जाऊन झालेल्या निकृष्ट आणि बोगस कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. आता बीड मतदार संघात झालेल्या नरेगाच्या प्रत्येक बोगस आणि निकृष्ट कामाची मी स्वतः जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. शासनाच्या निधीची पद्धतशीर विल्हेवाट लावण्याचे काम करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
राज्यातील 49 शाळांचा शून्य निकाल; लातूरच्या दहा शाळांचा समावेश
मुंबई — महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा एकूण निकाल 94.10 टक्के इतका लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.71 टक्क्यांनी घटला आहे. लातूर पॅटर्नची पोलखोल झाली असून दहा शाळांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. राज्यात अशा 49 शाळांना भोपळा फोडता आला नाही.
यंदा एकूण 15 लाख 60 हजार 154 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
यंदाच्या निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्याने 99.32 गुणांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे, तर सर्वात कमा निकाल हा गडचिरोरील जिल्ह्यात आहे. 82.67 टक्के निकाल या जिल्ह्याचा आहे. याशिवाय राज्यातील 49 शाळांमधील निकाल हा शून्य टक्के राहिला आहे. ही एक चिंता वाढवणारी बाब आहे. तसेच 285 विद्यार्थी हे काटावर पास झाले आहेत. म्हणजेच या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत 35 टक्के गुण मिळाले आहेत.
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 14 लाख 68 हजार 582 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल पहाता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून, यंदा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.
35 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
मुंबई: 67 विद्यार्थी
नागपूर: 63 विद्यार्थी
पुणे: 59 विद्यार्थी
संभाजी नगर: 28 विद्यार्थी
अमरावती: 28 विद्यार्थी
लातूर: 18 विद्यार्थी
कोल्हापूर: 13 विद्यार्थी
नाशिक: 9 विद्यार्थी
कोकण: 0 विद्यार्थी
49 शाळांचा निकाल शून्य टक्के आहे, त्या शाळा खालीलप्रमाणे
लातूर: 10 शाळा
संभाजी नगर: 9 शाळा
नागपूर: 8 शाळा
पुणे: 7 शाळा
मुंबई: 5 शाळा
अमरावती: 4 शाळा
नाशिक: 4 शाळा
कोल्हापूर: 1 शाळा
कोकण: 1 शाळा
पुणे जिल्ह्याने निकालांत 97.26 टक्के मिळवत दुसरे स्थान मिळवले आहे. तर दुसरीकडे पुण्यातील ७ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे. तर पुणे विभागात 59 विद्यार्थ्यांना केवळ 35 टक्के गुण मिळाले आहेत.
नववधूचं प्रियकरा सोबत रफूऽऽचक्कर ऽऽ
केज — बापाने भरपूर खर्च करून मुलीचे लग्न लावून दिले. दिल्या घरी ती सुखाने संसार करील अशी आस धरली मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी प्रियकरा सोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे.
ही घटना केज तालुक्यात घडली आहे. 9 मे रोजी केज तालुक्यातील एका मंगल कार्यालयात झालेल्या या विवाह सोहळ्यात तालुक्यातील अनेक मान्यवर नेत्यांनीही हजेरी लावली होती व नव दाम्पत्याला शुभाशीर्वादही दिले होते, मात्र त्यानंतर नवरीने केलेल्या प्रतापाने सर्वांनाच धक्का बसला आहे
शुक्रवारी दुपारी केज तालुक्यातील एका खेड्यातील नववधूचे शुभमंगल झाले. लग्न लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवदाम्पत्यांनी जोडीने देवदर्शनही केले. त्यानंतर रविवारी तिला मुराळी पाठवून येती-जातीसाठी माहेरी नेण्यात आले. मात्र, त्याच रात्री या नववधूने रात्री नैसर्गिक विधीला जाण्याच्या बहाण्याने भावजयीचा मोबाईल घेतला आणि माहेरच्या गावाशेजारीच असलेल्या प्रियकराशी मोबाईल वरून संपर्क साधला. दरम्यान
उन्हाळ्याचे दिवस असल्याने ती एकटीच घरात झोपली व तिचे इतर सर्व नातेवाईक अंगणात झोपी गेले. सोमवारी पहाटे नवरी मुलगी झोपलेल्या घरातील वीज दिवे बंद असल्याचे तिच्या आईला दिसून आले. त्यामुळे तिने घरात जाऊन पाहिले असता मुलगी आढळून आली नाही नंतर जवळच्या नातेवाईकांकडे सर्वत्र तिचा शोध घेतला असता नववधू कोणाकडेही आढळली नाही. अखेर मुलीच्या भावाने केज पोलिस ठाण्यात नववधू असलेली बहीण हरवल्याची तक्रार सोमवारी दिली. या नववधूने प्रियकरासोबत पळून जाताना सासरच्या मंडळीने लग्नात घातलेले झुंबर, मंगळसूत्र व इतर दागिन्यासह स्वतःचे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड आणि मोबाईलसह पोबारा केला आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
बीड शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम; आ. संदीप क्षीरसागरांनी घेतली न.प. आढावा बैठक
बीड — बीड शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि. १३) रोजी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

या बैठकीत शहरातील नालेसफाई, रस्त्यांची स्वच्छता, आणि पाण्याचा निचरा यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. आ. क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना मान्सूनापूर्वी सर्व नाल्यांची साफसफाई पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले. बीडकरांना पावसाळ्यातील समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी नियोजनबद्ध काम करणे गरजेचे आहे,असे आ.संदीप क्षीरसागरांनी यावेळी सांगितले. येत्या १० ते १२ दिवसांमध्ये शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम पूर्ण करण्याचे नियोजन करून स्वच्छता मोहीम युध्दपातळीवर राबविण्याचे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी नगरपालिकेला दिले आहेत.
नेकनूर : हरवलेले दोन लाखाचे मोबाईल पोलिसांनी तक्रारदारांना परत मिळवून दिले
बीड — नेकनूर बाजारातून गहाळ अथवा चोरी झालेले मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. एक लाख 92 हजार रुपये किमतीचे दहा तक्रारदारांचे मोबाईल पोलिसांनी मिळवून दिल्यामुळे तक्रारदारातून समाधान व्यक्त केले जात आहे.
नेकनूर शहरात जनावरांचा बाजार भरत असल्यामुळे बाजारामध्ये येणारांची संख्या मोठी आहे. प्रचंड गर्दीचे ठिकाण असल्यामुळे चोरीच्या घटना घडत राहतात. दरम्यान खिसे कापू, मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. या बाजारातून अनेक मोबाईल चोरी होतात काही गहाळ होतात. अशा अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. याची दखल घेत सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी पोलीस स्टेशन नेकनूर येथे असलेले सायबर डेक्सचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे व अमलदार दादासाहेब उबाळे, विशाल क्षिरसागर याना या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश दिले. या तक्रारींच्या अधारे तांत्रिक तपास करुन एकूण १० मोबाईल किंमत १ लाख ९२ हजार हस्तगत केले. हे मोबाईल तक्रारदार ऋषीकांत तांदळे रा. अंबीलवडगाव, बळीराम बाबुराव कदम रा. मांडवखेल, संजय लोखंडे रा. नेकनूर, अशोक रामदास काळे रा. घारगाव, संदिप अंगदराव शिंदे रा. नेकनूर, सुरेश साहेबराव निर्मळ रा. लिंबागणेश, विजयकुमार सदाशिव सोळंखे रा. खरमाटा, श्रेयश लक्ष्मण ढास रा. खडकीघाट, सुधाकर पवार रा. सफेपुर, कैलास ज्ञानोबा खाकरे रा. बीड यांना परत केले. गेलेले मोबाईल परत मिळाल्याने या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मिना यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेकनूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, पोउपनि आप्पासाहेब रोकडे, विशाल क्षीरसागर, दादासाहेब उबाळे तसेच टेक्निकल एनालिसेस सेल बीड येथील पोलीस अमलदार विक्की सुरवसे यांनी केली आहे.
💐 दत्ता कुलकर्णी धाराशिव भाजपचे जिल्हाध्यक्ष 💐
धाराशिव — येथील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या दत्ता कुलकर्णी यांच्या हातात पुन्हा एकदा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी धाराशिवचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले होते. आता पुन्हा एकदा त्यांची निवड करण्यात आली आहे.
धाराशिवमध्ये संघटन आणि पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यात दत्ता कुलकर्णी यांचा मोलाचा वाटा आहे. भाजपच्या सहकार बॉडीवर ते संयोजक म्हणून कार्यरत होते. पक्षाशी निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष म्हणून भाजपने संधी दिल्याचे चित्र धाराशिवमध्ये पहायला मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेल्या दत्ता कुलकर्णी यांच्या निवडीचा धाराशिवमधून आनंद व्यक्त करण्यात येतं आहे. दत्ता कुलकर्णी यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिव भाजपाला बळकटी मिळणार आहे. बीडच्या जिल्हा विशेष शाखेतील प्रमुख असलेल्या मुकुंद कुलकर्णी यांचे ते बंधू आहेत.
परळी अंबाजोगाई दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर मोक्का
बीड — जिल्ह्यात सुरू असलेल्या गुन्हेगारीला काळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कठोर पावलं उचलत आहेत. परळी अंबाजोगाई तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीतील पाच आरोपी पकडले असून दोन आरोपी फरार आहेत.
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मकोका, एम पी डी ए व कलम 55, 56, 57, म पो का अन्वये गुन्हेगारावर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील चोऱ्या दरोडे घरफोड्या खून खुनाचा प्रयत्न खंडणी यासारख्या गुन्हेगारावर करडी नजर ठेवली आहे. परळी तालुक्यातील तडोळ येथील सहदेव वाल्मीक सादभाई यांचे मोटर सायकल अडवून रघुनाथ फड व अन्य सात ते आठ जणांनी हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या खिशातील दोन लाख 70 हजार रुपये बळजबरीने काढून घेण्यात आले. त्यानंतर हे आरोपी फरार झाले होते. रघुनाथ फड जगन्नाथ विक्रम फड, सुदीप रावसाहेब सोनवणे, बालाजी अंकुश दहिफळे आणि विलास बालाजी गीते या पाच जणांना पोलिसांनी पकडले. या प्रकरणातील दोन आरोपी फरार आहेत. फड याच्या टोळीने बीड शहर संभाजीनगर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत धुमाकूळ घातला होता या टोळी विरोधात दहा गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले असून यामध्ये दुखापत करणे दंगा करणे खुणाचा प्रयत्न करणे कट रचने अवैधशस्त्र बाळगणे जबरी चोरी दरोडा वाटणारी मारहाण सरकारी कामात अडथळे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत या टोळी विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेत या संदर्भातील प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांना पाठवण्यात आला आहे.
कांवत साहेब…! बीडमध्ये येऊन भरपूर नाव कमावलं; पवनचक्की कंपनीच्या नादात सगळंच गमावलं
मावेजा मागणाऱ्या बेडूकवाडीच्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल
बीड — दोन दशकापूर्वी काय राव तुम्ही..! धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं….!… नादात … गमावलं असं गाणं महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होतं. या गाण्यासारखीच स्थिती पोलीस अधीक्षक व पवन ऊर्जा कंपन्या यांच्या बाबतीत झाली आहे. पोलीस दलाला शिस्त लावत वेगवेगळे प्रयोग करून कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाने नवनीत कांवत यांनी महाराष्ट्रात नाव कमवलं. पण पवनचक्क्या कंपन्यांच्या नादी लागून सशुल्क पोलीस संरक्षण देण्याच्या नावाखाली त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी रजाकारी राजवट ग्रामीण भागात लागू केली. पवनचक्की कंपन्यांच्या गुंडांना संरक्षण द्यायचं, बळजबरी जमिनीवर कब्जा करायचा, शेतकरी धमकवायचा, वेळप्रसंगी पोलीस ठाण्यात नेऊन डांबून टाकायचा, आज तर शेतकरी पिता पुत्रावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यापर्यंत मजल गेली. रजाकारी चित्र निर्माण झाल्याने राज्य कायद्याचं की रजाकारांचं असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकारी दावणीला; काय करायचय ते करा गाडे च्या माजाने पा”ठका”चे पितळ उघडे ✒️भाग –5
( ज्या गाडे नावाच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला त्याच्या विरोधात केलेल्या बातमीची दखल देखील पोलीस अधीक्षकांनी घेतली नाही)
पवनचक्की कंपन्यांनी जिल्ह्यात पाय ठेवताच शेतकऱ्यांचे ग्रह फिरले गेले. जिल्ह्यातली बिघडली गेलेली कायदा सुव्यवस्थेची घडी व्यवस्थित बसवण्याची जबाबदारी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कांवत यांच्यावर सोपवण्यात आली. ती घडी बसवण्यासाठी हर संभव प्रयत्न त्यांनी केले. त्यांचे अनेक निर्णय वाखाणले गेले. प्रामाणिक कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे सोपे नसले तरी त्या प्रमाणात त्यांचीच यंत्रणा साथ देत नसल्याचे चित्र अनेक वेळा पाहायला मिळालं. पवनचक्की कंपन्यांना सशुल्क संरक्षण देण्याच्या नावाखाली उच्छाद मांडला गेला. पोलिसांकडून शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकार अनेक वेळा समोर आले. संरक्षण देताना कंपनीच्या गुंडांनाही ते दिले गेले. आपल्या माणसावर पूर्ण विश्वास नवनीत कांवत यांनी ठेवला. कायम त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. इथेच सगळा घात झाला. कंपनीने इंग्रजांचे फोडा,तोडा राज्य करा या नीतीचा वापर करून पोलीस यंत्रणेचे अधिकारी आपलेसे करून घेतले. कंपनीच्या गुंडांसोबत पोलिसांनी ही दादागिरी केली. मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचा धमक्या दिल्या गेल्या. धमक्यांनाही न घाबरणाऱ्या शेतकऱ्यांना सराईत गुन्हेगारासारखे पकडून पोलीस ठाण्याला नेऊन डांबून ठेवण्याचे प्रकार घडले. कंपन्यांनी अक्षरशः पोलिसांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जमिनीवर दरोडे घातले. उभी पिक वाहनांच्या मदतीने नष्ट केली. शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय जमिनीवर कब्जे केले. वेळप्रसंगी कायदा धाब्यावर बसवून पोलीस यंत्रणेने काम केले. याची ओरड प्रसार माध्यमांनी केली. मात्र प्रसारमाध्यम अतिशयोक्ती करतात या भ्रमात त्याची दखल पोलीस अधीक्षकांनी कधी घेतलीच नाही. त्यामुळे संबंधित ठाणे प्रमुख व त्यांचे कर्मचारी यांचे मनोबल वाढत गेले. या सर्व प्रकारात मात्र शेतकरी भरडला गेला. महसूल विभाग तर दावणीलाच बांधला गेला. जिल्हाधिकाऱ्यांवर दलाल म्हणून आरोप केला गेला. एवढं मोठं वस्त्रहरण होत असताना कावत यांनी मात्र सुधारणा करण्यासाठी कुठलेही पाऊल उचललं नाही. इतकंच नाही तर शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यावी असं निवेदन देण्यात आलं होतं. ती बाजू ऐकून घेण्याची तसदी घेण्याची गरज पोलीस अधीक्षकांना वाटली नाही. प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या तरी त्याची दखल घेतली नाही. बऱ्याच वेळा हा विषय महसूलचा आहे म्हणून जबाबदारी झटकण्याचं काम केलं गेलं.परिणामी रजाकारी जमान्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला गेला. निजामाकडे देखील कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम रजाकरांकडेच होतं. हा इतिहास पुन्हा नव्या रुपाने समोर आला.
रविवारी तर या सर्व प्रकाराची हद्द गाठल्या गेली. पाटोदा तालुक्यातील दासखेड ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत बेडूकवाडी येथील शेतकरी शिवाजी बाजीराव शिंदे व त्यांचा मुलगा बालाजी शिंदे या धोका पिता पुत्रांनी मावेजा मिळावा यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना शेतात का आले म्हणून जाब विचारला. पोलीस त्यांची मग काय ? या दोघा बाप लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे गुन्ह्याचं समर्थन करताना पोलिसांनी याची शहानिशा केली असं पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आलं. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास कंपनीचे बंदूकधारी कर्मचारी, त्यांनी पाळलेले गुंड, कामगार, जेसीबी सारख्या यंत्रणेला दोघाच जणांनी अडवलं हे बुद्धीला पटणार आहे काय? बाकीच्यांचा द्या हो सोडून आयपीएस अधिकाऱ्याला देखील सारासार विचार विवेक बुद्धीला हे पटतं का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे. कंपनीचे लोक शेतकऱ्याला खंडणीचा गुन्हा दाखल करूत म्हणून धमकावत होते धक्काबुकी करत होते. त्यावेळी संरक्षण देणारे पोलीस बघ्याची भूमिका का घेत होते हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. हा सर्व प्रकार म्हणजे ” उलटा चोर कोतवाल को डांटे” असं म्हणण्यासारखा आहे.
पवनचक्की कंपनीचा कर्मचारी मोहन रामा गाडे याच्या तक्रारीवरून कलम 115 (2), 126 (2), 308 (2), 308 (3) (5) अन्वये कामाला विरोध करणे जाणीवपूर्वक हत्येचा प्रयत्न करणे या अंतर्गत शिवाजी शिंदे व बालाजी शिंदे तसेच जेसीबी ऑपरेटर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मात्र पोलीस अधीक्षक कायदा सुव्यवस्थेचे हाकाटी किती जरी मारत असले तरी शेतकरी मात्र पवनचक्की कंपनींना साथ देऊन भरडून काढण्याचं काम करत आहेत. पोलीस यंत्रणेची प्रतिमा जिल्ह्यातील पवनचक्की बाधित शेतकऱ्यांमध्ये काय झाली आहे याचा आढावा एकदा पोलीस अधीक्षकांनी आवर्जून घ्यावा. म्हणजे प्रतिमा सकारात्मक झाली की नकारात्मक हे कळेल.
या सर्व घटना घडामोडीमुळे मात्र कांवत साहेब…! बीडमध्ये येऊन भरपूर नाव कमावलं; पवनचक्की कंपनीच्या नादात सगळंच गमावलं असं शेतकरी म्हणू लागले आहेत .
शेतकऱ्यांच स्वस्त केलयं मरण; पांचटपणाचा कळस म्हणजे विवेक जॉन्सन?
बीड — बहरलेल्या पिकात उभा केलेलं बुजगावणं किमान राखणीच तरी काम करत जी बुजगावण्याला किंमत आहे. ती किंमत देखील आपल्याला नसल्याचं चित्र जिल्ह्याचा करता ,करविता, न्यायाचं तराजू हातात घेणाराच जिल्हाधिकारी निर्माण करत असेल तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच मरण केलय स्वस्त; पांचट पणाचा कळस म्हणजे विवेक जॉन्सन चा कारभार मस्त असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. घटनाही तशीच घडली आहे.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन बीड जिल्ह्यात आले. येताच वर्तमानपत्रातून जनता दरबाराची घोषणा करून स्टंटबाजी निर्माण केली. जस जसा जनता दरबार भरू लागला. तसं तसं एकेक हास्यास्पद घटना घडामोडी समोर येऊ लागल्या. यातून शेतातल्या बुजगावण्याला किंमत असते ती देखील न ठेवण्याचा विडा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उचलल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर हे जिल्हाधिकाऱ्यांनी भरवलेल्या जनता दरबारात उपस्थित राहिले. बीड जिल्ह्यात 115 दिवसात 90 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारी मदत मिळाली नाही या संदर्भात निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. तर त्यांनाच मदत द्यायला काही हरकत नाही. देऊन टाका मोबदला? असं पांचट उत्तर दिलं. इतर जनतेच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांचा अंगरक्षक निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांना वाचून दाखवतो हे चित्र देखील पाहायला मिळाले.मग जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चीवर बसल्याचा विसरले होते काय? असा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी थिल्लर पणाचा कळस गाठला. याच जनता दरबाराचा आणखीन एक किस्सा समोर आल्याने बुजगावण्याची किंमत देखील आपल्याला नसल्याचं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सप्रमाण सिद्ध केलं.
पाटोदा तालुक्यातील पाचेगाव चे शेतकरी पवनचक्की कंपनी व पोलीस यंत्रणेच्या जात्यात भरडून निघत आहेत. शेतकऱ्यांना मावेजा न मिळणे एकसारखा मावेजा न देणे, धनादेश न वठणे, पोलिसासह पवनचक्की कंपनी व त्यांच्या गुंडांकडून होणाऱ्या दादागिरी विरोधात बुधवार दि. सात मे रोजी आक्रमक झाले. पाटोदा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडकेने अतिरिक्त कुमक बोलवत मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना सराईत गुन्हेगाराप्रमाणे पकडून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या संदर्भात आपल्याला न्याय मिळावा अशी पाचेगावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे रीतसर अर्ज करून मागणी केली. आता या प्रकरणाला न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गुरुवारच्या जनता दरबारात शेतकऱ्यांना बोलावून घेतले. शेतकऱ्यांना ही वाटले की जिल्हाधिकारी संबंधित अधिकारी, पवनचक्की कंपनी यांच्याशी बोलून तात्काळ प्रश्न मार्गी लावतील. पण कशाच काय? विवेक जॉन्सन यांनी थाटात शेतकऱ्यांना जनता दरबाराला बोलावलं. बिचारे शेतकरी आठवडी बाजाराचं काम सोडून किरायाने गाडी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात हजर झाले. जिल्हाधिकारी यांना भेटून मावेजा न देताच पवनचक्की कंपनी तारा ओढत असून पवनचक्कीचे काम मावेजा मिळेपर्यंत थांबवावे अशी कळवळून विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली. पण जनता दरबार भरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपण जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर बसलो आहोत याचा विसर पडला. पवनचक्की कंपन्यांनी सशुल्क संरक्षण मागितले असल्याने मला काम थांबवता येत नाही असं म्हणत तुम्ही पाटोदा तालुक्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना भेटून ते ठरवतील तो मावेजा घ्या मला यात काहीही करता येत नाही.माझ्या हातात नाही असे सांगितले. असा निर्लज्जपणाचा सल्ला देत शेतकऱ्यांना वाटी लावलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या हातातच काही नव्हतं. तर मग जनता दरबाराला खर्च करून शेतकऱ्यांना यायला का लावलं? असा प्रश्न विचारला जात आहे. बुजगावण्याची किंमतही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना नाही काय? असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. अविनाश पाठक नावाचा खोकला जाऊन विवेक जॉन्सन नावाचा पडसं आल्याचं शेतकऱ्यांमध्ये बोललं जाऊ लागला आहे. विवेक जॉन्सन यांचा जनता दरबार म्हणजे पांचटपणाची स्टंटबाजी असल्याचं बोललं जाऊ लागला आहे. विवेक जॉन्सन म्हणजे बोकडाच्या गळ्याला लोंबकळणार स्तन असल्याची खमंग चर्चा रंगू लागली आहे. यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच “स्वस्त केलय मरणं; पांचटपणाचा कळस म्हणजे विवेक जॉन्सन “असं डोक्यावर हात मारून म्हणण्याची वेळ आली आहे.
असा पांचटपणाचा कळस कधीच पाहिला नाही !
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आपण जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चीवर बसल्याचं विसरल्याचे अनेक किस्से जनता दरबारात पाहायला मिळतात. विवेक शून्य असलेला हा माणूस व त्याचा जनता दरबार म्हणजे पांचटपणाचा कळस असल्याचा अनुभव येत आहे. परिस्थितीच घटनेचं गांभीर्य नसलेला जिल्हाधिकारी पालकमंत्री अजित पवार यांनी बीडच्या माथी मारला आहे. यातून जिल्ह्याच्या विकासाची तळमळ पालक मंत्र्यांना नसल्याचं दिसत आहे. इतका अंदा धुंद असलेला कारभार यापूर्वीच्या काळात कधीच आला नाही.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर,
सामाजिक कार्यकर्ते











