बीड –अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन शिक्षकांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना आज बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच जुलै पर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे.
या प्रकरणात आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज ती कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर बीडमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून हे दोघेही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय असल्याचं समोर येत असल्याने राजकीय वातावरणही तापलं.विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीची छेड काढून क्लासेसच्या केबिनमध्ये लैंगिक छळ केला जात होता. घडलेला प्रकार मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितला. मात्र, शिक्षकांकडून होणारा त्रास असाह्य झाल्याने मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. या तक्रारीनंतर दोन्ही शिक्षकांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बीड लैंगिक छळ : शिक्षकांची पोलीस कोठडी 5 जुलैपर्यंत वाढली
लैंगिक छळ प्रकरणाचा तपास वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
धनंजय मुंडे यांच्या मागणीला 24 तासातच यश
प्रकरण अतिशय गंभीर, आरोपी आणि त्यांना आश्रय देणारे, कुणालाही सोडणार नाही – देवेंद्र फडणवीस
मुंबई – माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी बीड शहरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी केलेल्या मागणीला राज्य सरकारने २४ तासातच मान्य केले असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता एका वरिष्ठ महिला आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) मार्फत केला जाणार असून, याबाबतची अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात केली आहे.
बीड येथे घडलेले प्रकरण अतिशय गंभीर व माणुसकीला आणि शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे आहे. या प्रकरणात अशाच प्रकारे आणखी काही मुलींचे देखील लैंगिक शोषण झाल्याची शंका नाकारता येत नाही, त्यामुळे असे प्रकार घडलेल्या मुलींनी आता स्वतःहून समोर येऊन तक्रार द्यावी, या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागावा, यातील दोषी व त्यांना मदत करणारे तसेच त्यांना राजकीय किंवा सामाजिक बळ देणारे हे कोण आहेत, ते निष्पन्न व्हावेत व त्यांना कठोर शिक्षा व्हावी, ही सरकारची व नवनियुक्त SIT समितीची भूमिका असेल, दोषी असलेल्या कुणालाही सोडले जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
धनंजय मुंडे यांच्या सह आज सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनीही आज हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. दरम्यान या तपास पथकाला कालमर्यादा निश्चित करून दिली जाणार असून, त्यांनी दिलेल्या वेळेत तपास पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे, असेही श्री फडणवीस म्हणाले.
या घोषणेनंतर धनंजय मुंडे यांनी आपण केलेली मागणी राज्य सरकारने २४ तासांच्या आत मान्य केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले असून, या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळेपर्यंत आपण हे प्रकरण लावून धरू असा निर्धार मुंडेंनी व्यक्त केला आहे.
संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर पलटवार; “मी 150 दिवस पळून गेलो नाही!”
बीड– ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थिनीच्या छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आरोपी विजय पवार, हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी केला होता.
मुंडे यांनी थेट संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करत, विजय पवार याच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या रात्री तो क्षीरसागरां सोबत असल्याचे म्हटले होते. तसेच, पीडितेच्या वडिलांना दोन दिवसांत 20 फोन केल्याचा गंभीर आरोपही मुंडे यांनी केला होता. आता या आरोपांवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
संदीप क्षीरसागर यांनी आज धनंजय मुंडे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना स्पष्ट केले की, मुंडे यांची मागणी एसआयटी चौकशीची आहे आणि त्याला पूर्ण संमती आहे. “जो प्रकार घडला तो अत्यंत चुकीचा आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच आरोपी शिक्षकांना अटक झाली आहे,” असे क्षीरसागर म्हणाले. प्रशासनासोबत चर्चा सुरू असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याचेही त्यांनी सांगितले. “माझ्या जवळचे असले तरी कारवाई करायला मागे-पुढे बघू नका, असे मी स्वतः पोलिसांना सांगितले आहे,” असेही त्यांनी नमूद केले. पीडितेने तक्रार दिल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल झाला. दहा दिवस लागले नाही. असं सांगत त्यांनी हे प्रकरण तातडीने हाताळले गेल्याचे सांगितले.
यावेळी संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. “मी काही त्यांच्यासारखं 150 दिवस पळून गेलो नाही,” असे ते म्हणाले. त्यांचे मंत्रीपद गेल्याने त्यांना दुःख झाले असून, त्यामुळेच ते या प्रकरणात बोलत असल्याचा आरोपही क्षीरसागरांनी केला. “या प्रकरणात ते जसे बोलत आहेत, तसेच त्यांनी ‘मस्साजोग’ प्रकरणीही आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती,” असा पलटवार त्यांनी केला. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, असेही क्षीरसागर म्हणाले.
संदीप क्षीरसागर यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणात पोलीस देखील तत्परतेने कारवाई करत आहेत. “मी आता बोलण्यापेक्षा सत्तेत मुंडे आहेत, त्यांनी जोर लावला पाहिजे,” असे ते म्हणाले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना 150 दिवस बाहेर राहावे लागले, त्यांचे मंत्रीपद गेले, त्यामुळेच त्यांना दुःख आहे असेही क्षीरसागर यांनी पुन्हा अधोरेखित केले. “लोकप्रतिनिधी म्हणून मी रोज रस्त्यावर काम करतो. चहाच्या टपरीवरही मी जातो, तिथे लोक भेटतात. संबंधित लोक माझ्या ओळखीचे आहेत. पीडितेकडे मी जाणार होतो, पण सध्या जाणं योग्य नाही म्हणून गेलो नाही,” असही त्यांनी स्पष्ट केलं.
आषाढी वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार! गळ्याला कोयता लावून दागिने लुटले
पुणे — आषाढी वारीसाठी पंढरपूर इथं निघालेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर दोन तरूणांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडली.
त्याचबरोबर मुलीच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दीड लाख रूपयांचे दागिने लुटण्यात आले आहेत. या प्रकारामुळं एकच खळबळ उडाली असून सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त असताना हा घृणास्पद प्रकार घडल्यानं पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचोली (ता. दौंड) इथं 30 जून रोजी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. आषाढी वारीसाठी महामार्गाने पंढरपूरकडे चारचाकी वाहनात निघालेलं एक कुटुंब चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबले होतं. तेव्हा दुचाकीवरून दोन तरूण तिथं आले. त्यांनी हातातील शस्त्राचा धाक दाखवून त्या कुटुंबीयांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकली. त्यानंतर चहा पिण्यासाठी वाहनातून खाली उतरलेल्या तीन महिलांच्या अंगावरील सोन्याचं डोरलं, कर्णफुले व मंगळसूत्र अमानुषपणे ओरबाडून काढलं.
त्यानंतर कुटुंबीयांसह असलेल्या अल्पवयीन मुलीला चहाच्या टपरीच्या मागे असलेल्या नाल्याकडं नेण्यात आलं तिथं शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकारानं संबंधित अल्पवयीन मुलगी व तिचे कुटुंबीय पूर्णपणे हादरुन गेलेलं आहे. आषाढी वारीसाठी सर्वत्र पोलिस बंदोबस्त असताना आणि दौंड पोलिसांची गस्त सुरू असतानाही हा घृणास्पद प्रकार घडल्यानं पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञाताविरूध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात पॉक्सो व बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
परळी — तालुक्यातील सिरसाळा येथील शेत जमिनीकडे जाणारा रस्ता खुला करून देण्यात यावा अशी मागणी करणार निवेदन देऊनही कुठलीच कारवाई झाली नाही. शेवटी संतापलेल्या शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हाणून पाडला.
ज्ञानेश्वर दहिफळे यांची सिरसाळा येथील गट नंबर 390 मध्ये शेती असून त्या शेतीकडे जाणारा रस्ता अडविण्यात आल्यामुळे ते आपल्या जमिनीवर कोणतेही शेतीकाम करू शकत नाहीत. परिणामी, जमीन पडीक पडली असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या संदर्भात दहिफळे यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज, निवेदने दिली. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दहिफळे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. अखेर सोमवारी तहसील कार्यालयासमोर त्यांनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
सोमवारी सकाळी ड्युटीच्या वेळी हेल्मेट नसणारा विरुद्ध कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयाजवळ पोलिसांचे पथक आले होते तेव्हा परळी शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंगणे, पोलिसा अंमलदार आकाश जाधव, ट्राफिक पोलीस अंमलदार प्रल्हाद भताने या पोलिसांनी वेळेवर धाव घेत शेतकऱ्याला ताब्यात घेतले.
एसटी प्रवाशांना 1 जुलैपासून तिकीट दर ‘इतक्या’ टक्क्यांची सवलत मिळणार
मुंबई — बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात थेट 15 टक्के सवलत जाहीर केली आहे.ही योजना येत्या 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहे.
ही सवलत 150 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी लागू असणार असून, केवळ पूर्ण तिकीटधारक प्रवाशांनाच (सवलत धारकांना नाही) याचा लाभ मिळणार आहे. दिवाळी व उन्हाळी गर्दीचा कालावधी वगळता वर्षभर ही योजना राबवली जाणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली आहे.
राज्यातील धार्मिक आणि सणांच्या पार्श्वभूमीवरही ही सवलत प्रवाशांना दिली जाणार आहे. येत्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या नियमित एसटी बसेससाठी आगाऊ आरक्षण केल्यास प्रवाशांना 15% सवलतीचा फायदा मिळेल. मात्र, जादा बसेससाठी ही सवलत लागू होणार नाही.
त्याचप्रमाणे, गणपती उत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाही आगाऊ आरक्षणासोबत ही सूट मिळणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळातही प्रवासाचा खर्च थोडा हलका होणार आहे.
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इ-शिवनेरी बसच्या प्रवाशांनाही या योजनेचा पुरेपूर लाभ घेता येणार आहे. पूर्ण तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना 15% सवलत मिळणार असून, आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ‘MSRTC Bus Reservation’ मोबाईल ॲप द्वारे बुकिंग करणे आवश्यक आहे. तसेच तिकीट खिडकीवरून बुकिंग करणाऱ्यांनाही ही सूट लागू करण्यात येणार आहे.
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी बीडमध्ये कॅन्डल मार्च
बीड — शहरात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळप्रकरणी संतप्त नागरिकांनी सोमवारी (दि.३०) सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त केला. यावेळी सर्व स्तरांतील महिला, युवती व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
हातात कॅन्डल्स व मागण्यांचे फलक घेत सहभागी महिलांनी मुलगी आहे, अबला नाही, अत्याचाऱ्यांना माफी नाही; बीड जागं झालं, न्यायासाठी उभं राहिलं; नराधमांनो, चुकीला माफी नाही आणि एसआयटी स्थापन झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून केवळ नराधम आरोपीच नाही, तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही निषेध करण्यात आला. ठोस कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी सर्वस्तरातील महिला, कार्यकर्त्यांसह नागरिकांची उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कॅण्डल मार्चचा समारोप झाला.
पीडितेला न्याय मिळेपर्यंत संघर्ष चालू राहणार
आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींना सहआरोपी करण्यात यावे. प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावी. चौकशी महिला आयपीएस अधिकाऱ्यांकडूनच करण्यात यावी. पीडितेला न्याय मिळेपर्यंत संघर्ष चालू ठेवला जाईल, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
बीड अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एस आय टी चौकशीची धनंजय मुंडेंची मागणी
बीड — उमाकिरण शैक्षणिक संकुलात घडलेला प्रकार दुर्दैवी व संतापजनक आहे. यातील आरोपी विजय पवारला राजकीय बळ आहे, बीडचे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या आश्रयाने व वरदहस्ताने या लोकांची इथपर्यंत मजल गेली आहे. या प्रकरणी व्यवस्थित तपास होऊन याधीही असे गुन्हे या लोकांनी केले आहेत का, याची सविस्तर चौकशी होणे अपेक्षित आहे, म्हणून आपण या प्रकरणी एस आय टी चौकशीची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी करणार असल्याचे माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी आज बीड येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू होता, त्या अल्पवयीन भगिनी ने जी अत्याचार सहन केला, त्याची पीडा ती स्वतः व तिचे पालकच समजू शकतात.मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सोबत होते, अशी माहिती मिळाली आहे. त्यांचे संबंध नेमके कशाचे आहेत? हे संबंध आर्थिक आहेत की आणखी काही असा घणाघात आ.धनंजय मुंडे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची महिला आयपीएस अधिकार्यामार्फत एसआयटी नेमून चौकशी केली जावी असेही आ.धनंजय मुंडे म्हणाले.
बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आ.धनंजय मुंडे यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. उमाकिरण मध्ये एक प्रकार समोर आलाय मात्र अशा अनेक घटना घडलेल्या असाव्यात असा संशय असल्याचे आ.मुंडे म्हणाले. कमी शुल्काचे आमिश दाखवून विद्यार्थ्यांना वाममार्गाला लावण्याचा प्रकार विजय पवार व त्याच्या सहकार्याच्या माध्यमातून होत होता असा दावाही आ.धनंजय मुंडे यांनी केला आहे.
आरोपी विजय पवार, प्रशांत खटोकर यांना हे सर्व करता आले त्यामागे त्याला राजकीय आश्रय होता. गुन्हा दाखल झाला त्या दिवसाचे दोन आरोपी आणि त्या पाठबळ देणार्यांचे सीडीआर काढावेत असे आव्हान देखील आ.धनंजय मुंडे यांनी पोलीस प्रशासनाला दिले. पोलीस ज्या पद्धतीने हा तपास करत आहेत त्या पद्धतीने आरोपीला शिक्षा होईल असे वाटत नाही त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी महिला आयपीएस अधिकार्यामार्फत एसआयटी गठीत करून व्हावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे व दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत असेही आ.मुंडे म्हणाले.
तत्पूर्वी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत तसेच या प्रकरणात नियुक्त तपास अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून सुरू असलेल्या तपासाची चौकशी केली.
अशा नीच वृत्तीच्या लोकांनी असे किती गुन्हे याआधी केलेत तेही उघड होऊन यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच खाजगी कोचिंग क्लासेस चालकांना फी वसुली सह सुरक्षेच्या दृष्टीने शासनाकडून एक संहिता लागू असावी, याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, फारुक पटेल, ॲड. गोविंद फड, दादासाहेब मुंडे, भागवत तावरे, यांसह याप्रकरणी आंदोलन पुकारलेले पालक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाकरे बंधूंसह जनतेच्या विरोधा पुढे सरकार नमले;त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द
मुंबई — गेल्या काही दिवसांपासून राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या निर्णयाला कठोर विरोध केला जात आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात दंड थोपटले होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने तसा निर्णय घेतला होता.
मात्र सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत होता. मराठी भाषा वाचवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत 5 जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपाला हा निर्णय महागात पडणारा होता.आता हाच विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत. तसेच एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेचा समावेश करण्याबाबतचे दोन्ही जीआर सरकारने रद्द केले आहेत. तशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत केली.यावेळी बोलताना, त्रिभाच्या सूत्रांच्या संदर्भात तिसरी भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी? ती कशा प्रकारे करावी? मुलांना कोणता पर्याय द्यावा? याबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्त्वात एका समितीची स्थापना करण्यात येईल. नरेंद्र जाधव हे कुलगुरू होते, ते नियोजन आयोगाचे सदस्य होते. आपण त्यांना शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखतो. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वात एका समितीची स्थापना केली जाईल. यात आणखी काही सदस्य असतील. त्यांचीही नावे लवकरच घोषित केली जातील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली तसेच, या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र या रिपोर्टच्या आधारावच लागू केला जाईल. म्हणूनच 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करत आहोत, अशी घोषणाही फडणवीस यांनी केली.
उमाकिरण अत्याचार प्रकरण:विजय पवारच्या चेहऱ्यावर माज कायम; दोन दिवसांची पोलीस कोठडी
बीड — अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री विजय पवार व प्रशांत खटोकरला पकडले. दरम्यान दुपारी न्यायालयात हजर करत असताना विजय पवार च्या थोबाडावर अजूनही माज,मस्ती कायम असल्याचं पाहायला मिळालं. न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी पुकारण्यात आलेला जिल्हा बंद मागे घेण्यात आला आहे.
रविवारी दुपारी दीडच्या सुमारास दोन्हीही नराधमांना शहर पोलीस ठाण्यातून न्यायालयात घेऊन जाण्यात आले.यावेळी विजय पवार च्या हालचालीत मग्रुरी व चेहऱ्यावर माज कायम असल्याचं दिसत होतं. झालेल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप चेहऱ्यावर नव्हता. सराईत गुन्हेगाराला लाजवेल अशी त्याची चाल होती. दरम्यान न्यायालय परिसरात यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोपीच्या वतीने ऍड बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली. यावेळी पोलिसांनी मोबाईल रिकव्हर करण्यासाठी पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी न्यायालयाने 1जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
उद्याचा जिल्हा बंद मागे ..
उमाकिरण संकुलमधील क्लासेसच्या विद्यार्थीनीची छेड काढून फरार असलेले प्रा.विजय पवार व प्रशांत खाटोकर यांना बीड पोलिसांनी तात्काळ सुत्रे हलवून अटक केली. यामुळे पवार, खाटोकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोमवारी (दि.30) पुकारण्यात आलेला बीड जिल्हा बंद मागे घेण्यात येत असल्याचे स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.महेश धांडे, राष्ट्रवादीचे युवा नेते शिवराज बांगर, वंचितचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांनी सांगितले. दरम्यान, पीडितेला न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचे प्रा.उबाळे,अॅड धांडे यांनी सांगितले.











