Home Blog Page 66

होळ येथे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुशराव शिंदे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

0

जंगी मिरवणूक काढून नागरी सत्कार; माजी मुख्य न्यायमूर्ती संभाजीराव शिंदे यांची विशेष उपस्थिती

केज — तालुक्यातील होळचे सुपुत्र, राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुशराव शिंदे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता होळ येथील हनुमान मंदिरात करण्यात आले. या सोहळ्यापूर्वी ग्रामस्थांनी जंगी मिरवणूक काढून त्यांचे उस्फूर्त स्वागत केले.

कार्यक्रमाला राजस्थानचे माजी मुख्य न्यायमूर्ती संभाजीराव शिंदे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सोहळ्याचे अध्यक्षस्थान सरपंच अश्विनीताई शिंदे यांनी भूषविले. प्रमुख अतिथींमध्ये मांजरा कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दत्ता शिंदे, माजी सरकारी वकील अ‍ॅड.प्रकाश शिंदे, पुणे सीआयडीचे माजी पोलीस उपअधीक्षक दीपक शिंदे, केंद्रप्रमुख रमेश कांबळे, माजी प्राचार्य डॉ.ज्ञानोबा सरवदे, बारामती अ‍ॅग्रोचे प्रबंधक अंकुश ढवारे, मुख्याध्यापक धर्मराज शिंदे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ.नवनाथ घुगे, डॉ.गणेश ढवारे यांचा समावेश होता. यावेळी मान्यवरांचा होळ ग्रामस्थांच्यावतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली. होळ गावातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा झालेला हा गौरव सोहळा ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण ठरला. यावेळी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरही उपस्थित होते

आठवणींना उजाळा

या सोहळ्यात संभाजीराव शिंदे व अंकुशराव शिंदे यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनापासून ते आजवरच्या प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. दोघेही बनेश्वर शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी असल्याने शिक्षण संस्थेबद्दल व होळच्या मातीतून मिळालेल्या संस्कारांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या भाषणातून गावाशी असलेली घट्ट नाळ प्रकर्षाने जाणवली.

“व्होट चोरी भारत मातेवरचा हल्ला” सत्तेत आल्यावर कारवाईचा निवडणूक आयोगाला राहुल गांधींचा इशारा

0

गया (बिहार) — निवडणूक आयोगा विरोधात राहुल गांधी यांनी चांगलेच दंड थोपटले आहेत.व्होट चोरी म्हणजे भारतमातेवर हल्लाच असून ‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यावर मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांवर कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज दिला.
मतदार अधिकार यात्रे’दरम्यान येथे घेतलेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. ”पंतप्रधान मोदी ज्याप्रमाणे विशेष पॅकेजबाबत बोलत असतात, त्याचप्रमाणे आयोगानेही मतदारयादी पडताळणीच्या रूपाने नवे पॅकेज आणले आहे. हा मतदान चोरीचाच नवा प्रकार आहे. ही चोरी उघडकीस आल्यानंतरही निवडणूक आयोग मला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगत आहे. मात्र सर्व देश त्यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगत आहे. आम्हाला आणखी थोडा वेळ द्या, प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मतचोरी आम्ही उघडकीस आणू आणि तुम्हाला जनतेसमोर उभे करू,” असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यावरही थेट टीका केली. ”मी कधीही खोटे बोलत नाही. मात्र या तीन निवडणूक आयुक्तांनी भाजपचे सदस्यत्व घेतले असून ते त्यांच्यासाठीच काम करत आहेत. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही बिहारमध्ये आणि केंद्रात सत्तेवर येऊ, तेव्हा तुम्हा तिघांवर कारवाई करू. तुम्ही तिघांनी मतचोरी केली आहे,” असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले.

‘घटना म्हणजेच भारतमाता’

पावसातही सभा सुरूच ठेवत राहुल म्हणाले, ”राज्यघटना हीच भारतमाता आहे. ही राज्यघटना डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार पटेल व पंडित नेहरू यांच्यासारख्या नेत्यांनी तयार केली. हाच भारताचा आत्मा आहे. जेव्हा मतांची चोरी होते, तेव्हा भारतमातेवर हल्ला झालेला असतो.”

कावतां च्या इभ्रतीला फासली जातेय “राख”; गोसावी बनवून घालवणार का सगळीच साख?

0

बीड — बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत इव्हेंटच्या स्टंटबाजीने प्रसिद्धीच्या झोतात रहात असले तरी त्यांच्या इभ्रतीला “राख “फासण्याचं काम एपीआय चंद्रकांत गोसावी कडून होऊ लागल्याचं पाहायला मिळत आहे. गोविंद राख नावाच्या कर्मचाऱ्याची बदली झाली. तात्काळ पदभार सोडण्याचे आदेश दिले. पण तो प्रामाणिकपणे अवैध धंद्यातून मिळणाऱ्या कमाईची वसुली करून देणारा असल्याने एसपींचीच दिशाभूल करून बदली रोखण्यात यश मिळवल्याची माहिती मिळत आहे.
गोविंद राख” माणूस तसा प्रामाणिक …!वसुलीची जबाबदारी गोसावींनी सोपवली ती अगदी प्रामाणिकपणे “नशा युक्त अभियानाला” प्राधान्य देत कमाई करून देणारा…! वाळू उपशातून होणारी कमाई असो की अवैध धंद्यातून असो की गौण खनिजातून प्रत्येक वेळी वर कमाईच्या आकडेवारीची कमान उंचावलेलीच ठेवली. त्यामुळे तो गोसावीं चा “खास माणूस” या प्रकारामध्ये मोडला जातो. गोविंद राख यांची बदली तीन साडेतीन महिन्यापूर्वी पिंपळनेर पोलीस ठाण्यात झाली. 15-20 दिवसाचा कालावधी उलटत नाही तोच नेकनूर पोलीस ठाण्यातील वसुलीचा चांगला अनुभव असल्याच्या कारणावरून बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ बदली झाली. बाकी वसुली सोडली तर पोलीस यंत्रणेच्या कर्तव्याची कुठलीच मोठी कामगिरी हातातून न पार पडलेलं व्यक्तिमत्व…! बदली करताना पोलीस अधीक्षकांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे असे आदेश दिले. पण एस पी चे आदेश मानतील ते चंद्रकांत गोसावी कसले? गोसावींनी राखची बदली होताच इमोशनल करण्याचा डाव खेळला नेमके त्या डावालाच एस पी भुलले. त्याचवेळी नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत पवनचक्की रखवालदाराने गोळीबार केला त्यामध्ये एक चोरटा मारला गेला. या संधीचं सोन गोसावींनी केलं. कायदा सुव्यवस्थेच, मनुष्यबळाचं कारण पुढे केलं. पोलीस अधीक्षकांना फोन लावून चार-पाच दिवस गोविंद राख यांना नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत राहू द्या अशी विनंती केली. यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास एसपींना नडला. याचाच गैरफायदा घेतला गेला. तीन साडेतीन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील गोविंद राख अजूनही नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तो असेना का? अडचण काहीच नाही. पण कर्तव्य सोडून वसुलीच्या कामात प्रामाणिकपणा दाखवत अवैध धंद्यांना खतपाणी घालण्याची कृती मात्र सर्वसामान्य जनतेच्या मुळावर उठू लागली आहे. जिथे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत सारख्या कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकाऱ्याचा आदेश डावलला जात असेल ? त्यांनाच दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला जात असेल? अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिले जात असेल? त्यातून होणाऱ्या कमाईवर लक्ष ठेवले जात असेल? तर कावत यांच्या इभ्रतीला (साख) राख फासण्याच काम केलं जात असल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे आणि उपाययोजना करण्याची आ. क्षीरसागरांनी केली मागणी

0
बीड — मागील काही  दिवसांपासून संपूर्ण बीड जिल्ह्यात अखंडित पाऊस पडत आहे. झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिकांबरोबरच पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी गावांना जोडणारे पूल वाहून गेले आहेत. या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासोबत बैठक घेऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली.
                   गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात संततधार पाऊस सुरू आहे. बीड जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे बीड मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबत पशुधनाचेही  नूकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी गावांना जोडणारे अनेक पूल वाहून गेले आहेत. याबाबत प्रशासकीय स्तरावरून उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानींचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली.
 
तेलगाव नाका अपघातासंदर्भातही घेतली संबंधित संयुक्त विभागांची बैठक
              शनिवारी (दि.१९) रोजी बीड नगर परिषदेचे कर्मचारी शेख बाबू यांचा अपघाती मृत्यू झाला होता. बीड शहरातील तेलगाव रोडवर जलजीवन पाणीपुरवठा योजना आणि रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर एका बाजूनेच वाहतूक सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका तरूणाचाही या रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला होता. आणि आता एका जेष्ठ नागरिकाचा बळी गेला आहे. त्याअनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण व नगरपरिषद यांची संयुक्त बैठक घेऊन पुन्हा एखाद्या नागरिकाचा नाहक बळी जाणार नाही यासाठी उपाययोजना करा. असे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

वाल्मिक कराडच्या जामीनाला विरोध; ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी

0

बीड — मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या मकोका कोर्टात तब्बल तीन तास सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कराडच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला
तर आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी तब्बल पावणे दोन तास युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने कोणताही निर्णय न देता पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडच्या जामीन अर्जाला न्यायालयात जोरदार विरोध केला. या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे याने दाखल केलेल्या दोषमुक्ती अर्जावरही निकम यांनी सडेतोड युक्तिवाद केला. ​आजची सुनावणी तब्बल तीन तास पार पडली.. यामध्ये वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तिवाद केला.

अटक करताना कराडला अटकेची कारणे सांगितली गेली नव्हती. मात्र, निकम यांनी हा दावा खोडून काढला. तसेच आवादा कंपनीचे कर्मचारी सुनील शिंदे यांनी रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलची तारीख चुकीची असल्याचा आरोपींचा दावा निकम यांनी सीडीआर सादर करून फेटाळला. सीडीआरनुसार कराडने त्या दिवशी फोन केल्याची नोंद आहे, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या संभाषणाशी संबंधित प्रत्यक्ष पुरावे योग्य वेळी सादर केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

विष्णू चाटेच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद
​विष्णू चाटेच्या वकिलांनी त्याच्यावर कोणताही गुन्हा नसल्याचा दावा केला. यावर निकम यांनी चाटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली. खंडणीच्या प्रकरणात विष्णू चाटे हा वाल्मीक कराडचा ‘उजवा हात’ होता आणि त्याने कराडला पूर्णपणे सहकार्य केले, असे निकम यांनी न्यायालयाला सांगितले. मकोका कायद्याच्या तरतुदी या गुन्ह्याला लागू होतात, आरोपीला नाही, असे स्पष्ट करत त्यांनी चाटेचा दोषमुक्ती अर्ज फेटाळण्याची मागणी केली.

परळी तालुक्यातील कौडगाव हुडा येथील नदीत चार चाकी गाडी गेली वाहून

0

धनंजय मुंडे यांनी रात्रीतून हलवली यंत्रणा

गाडीतील चार पैकी तिघांना वाचवण्यात बचाव पथकांना यश

परळी — तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी सदृश परिस्थिती असून परिणामी गावागावांतील नद्यांना पूर आला आहे. याचा फटका कौडगाव हुडा येथील तरुणांना बसला असून कौडगाव हुडा येथील तरुणांची चार चाकी कार गाव नदीच्या पुरत रात्री उशिरा वाहून गेली. या गाडीतील चौघांपैकी तीन जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले असून एक तरुण मयत झाला असून त्याचे पार्थिव सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

रविवारी मध्यरात्री कौडगाव – कासारवाडी रस्त्यावर मारुती बलिनो गाडी पुरात वाहून गेली. ही घटना रविवारी रात्री ११:३० ते १२ च्या दरम्यान घडली असून या घटनेची माहिती स्थानिकांनी तत्काळ या भागाचे आमदार धनंजय मुंडे यांना कळवली आता श्री मुंडे यांनी तात्काळ प्रशासकीय यंत्रणांना सज्ज करून बचाव कार्याला वेग आणला. उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, सिरसाळा पोलीस ठाण्याचे सपोनी गोरक्षनाथ दहिफळे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, जगमीत्र कार्यालयाचे समन्वयक बाबुराव रुपनर हे बचाव पथकांना घेऊन मध्यरात्री घटना स्थळी दाखल झाले होते. पाण्याचा प्रवाह अत्यंत जास्त असल्याने बचाव कार्याला अडथळे येत होते, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मार्फत बीडचे जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कार्यालयास संपर्क करून एन डी आर एफ च्या पथकास पाचारण करण्यात आले. हे पथकही तातडीने रवाना झाले.

दरम्यान या घटनेत वाहून गेलेल्या अमर मधुकर पौळ (वय २२) रा. डिग्रस, राहुल संपती पौळ (वय ३२), राहुल सटवाजी नवले (वय २२) रा. फुलारवाडी ता. पाथ्री या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले असून विशाल बल्लाळ (वय २४) रा. बोरी सावरगाव ता. केज हा तरुण मयत झाला असून त्याचा मृतदेह सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

पहाटे युवक नेते अजय मुंडे हे घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी ग्रामस्थांशी व प्रशासकीय यंत्रणांशी चर्चा केली. धनंजय मुंडे हेही दूरध्वनीवरून रात्रभर यंत्रणांच्या संपर्कात होते, तसेच त्यांचे सहकारी राजाभाऊ पौळ, सुभाष नाटकर, तसेच धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाची टीम घटनास्थळी मदत कार्यात उपस्थिती होती.

प्रशासन अलर्टवर, नागरिकांनी सतर्क रहावे – धनंजय मुंडे

दरम्यान परळी वैद्यनाथ मतदारसंघांत परळी शहरासह विविध गावातील अनेक नद्यांना पूर आले असून प्रशासन २४ तास अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, नदी काठी राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी तसेच कोणतीही आपत्ती उद्भवत असल्यास तातडीने सुरक्षित स्थळी जावे, कुठल्याही पुलावरून पानी वाहत असल्यास त्यातून वाहने घालू नयेत, तसेच आपत्ती काळात माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

दोन वर्षांच्या चिमुकलीला संपवून आईची आत्महत्या

0

गेवराई — 25 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला फाशी देऊन स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मालेगाव मध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास घडली
सोमवारी 18 ऑगस्टला दुपारच्या सुमारास अंकिता बळीराम घवाडे वय 25 वर्ष या विवाहितेने घरातील माळवदाच्या हलकडीला दोरीच्या साहाय्याने आपल्या मुलगी शिवप्रीती बळीराम घवाडे व दोन वर्ष हिला फाशी दिली आणि तिचा जीव घेतला. त्यानंतर तिने स्वतःही त्याच ठिकाणी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. ही घटना लक्षात आल्यानंतर तातडीने शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी पोलिसांना कळविले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेत ते बीड येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या पोलिस शवविच्छेदन अहवालाची वाट बघत आहेत. अद्याप या प्रकारामागचे नेमके कारण समजू शकले नाही.
घरगुती कलह, आर्थिक समस्या किंवा मानसिक ताणतणावामुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. तथापि, याबाबतचे खरे कारण पोलिसांच्या पुढील तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.आईने आपल्या दोन वर्षांच्या लेकीचा जीव घेऊन स्वतःचेही जीवन संपवल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या हृदयद्रावक घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे. या आईने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत मात्र सध्या काहीही माहिती नाही.

मनोहरराव कुलकर्णी (पेंटर)यांना पत्नी शोक

0

चौसाळा — मनोहरराव कुलकर्णी (पेंटर) हिंगणीकर यांच्या पत्नी सौ.सिंधुबाई कुलकर्णी यांचं पहाटेच्या सुमारास सोमवारी निधन झालं. मृत्यू समयी त्या 85 वर्षाच्या होत्या.
सौ.सिंधुबाई कुलकर्णी यांचा आयुष्याचा बराचसा काळ बीडमध्ये गेला. मनमिळावू, आपुलकीची भावना ठेवणारा स्वभाव यामुळे चौसाळा पंचक्रोशीत त्या परिचित होत्या. बीड शहरात “मनोहर आर्ट्स” नावाने प्रसिद्ध असलेल्या मनोहर पेंटर कुलकर्णी यांच्या त्या पत्नी होत्या. चौसाळा येथील स्मशानभूमीत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी चौसाळा परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा,सून ,दोन मुली, जावई ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; नातेवाईकांचा आगारात ठिय्या

0

गेवराई — वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सहा महिन्यापूर्वीच हा कर्मचारी अनुकंपा तत्वावर नोकरीला लागला होता. दरम्यान संतप्त नातेवाईकांनी आगार प्रमुखाच्या कार्यालयासमोर मृतदेह नातेवाईकांनी आणून ठेवत ठिय्या दिला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
प्रितेश जयराम मोहीते वय 32 वर्ष रा. मादळमोही, ता. गेवराई, जि. बीड असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचा-याचे नाव आहे.
सहा महिन्यांपूर्वीच अनुकंपा तत्वावर एसटी महामंडळात प्रितेश मोहीते नोकरीला लागले होते. मात्र, नोकरी करत असताना कर्मचाऱ्यास गेवराईच्या आगारातील वरिष्ठांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून अखेर एसटी कर्मचारी प्रितेश मोहीते यांनी राहत्या घरी मंगळवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर एसटी कर्मचारी यांचा मृतदेह संतप्त नातेवाईकांनी थेट गेवराई आगार प्रमुख यांच्या कार्यालयासमोर ठेवून ठिय्या मांडला. दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला.
या घटनेची माहीती मिळताच गेवराईचे एपीआय प्रविणकुमार बांगर, एपीआय दिपक लंके, संतोष जंजाळ आगारात दाखल होऊन योग्य तो पोलिस तपास करुन दोषी आढळल्यास गून्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले.तेव्हा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी नेला. दरम्यान, प्रितेश मोहीते हे नेहमी प्रमाणे आज मंगळवार एसटी आगारात हजेरी लावली होती. त्यानंतर ते गावी मादळमोहीला गेले अन् सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांनी रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आधार कार्ड, पॅन कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही — उच्च न्यायालय

0

मुंबई — आपल्याकडे आधार कार्ड आहे शिवाय निवडणूक ओळखपत्र आणि पॅन कार्डदेखील आहे. हे तीन कागदपत्रे महत्त्वाची असली तरी त्यातून तुम्ही देशाचे नागरिक आहात, हे सिद्ध होत नाही. त्यामुळे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र असले तरी कुणी भारतीय नागरिक होत नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एका बांगलादेशी आरोपीला जामीन देण्यास नकार दिला आहे.
एवढेच नाही तर आरोपीने सादर केलेल्या सर्व ओळखपत्रांची सरकारी संस्थेकडून फेरतपासणी करण्याचे आदेशही एक सदस्यीय खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी वरील तीन ओळखपत्र पुरेशी नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

ठाणे पोलिसांनी गेल्यावर्षी एकाला बांगलादेशी असल्याच्या कारणावरून अटक केली होती. या आरोपीने खोट्या माहितीच्या आधारे ठाण्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, प्राप्तिकर कागदपत्रे तसेच गॅस आणि विजेची जोडणी मिळवली होती. त्याला सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अपील केले होते. तेही फेटाळण्यात आले आहे.

भारतीय नागरिक नक्की कोण हे ठरवण्यासाठी संसदेने नागरिकत्व कायदा, 1955 तयार करून अंमलात आणला आहे. त्यातील तरतुदींच्या आधारेच कोणीही भारतीय नागरिक आहे की नाही, हे सिद्ध करता येऊ शकते. नागरिकत्वासंदर्भात कोणताही वाद असेल, तर याच कायद्यातील तरतुदींचा विचार करावा लागतो. याच कायद्यामध्ये अधिकृत नागरिक आणि बेकायदा स्थलांतरित यांच्यामध्ये नेमकेपणाने फरक करण्यात आला आहे. ज्या व्यक्ती बेकायदापणे भारतात स्थलांतरित झाल्या आहेत, त्यांना कायदेशीर पद्धतीने भारताचे नागरिकत्व घेण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. जे कायद्याने भारतीय नागरिक आहेत, त्यांनाच या देशाच्या राज्यघटनेने दिलेले अधिकार मिळाले पाहिजेत. बेकायदा स्थलांतरितांना त्यापासून दूरच ठेवले पाहिजे, यासाठी या कायद्यात तरतुदी आहेत, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

न्यायालयाने म्हटले आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा विषय न्यायालयापुढे येतो त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या विविध ओळखपत्रांवरून तो भारताचा नागरिक आहे, हे सिद्ध करता येणार नाही. नागरिकत्व कायदा 1955 मधील कलम 3 आणि 6 मधील तरतुदींनुसार तो भारतीय आहे की नाही, हे सिद्ध करावे लागेल.
परकीय नागरिक कायदा, 1946 मधील कलम 9 च्या आधारे जर कोणत्याही नागरिकाबद्दल तो भारतीय नसल्याचे पुरावे तपास अधिकाऱ्यांनी सादर केले तर संबंधित प्रकरणामध्ये आपण भारतीयच आहोत, हे न्यायालयापुढे सिद्ध कऱण्याची जबाबदारी त्याच व्यक्तीवर पडते. तसे न्यायालयापुढे सिद्ध करणे, हे त्या व्यक्तीचे काम आहे. जर तो तसे सिद्ध करू शकला नाही, तर तपास अधिकाऱ्यांनी ठेवलेला आरोप न्यायालय ग्राह्य धरू शकते, असेही मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.