वडवणी — कुंडलिका नदीच्या पुरात कुप्पा येथील वाहून गेलेल्या अक्षय बाबासाहेब जाधव या 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह तब्बल 36 तासानंतर सापडला.
अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यात पुराने थैमान घातले होते. अनेक ठिकाणी नद्यांनी आपले पात्र बदलले. गेल्या 35 वर्षाच्या काळात पहिल्यांदाच कुंडलिका नदीला महापूर आल्या गेला.या पुरात कुप्पा येथील अक्षय जाधव हा वाहून गेला होता. मंगळवारी रात्रभर आणि बुधवारी दिवसभर शोध मोहिम सुरू होती. मात्र बेपत्ता झालेल्या अक्षयचा ठावठिकाणा लागत नव्हता.गुरुवारी सकाळी पुराचे पाणी ओसरले अन् तब्बल 36 तासानंतर कुंडलिका नदीत असलेल्या दुकडेगाव येथील बंधार्याच्या पिल्लरला अडकलेला अक्षयचा मृतदेह सापडला. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला.
कुंडलिका नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह 36 तासानंतर सापडला
पुराचे पाणी ज्यांच्या घरात शिरले त्यांना तात्काळ आर्थिक मदतीसह धान्य देणार — अजित पवार
हिंगणी खुर्दच्या पुनर्वसनावर गावकऱ्यांशी केली चर्चा
बीड — जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. ज्यांच्या घरात पाणी शिरले अशा नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत व धान्य देण्याचे शासनाने ठरवले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.

बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द येथे गुरुवारी (दि.२५) सकाळी ७ वाजता पूरस्थितीची पाहणी करून अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मागील दोन दिवसांपासून पूरग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सविस्तर माहिती अजितदादांकडे सादर केली होती.

त्याअनुषंगाने झालेल्या पाहणी दौऱ्यात त्यांनी शासकीय यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच, हिंगणी खुर्द गावाचे पुनर्वसन करण्यासंदर्भात चर्चा झाली असून कार्यवाही करण्याचे अजितदादांनी प्रशासनाला निर्देश दिले.
यावेळी आमदार विक्रम काळे, विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण, बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, ज्येष्ठ नेते रमेश आडसकर, युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते, बीडचे तालुकाध्यक्ष ॲड.राजेंद्र राऊत, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय पालसिंगणकर, सरपंच संतोष तांदळे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कावत, मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना अजितदादा पवार म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकार गंभीरतेने मदत करण्याच्या प्रयत्नात आहे. अद्याप कुणी आले नाही म्हणून गैरसमज करून घेऊ नका. बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही अजितदादा पवार यांनी दिली. पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी बुजल्या आहेत, त्यांना नव्याने योजना करून विहिरी उपलब्ध करून दिल्या जातील. ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना थेट आर्थिक मदत व धान्याची व्यवस्था केली जाईल, असेही ते म्हणाले.
बीड मतदारसंघातील पूरग्रस्त भागात दौरा
बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट, हिंगणी खुर्द, चौसाळा (वाढवणा पूल) तसेच शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोहा, येवलवाडी येथे अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची पाहणी केली. खोकरमोहातील फुटलेल्या तलावाची पाहणी केली व झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली. रायमोहा व येवलवाडी परिसरात रस्त्यात खचलेला पूल, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं झालेलं अतोनात नुकसान व वाहून गेलेल्या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर दगडवाडी व हिवरसिंगा येथील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. पुढे बीडमध्ये प्रशासनासोबत चर्चा करून अजितदादा पवार यांनी आहेर चिंचोली, खामगाव, नांदूर हवेली या गावांना भेटी दिल्या.
अक्का, मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, मी आहे.लग्न दिवाळीतच होईल… धनंजय मुंडेंनी पुसले पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू
परळी तालुक्यातील तेलसमुख, बोरखेड, ममदापूर आदी गावांत धनंजय मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी
शासनाकडे १००% नुकसान भरपाई साठी पाठपुरावा करणार – मुंडेंनी ठिकठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत दिला धीर
ममदापूर येथील पुरात वाहून गेलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना प्रशासनाची ४ लाखांची मदत सुपूर्द
परळी — परळी वैद्यनाथ तालुक्यातील तेलसमुख, बोरखेड, ममदापूर आदी गावांमधील अतिवृष्टी नुकसान व पुरपरिस्थीची माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. या दरम्यान तेलसमुख येथील एका शेतातील संपूर्ण कापसाच्या उभ्या पिकाचे पावसाने पूर्णपणे नुकसान झाले असून, संबंधित शेतकऱ्याच्या मुलीचे दिवाळीत लग्न प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी महिलेला धनु भाऊंच्या समोर अश्रू अनावर झाले.

शेतकरी महीलेने हाती आलेले संपूर्ण पीक नासले, लाखांवर नुकसान झाले भाऊ, आता लेकीचे लग्न कसे लावू? असा प्रश्न उपस्थित करताच धनंजय मुंडे यांनी शासन आपली मदत करेल अक्का, पण मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, ठरलेल्या वेळीच लग्न होईल, त्याच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतो, असा शब्द देत मोलाचा आधार दिला. रेखाबई तुकाराम कदम असे संबंधित शेतकरी महिलेचे नाव असून त्यांचे कापसाचे पूर्ण पीक पाण्याने नासून गेले आहे.
परळी वैद्यनाथ तालुक्यात गोदावरी नदीला पूर आल्याने आजूबाजूच्या गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वाण नदिसह लहान मोठ्या सर्वच नद्यांना आलेल्या पुराने अनेक ठिकाणी शेतीतील माती खरडून गेली आहे, काही ठिकाणी नदीतील दगड गोटे शेतात वाहून आलेत तर अजूनही पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचलेले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी तेलसमुख, ममदापूर, बोरखेड आदी गावांना भेटी देऊन स्थानिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला, तसेच प्रशासनास १००% नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने योग्य पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान ममदापूर येथील ३८ वर्षीय तरुण शिवराज कदम हा पुराच्या पाण्यात दि. १६ सप्टेंबर रोजी रात्री कौडगाव हुडा येथील नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत झाला होता, त्या तरुणाच्या कुटुंबीयांना आज प्रशासनाच्या वतीने ४ लाख रुपयांची आर्थिक मदत धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. सदर रक्कम मयत शिवराज कदम यांच्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
यावेळी युवक नेते अजय मुंडे, सूर्यभान मुंडे, राजाभाऊ पौळ, प्रभाकर पौळ, संजय जाधव, नितीन निर्मळ, भागवत कदम, बालासाहेब कदम, वसंत राठोड, भगवान पौळ, जानीमिया कुरेशी, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या सह महसूल, कृषी, पोलीस आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
राजकारण्यांच्या कर्तबगारीने बीड आधीच आत्महत्यांचा हॉटस्पॉट; अजित दादा..! किती बळी गेल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करणार ??
बीड — राजकारण्यांनी नेहमीच बीड जिल्हा मागास ठेवण्याची कर्तबगारी केली त्यातूनच शेतकरी आत्महत्यांचा हॉटस्पॉट बनला गेला. अव्याहत आत्महत्यांच सत्र सुरू असलं तरी सत्ताधाऱ्यांना फरक पडला नाही. त्यातच आता अतिवृष्टीने होतं नव्हतं ते स्वप्न चिखलात रुतून गेलं. नदी काठची गावच नाही तर प्रत्येकाच्या जमिनीच शेत तलावात रूपांतर झालं. सरकारकडे सॅटॅलाइट इमेज उपलब्ध आहेत. प्रसारमाध्यमं रोज इथल्या भीषण परिस्थितीचं भिषण वास्तव मांडत आहेत. शेतकऱ्यांचा डाटा सरकारकडे आहे. अतिवृष्टीची आकडेवारी उपलब्ध आहे. मग सरकार कशाची वाट पाहत आहे. अजितदादा…!शेतकऱ्यांच्या भळभळणाऱ्या जखमा पूरग्रस्त पाहणी दौरा करून आणखी खरवडायचा मंत्र्या संत्र्यांनी चंग बांधला आहे काय? तुम्ही बीडमध्ये मुक्कामाला येण्यापूर्वी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आणखी किती आत्महत्या झाल्यावर सरकारी मदतीची ओला दुष्काळाची घोषणा करणार आहात हे बीडच्या जनतेला एकदा सांगाच…!
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या बीडची ओळख आत्महत्यांचा जिल्हा म्हणून सध्या तरी होऊ लागली आहे. राजकारण्यांची खुर्चीसाठी धावपळ आहे. पण इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विकासाला चालना मिळावी यासाठी कितीही भक्कमपणे एखाद्या राजकारणी ,पक्षाच्या मागे इथला शेतकरी उभा राहिला तरी निराशे शिवाय पदरात काहीच पडलं नाही. अजित दादा…!तुम्ही पालकमंत्री झाल्यानंतर देखील बदल होईल असं वाटलं होतं.पण व्यवस्थेची गंगा सगळी उलटी वाहू लागली आहे. उलट शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढतो आहे. आता हेच पहा ना! बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. नदीकाठीची गाव दहशती रात्रभर जागत राहिली. अनेक ठिकाणी नद्यांनी पात्र बदलले.शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या. कापसाच्या वाती, सोयाबीनची माती डोळ्या देखत झाली. शेतांना तलावाचं रूप आलं. पीक पाण्यामुळे दिसेनाशी झाली जनावरांसह मालमत्तेची मोठी नुकसान झाली. सोयाबीनला कोंब फुटली. काढणीला आलेला उडीद मूग कापसेजला गेला. ती कुजूनही गेली.या सगळ्या घटना मंत्रालयातील एसी मध्ये बसून दादा आपण पाहत होता. प्रसार माध्यमं शेतकऱ्यांच दुःख, खरवडून गेलेल्या जमिनी, पाण्यात डुबकी मारलेली पिकं, शेतकऱ्यांनी केलेला आक्रोश जशाचा तसा दाखवत होती. सरकारकडे अत्याधुनिक सॅटॅलाइट यंत्रणा उपलब्ध आहेत. त्यावरूनही परिस्थितीचा अंदाज घेण अवघड नव्हतं. अतिवृष्टीची सरकारी आकडेवारी, हवामानाचे अंदाज यासारख्या गोष्टी शासनाकडे उपलब्ध झाल्या. मात्र तरीही अतिवृष्टीतील पाहणी दौरा करून शेतकऱ्यांच्या भळभळत्या जखमा खरवडण्याचं काम करण्याची गरज होती का? नुसतं सरकार पाठीशी आहे. काळजी करू नका! असं म्हणून नुसता कोरडा धीर देण्यापलीकडे शासनाने काय केलं? ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदतीची घोषणा करून नंतर तुम्ही शेतकऱ्यांकडे आला असता तर त्यांच्या भळभळत्या जखमेवर मलम तरी लागला असता. पण इच्छाशक्ती नसल्यावर प्रत्येक गोष्ट राजकारण्याच्या भूमिकेतून पाहण्याचा परिणाम शेतकऱ्यांना आपलं कोणीच वाली नाही. अशी भावना जोर धरू लागली आहे.
अजित दादा…! तुमचा अतिवृष्टी पाहणी दौरा जाहीर होताच स्वप्नांना मूठ माती मिळालेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मांजरा नदीला आलेल्या पुरात 8 एकर सुपीक जमीन खरवडून गेली म्हणून केज तालुक्यातील बोरगाव बु. येथील शेतकरी रमेश गव्हाणे या 65 वर्षीय शेतकऱ्याने विद्युत ट्रांसफार्मर ला स्पर्श करून आत्महत्या केली. अंथरवन पिंपरी येथील शेतकरी चंद्रकांत रघुनाथराव कुटे वय 62 वर्ष या शेतकऱ्याने देखील अतिवृष्टीने नुकसान झाल्यामुळे झालेलं कर्ज कसं फेडायचं. वर्षभर कुटुंबाचं पोट कस भरायचं? या विवंचनेत गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे भीमराव कुटे हा लढवय्या शेतकरी पुत्र शेतकरी चळवळी करत होता. आशा लढवय्या पुत्राला जन्म देणारा तो बाप होता.
अजित दादा…! पालकमंत्री म्हणून बीडच्या जनतेला तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण शेतकऱ्यांच्या पदरात आतापर्यंत निराशाच पडली आहे. आणखी किती शेतकऱ्यांना आत्महत्या करायला सरकार भाग पाडणार आहे? किती आत्महत्यांची आकडेवारी झाली म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करणार आहात? ठोस मदतीची घोषणा कधी करणार आहात? की नुसतचं अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. जुन्याच निकषानुसार दमडी देऊनच शेतकऱ्यांना बोळवणार? दादांचा हा अतिवृष्टी पर्यटन दौरा तर ठरणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न बीडच्या जनतेला पडू लागले आहेत.
बीड शहरातील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिरासाठी ९ कोटी १४ लाखांचा निधी
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आभार
बीड — शहरातील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिराच्या जतन व दुरुस्ती कामासाठी ९ कोटी १४ लाख ५४ हजार ४०३ रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.
बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर जुने व ऐतिहासिक असल्यामुळे जतन व दुरुस्तीची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर डॉ.योगेश क्षीरसागर यांनी निधीची मागणी केली होती. कंकालेश्वर मंदिर हे बीड शहरातील प्राचीन व भव्य शिवमंदिर असून, ते सुमारे १० व्या ते १२ व्या शतकादरम्यान बांधले गेले असावे, असे मानले जाते. मंदिराचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे. बाह्यभागावरील शिल्पकला ही मराठवाड्यातील प्राचीन वास्तुकलेचे उत्तम उदाहरण मानली जाते. महाशिवरात्री व श्रावण महिन्यात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराच्या संवर्धनासाठी सातत्याने मागणी होत होती. या मागणीची दखल घेत ना.अजितदादा पवार यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर हा विषय मार्गी लागून शासन निर्णय जारी झाला आहे, तसेच पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी या निधीस मंजुरी मिळवून दिल्याबद्दल अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.
ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची रा.काॅ. प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे ची मागणी
रा.काँ.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदेंनी बीडसह तालुक्यात केली अतिवृष्टीची पाहणी
बीड — राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांनी बीडसह तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा करत नुकसानीची पाहणी केली.

बीड जिल्ह्यासह तालुक्यात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शासनाकडे बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईची देण्याची मागणी केली.
बुधवार (दि.२४) रोजी बीड मतदारसंघातील पिंपळवाडी, बेलखंडी पाटोदा, नागझरी, मानेचावाडा, कचारवाडी, दत्तनगर (बे.पाटोदा), शिरापूर गात, शिरूर तालुक्यातील निमगाव, नांदेवली परिसरात सिंधफणा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे शेत, पिके, घरे व जनजीवन मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाले आहे. याठिकाणी अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहे. अशा गंभीर परिस्थितीची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांनी पाहणी केली. तसेच अनेक भागात पूरग्रस्त भागांत जाऊन नुकसानीची पाहणी करत घरांचे झालेले नुकसान, पाण्याने वाहून गेलेले साहित्य यासंदर्भात माहिती घेतली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी आणि
नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला व शासनाच्या वतीने मदतीलबून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिला.
या पाहणी दरम्यान बीड जिल्ह्याचे खासदार मा. बजरंग बप्पा सोनवणे, रा.काँ. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,
बीड मतदार संघाचे आ.संदीप क्षीरसागर सोबत होते.
आष्टी,कर्जत,जामखेड,पाथर्डी भागात चोऱ्या करणारा लाल्या भोसले जेरबंद
बीड — आष्टी तालुक्यातील गि-हे वस्ती निमगाव चोभा येथील घरावर दरोडा टाकत बेदम मारहाण करणारा आरोपी सोन्या उर्फ लाल्या भोसले याला आष्टी पोलीसांनी जेरबंद केले. आष्टी कर्जत जामखेड पाथर्डी नगर तालुक्यात लाल्या भोसले वर अनेक गुन्हे दाखल आहेत
सतीश नवनाथ गि-हे यांच्या निमगाव चोभा येथील गि-हे वस्तीवर 22 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घराची कडी तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. दाग दागिने असा साठ हजार रुपयाचा ऐवज चोरून नेला. जाताना बेदम मारहाणही केली होती याप्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी गुप्त माहिती काढण्याचे आदेश दिले होते. पो.ह.प्रवीण क्षीरसागर व सय्यद मजरुद्दीन यांनी गिऱ्हे वस्ती वर झालेल्या चोरी प्रकरणात सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले याचा हात असल्याची माहिती काढली. तसेच लाल्या भोसले आंधळेवाडी येथे आला असल्याची माहिती देखील मिळवली. पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी तात्काळ कारवाई करत स्वत: सोबत सपोनी विजय नरवडे सह सहकार्यांना सोबत घेत भर पावसात दोन किलोमीटर डोंगरावर चालत जाऊन मोठ्या शेतात येणे सापळा रसत सोन्या उर्फ लाल्या भोसले याला जर बंद केले. पोलिसी हिसका दाखवताच गिरे वस्तीवर केलेल्या चोरीची कबुली त्याने दिली. दरम्यान लाल्या भोसले हा बऱ्याच पोलीस ठाण्यांना पाहिजे आहे. आष्टी कर्जत जामखेड पाथर्डी नगर तालुका या भागामध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर आणखी गुन्ह्याची उकल होण्यास मदत होणार आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, सपोनी विजय नरवडे, कमलाकर शिरसाठ प्रवीण क्षीरसागर संतोष दराडे विकास जाधव देविदास जमदाडे सय्यद मधुरुद्दीन सद्दाम शेख बब्रुवान वाणी अशोक तांबे नागेश लोमटे राजाभाऊ सचगणी बळीराम भाग्यवंत आदींनी केली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण
बीड — ओबीसी नेते लक्ष्मण हाके याचे निकटचे कार्यकर्ते पवन कंवर व त्यांच्यासोबत असलेल्या आणखी तीन जणांना सावरगाव जवळील एका धाब्यावर अज्ञात दहा ते पंधरा लोकांच्या टोळीने हल्ला करून बेदम मारहाण केली. या घटनेत पवन कंवर गंभीर जखमी झाले असून माजलगाव मधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान लक्ष्मण हाके यांनी पोलीस अधीक्षकांची याप्रकरणी भेट घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे जवळचे आणि विश्वासू समजले जाणारे केरवाडी पालम येथील रहिवासी पवन कंवर व त्यांचे तीन साथीदार काल (मंगळवारी, ता 23) संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सावरगावजवळ एका धाब्यावर जेवण करत होते. याच वेळी अज्ञात 40 ते 50 युवकांनी येऊन काठ्या व लाथाबुक्क्यांनी या चौघांना मारहाण केली. या घटनेत पवन कंवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे, तर त्यांच्या साथीदारांनाही मार लागला आहे. याबाबतची माहिती ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बालक कोळी यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी या चौघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अज्ञात मारेकरी फरार झाले आहेत.
टोळक्याने केलेल्या मारहाणीत पवन कंवर यांचा एक हात व एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. तसेच डोक्यात देखील राॅडचा घाव घालण्यात आल्याची माहिती प्राध्यापक हाके यांनी दिली असून आता पोलिस अधीक्षकांची भेट घेत या आरोपींना अटकेची मागणी केली आहे.
अतिवृष्टी नंतर नवी दहशत; लातूरच्या मुरुड अकोल्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के !
लातूर — सतत कोसळलेल्या अतिवृष्टीने दाना दान उडवलेली असतानाच पुन्हा नव संकट उभे राहत की काय? असा प्रश्न लातूरकरांना पडला आहे. पिक पाण्यात, घर पाण्यात, घरात बाहेर चिखल त्यातच आणखी भर म्हणून मंगळवारी रात्री लातूरमधील मुरूडला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
लातूर जिल्ह्यातल्या मुरुड अकोला परिसरात रात्री 8 वाजून 13 मिनिटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.3 रिश्टर स्केल असल्याची नोंद झाली आहे . दरम्यान भूकंपाचा केंद्रबिंदू हा लातूर शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या मुरुड आकोला परिसरात आहे. भूकंपाची खोली ही 5 किलोमीटर पर्यंत आहे. तर भूकंपाची सौम्य नोंद असली तरी नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आव्हान प्रशासनाच्या वतीने केलं आहे. त्याचबरोबर नागरिकांनी कच्च्या घरात न राहता सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही सांगण्यात आलं आहे.
आभाळ फाटलं: पिक पाण्यात, जिवाचा आकांत, भयग्रस्त आक्रोशात मराठवाडा बुडाला
बीड — दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या मराठवाड्याची अक्षरशः पाण्यात बुडायची वेळ आली आहे. बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, छ. संभाजीनगर, जालना अतिवृष्टीने जलमग्न झाल्याचं पहायला मिळत आहे. पाण्यात बुडालेल्या पिकांसोबतच गुराढोरांसह झालेली जीवित हानी भयग्रस्त आक्रोश करायला भाग पाडत आहे. आशातच सरकार काहीतरी मदत करेल कर्जमाफी करून दिलासा देईल याची वाट सध्या तरी पाहिली जात आहे.मराठवाड्यात काही दिवसात झालेल्या पावसात 8 जणांचा बळी गेला. तर बीड आणि धाराशिवमध्ये अजूनही मदतकार्य सुरूच आहे. तर जायकवाडी आणि माजलगाव धरणातून विसर्ग वाढल्यानं लष्कराचं पथक बोलवण्यात आलं आहे.

मराठवाड्यात 1 जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 124 टक्के पाऊस पडला आहे. 22 सप्टेंबरपर्यंत सरासरी 604 मिमी पाऊस होत असतो. मात्र आता 747 मिमी इतका सरासरी पाऊस मराठवाड्यात झाला आहे. फक्त सप्टेंबरचा विचार करायचा 165 टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे.

पूरस्थितीची पाहणी करा — मुख्यमंत्री
अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना दिले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना सूचना दिल्या. 31 लाख शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा जीआर काढल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली मात्र ओला दुष्काळ जाहीर करणार का या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ सोडा, सर्वांना सर्वोतोपरी मदत करणार असं आश्वासन देत ओला दुष्काळाबाबत थेट भाष्य करणं टाळलं.

शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना पूर परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. त्यानुसार शिवसेनेचे सर्व मंत्री आज किंवा उद्या पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.
लातूर — पीक पाण्याखाली गेलं
लातूरमध्ये हाताला आलेलं पीक पाण्यात गेल्यानं निलंग्यात महिलेनं आर्त टाहो फोडला. पुराच्या पाण्यात बैल अडकले, कोंबड्या वाहून गेल्या, शासन मदत करेना, वाचवा, वाचवा म्हणत महिलेने आर्त टाहो फोडला. गुंजर्गा गावात गुडघाभर पाण्यात जाऊन महिलेनं आक्रोश केला, तर महिलेचा टाहो बघून उपस्थितही हतबल झाल्याचं दिसून आलं.

धाराशिव — मोठं नुकसान
धाराशिव जिल्ह्यात पावसाने हैदोस घातला आहे. आंबी गावात पुराचं पाणी शिरल्याने मुकेश गटकळ यांचा संसार उघड्यावर आला. घरात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलं असून, एबीपी माझाशी बोलताना घरातील माऊलीच्या अश्रुंचा बांध फुटला. यावेळी एबीपी माझाचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनाही अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरूड परिसरात अनेकांच्या घरात पाणी शिरलं. तर नागरिकांनी अन्न धान्य वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण मोठं नुकसान झाल्याचं पहायला मिळालं.
जालना — पीक जमीनदोस्त
जालन्यातील दुधना काळेगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसाचा खरीप पिकांसह ऊस पिकाला मोठा फटका बसला. दुधना काळेगाव येथील शेतकरी प्रकाश भांदरगे यांचा दोन एकर ऊस जमीनदोस्त झाला. दुधना काळेगाव परिसरातील खरिपातील सोयाबीन, कपाशी मक्का पिकासह उसाचं प्रचंड नुकसान झालं आहे.
बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या सादोळा गावाला गोदावरीच्या पुराचा फटका मोठा फटका बसला. सोयाबीन, ऊस, कापूस अशी सर्व पिकं पाण्याखाली गेल्यानं बळीराजावर मोठं संकट कोसळलंय. आता तरी सरकारनं मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बीड — अनेक गावांचा संपर्क तुटला
बीड जिल्ह्यातील शिरसमार्ग गावातून वाहणाऱ्या सिंदफणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला पूर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. तर नदीपात्र परिसरात अडकलेल्या स्थानिक नागरिकांना NDRF टीमच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आलं आहे. शिरसमार्ग गावाला सिंदफणा नदीचा पूर्णपणे वेढा पडला आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वारंवार तहसील प्रशासनाकडून केलं जातंय.
बीडच्या परळी तालुक्यातील पोहनेर गावाला गोदावरीच्या पाण्याने वेढा घातल्याने रात्रीपासून पोहनेर गावचा संपर्क तुटलाय. आता गावात जाण्यासाठी फक्त चप्पूचाच पर्याय आहे. त्यातच गावातील गर्भवतीला प्रसूती वेदना होऊ लागल्याने तिला चप्पूच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर आणलं. प्रशासन नाही तर भोई बांधवच मदतीला येत असल्याचं महिलेच्या कुटुंबीयाने सांगितलं. या महिलेला परळीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
परभणी — दुधना नदीला पूर
सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे दुधनेला पूर आलाय आणि अनेक गावांना पाण्याने वेढा दिलाय. मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण गावातील पूल पूर्णत: पाण्याखाली गेला. शेतीचंही मोठं नुकसान झालं. गावाला पाण्याने वेढा दिल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.
हिंगोली – हळद, सोयाबीन पाण्याखाली
हिंगोली जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्या पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या ओढे नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. तर अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वसमत शहरातलगत असलेल्या नदीला पूर आला आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाच ते सहा जणांची सुटका करण्यात आली. दोरीच्या सहाय्याने नागरिकांना बाहेर काढलं गेलं.
हिंगोली जिल्ह्यातील आसेगाव शिवारातील शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. आसना नदीचे बॅक वॉटर शेतात शिरल्याने शेतातील सोयाबीन, कापूस, हळद ही पिके पूर्णतः पाण्याखाली आली आहेत. शेतकऱ्यांना शेतातील सोयाबीनचे पीक पाण्यात शोधून काढाव लागत आहे, हजारो रुपये खर्च करून शेतात पेरणी केलेल पिकाचा चिखल झाल्यानं शेतकरी पूर्णत हतबल झाल्याचं चित्र











