Home Blog Page 52

यश ढाका हत्याप्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करणार – मुंडेंचा शब्द

0

धनंजय मुंडे यांनी ढाका कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन

बीड — येथील पत्रकार देवेंद्र ढाका यांच्या यश नामक २२ वर्षीय तरुण मुलाची बीड शहरात काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या एका टोळक्याकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी बीड शहरातील ढाका कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

स्वर्गीय यश ढाका या उमद्या तरुणाची बीड शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले होते. अल्पसंख्यांक मागासवर्गीय समाज असलेल्या वाल्मिकी समाजातील देवेंद्र ढाका व त्यांच्या परिवारावर यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला असून, ढाका कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. स्वर्गीय यश ढाका याच्या सर्व मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा केली जावी यासाठी आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, तुमच्या या लढाईत तुम्ही स्वतःला एकटे समजू नका, कुणालाही घाबरू नका, मी न्यायाच्या या लढाईत तुमच्या पूर्ण शक्तीने पाठीशी उभा आहे असे धनंजय मुंडे यांनी यश ढाका च्या आई वडिलांशी बोलताना म्हटले. यावेळी पत्रकार देवेंद्र ढाका व त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून केल्या जात असलेल्या तपासाची धनंजय मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांची चर्चा करून माहिती घेतली असून याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करणार असून, यशच्या खूणाच्या कटात सहभागी असलेल्या कुणालाही सोडले जाणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, ॲड. गोविंदराव फड, प्रदेश प्रवक्ते भागवत तावरे, अविनाश नाईकवाडे, विनोद हतांगळे, यांच्यासह ढाका कुटुंबीय व नातेवाईक आदी उपस्थित होते.

2020 चा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा; नुकसान भरपाई का दिली नाही? विमा कंपन्यांना खुलासा करण्याचे न्यायालयाचा आदेश

0

बीड — उच्च न्यायालयाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2020 साली खरीप पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतरही विम्याचा लाभ का देण्यात आला नाही, याचा खुलासा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांकडे नुकसानीच्या 72 तासात तक्रार न दिल्याचे कारण पुढे करत पिक विमा देण्यास कंपनीने टाळाटाळ केली होती. कंपनीने राज्य सरकार व कृषी आयुक्तांचे निर्देश देखील पाळले नाहीत. या संदर्भात उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. दरम्यान पिक विमा कंपनीने थोड्याच शेतकऱ्यांना पिक विमा देऊन तोंडाला पान पुसण्याचं काम केलं होतं. दरम्यान या प्रकरणात आता शेतकऱ्यांनी भरलेला हप्ता आणि त्यांना मिळालेला लाभ यामध्ये मोठी तफावत आहे, जी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सुमारे 17 लाख शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे 789 कोटी रुपयांचा हप्ता भरला होता. मात्र, विमा कंपनीने केवळ 20 हजार शेतकऱ्यांना 13 कोटी 54 लाख रुपयांच्या विम्याचा लाभ दिला. बीड जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली होती.

पिकांचे नुकसान झाल्यावर पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे स्पष्ट निर्देश कृषी आयुक्तांनी आणि राज्य शासनाने विमा कंपनीला दिले होते. मात्र, विमा कंपनीने राज्य शासन आणि कृषी आयुक्तांनी दिलेल्या या निर्देशांचे पालन केले नाही. यामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिले. विमा कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात ऑल इंडिया किसान सभा आणि इतर शेतकऱ्यांनी ॲड. अनिल गायकवाड यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

या याचिकेची सुनावणी करताना न्यायालयाने विमा कंपनीला धारेवर धरले असून, विम्याचा लाभ का दिला नाही, याचे सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या दणक्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे असे वृत्त एनडीटीव्ही ने दिले आहे.

कपिलधारवाडी च्या ग्रामस्थांचे जीव धोक्यात ; तातडीने पुनर्वसन करा – आ.संदीप क्षीरसागर

0

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, आपत्ती विभाग मंत्र्यांना दिले पत्र
बीड — मागील काही काळात सततच्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे कपिलधारवाडी येथे भूस्खलन झाले आहे. यामुळे गावकऱ्यांचा जीव धोक्यात असून त्यांचे तात्काळ पुनर्वसन करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
मौजे पाली ग्रामपंचायत अंतर्गत कपिलधारवाडी छोटेसे ९० कुटुंबाचे गाव वास्तव्यास आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे वातीवृष्टीमुळे सदरील गाव अतिशय गंभीर संकटात सापडले आहे. या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावांमध्ये भूस्खलन सुरू झाले असून जमिनीत, डोंगराच्या कडेला, रस्त्यावर, शाळा खोली, घरे, मंदिरे, संरक्षण भिंत व इतर ठिकाणी मोठ्या भेगा व तडे गेले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. ग्रामस्थांना घरी जाणे धोकादायक झाल्याने ग्रामस्थांना, आबालवृद्धांना,महिला भगिनींना, शाळकरी विद्यार्थ्यांना, दिवस व रात्र आजच्या घडीला श्री. मन्मथ स्वामी देवस्थान, कपिलधार या ठिकाणी वास्तव्य करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना कायमस्वरूपी दिलासा देणे व तातडीने पुनर्वसन होणे आवश्यक आहे. यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जसे की, १) कपिलधारवाडी गाव तातडीने धोकाग्रस्त क्षेत्र घोषित करावे २) प्रभावित सर्व कुटुंबाचे तातडीने स्थलांतर व पुनर्वसन व्यवस्था करावी ३) कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी नवीन जागा व निवासी योजना जाहीर करून तात्काळ अंमलबजावणी व्हावी ४) शाळा व सार्वजनिक इमारतीची सुरक्षा तपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पर्यायी व्यवस्था करावी ५) या सर्व कामांसाठी आपत्ती निवारण निधी नरेगा व पुनर्वसन विभागाचा निधी तथा इतर योजनेमधून निधी मंजूर करून ग्रामस्थांना यथोचित सहकार्य व्हावे अशा विविध मागण्यांचे पत्र आ. संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री मा.ना.अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मा.ना.मकरंद जाधव पाटील, आपत्ती विभाग मंत्री मा.ना.गिरीश महाजन यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर, जिल्हाधिकारी, बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हा आपत्ती व व्यवस्थापन, बीड, उपविभागीय अधिकारी बीड, तहसीलदार बीड, गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड यांना पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.

कपिलधारवाडी च्या ग्रामस्थांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करावी
बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत मौजे पाली अंतर्गत असलेले कपिलधारवाडी हे अंदाजे ९० कुटुंबांचे रहिवाशी गाव वसलेले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने व यापूर्वी देखील संरक्षण भिंत,रस्ता व इतर व्यवस्थेला धोका निर्माण झाल्याने सन २०२२-२३ ते आजतागायत याविषयी आ. संदीप क्षीरसागर यांनी सातत्याने यथोचित पत्र व्यवहार व उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी करत आहेत. त्यातच ३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा रस्ता,शाळा खोली, डोंगराचा काही भाग, घरांना मोठ्या प्रमाणात तडे जाण्याचे काम झाले आहे. त्या तळ्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. अशावेळी ग्रामस्थांना शासन व प्रशासन यांच्याकडून सर्वरित्या सहकार्य होणे गरजेचे असून याबाबत उचित कार्यवाही सुरू आहे. सर्व कुटुंबाची तात्पुरती व्यवस्था श्री. मन्मथ स्वामी देवस्थान, कपिलधार येथे होणे आवश्यक आहे. प्रशासनाने पंच कमिटी श्री. कपिलधार यांना याबाबतीत अवगत करावे. जेणेकरून पंच कमिटी कडून गावकऱ्यांना याबाबतीत यथोचित सहकार्य होईल व त्याचबरोबर ग्रामस्थांच्या हाताला काम, विद्यार्थ्यांना शाळा व भोजन व्यवस्था होईल. याबाबत प्रशासनाकडून आदेश काढण्यात यावेत.

4 महिन्याच्या बाळाला बॅरल मध्ये टाकून वडिलाची आत्महत्या

0

गेवराई — आपल्या चार महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बॅरल मध्ये टाकून वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तलवाडा येथील तहत रामनगर येथे घडली आहे.
अमोल हौसराव सोनवणे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने चार महिन्यांच्या बाळाला देखील बॅरलमध्ये टाकून जीवे मारले.दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तलवाडा पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. चार दिवसांपूर्वीच दोघा पती-पत्नीत कौटुंबिक वाद झाला होता. यातूनच अमोल सोनवणे याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नाला यश ;श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टला वन विभागाची ४ हेक्टर जागा प्रदान

0

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई — श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट परिसरातील वन विभागाची ४ हेक्टर जमीन भक्त निवास, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आदींच्या उभारणीसाठी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आली असून याबाबतची अधिसूचना केंद्रीय पर्यावरण व वन विभागाने प्रसिद्ध केली आहे.

माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यास भगवान गडाच्या स्थापना दिनाच्या पूर्व संध्येस यश आले आहे.

गडाचे महंत न्यायचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी अनेक वर्षांपासून ही जमीन हस्तांतरित होण्यासाठी मागणी केली होती.

विजयादशमी म्हणजेच भगवान गडाचा स्थापना दिवस, आज विजयादशमीच्या पूर्व संध्येला हा निर्णय घोषित झाल्याने गडाच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून, या निर्णयासाठी धनंजय मुंडे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री भूपेंद्र यादव, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडाच्या सर्व भक्तांच्या वतीने आभार मानले आहेत.

बीड : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या – आ.रोहित पवार

0

बीड तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांची केली पाहणी

बीड — मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची सरसकट मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

आ.रोहित पवार हे बुधवार दि.(०१) रोजी बीडमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्याअगोदर त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी यांचसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी. त्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना मदत करण्याची हेच योग्य वेळ असून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. कपिलधारवाडी येथे जाऊन नुकसान पाहणी केली. याठिकाणी रस्ते,जमीन व डोंगर खचले आहे. जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. माळीणसारखी गंभीर घटना घडण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांचे जीवन आणि संपत्ती धोक्यात आली आहे. याठिकाणी आ.रोहित पवार यांनी परिस्थितीची पाहणी करत पुनर्वसनाची गरज असल्याचे सांगितले. तसेच आपत्ती व्यवस्थापनाकडून संरक्षण भिंत बांधून देण्याची निर्देश दिले.
बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द या गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या व शासनाच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळवून देण्याची मागणी केली.

आ.रोहित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतली आढावा बैठक

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जमिनीवरील माती वाहून गेली, घरात पाणी शिरून संसार उध्वस्त झाला, पिके नष्ट झाली – असे न भूतो न भविष्यति संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. या कठीण प्रसंगी शेतकरी बांधवांसोबत ठाम उभे राहत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेश सरचिटणीस तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बीड जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शासनाने तातडीने व भरीव मदत द्यावी तसेच नागरिकांच्या पुनर्वसनाची गरज असून नागरिकांना शासनाच्या माध्यमात तात्काळ सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची मागणी केली.

रोहित पवारांनी पुराच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाच्या कुटुंबाची घेतली भेट

बीड मतदारसंघातील चौसाळा ते पिंपळगाव घाट गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर अतिवृष्टीच्या काळात पुलावरून प्रवास करत असताना श्री. स्वप्निल विक्रम शिंदे हे दुर्दैवाने पुराच्या प्रवाहात वाहून गेले. अद्याप त्यांचा शोध सुरूच आहे. आ.रोहित पवार यांच्यासमवेत आ.संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी प्रशासनाला शोध मोहिमेला गती द्यावी अशी विनंती रोहित पवार यांनी केली.

आ.संदीप क्षीरसागर यांचे प्रशासनाला कपिलधारवाडी आणि हिंगणी खुर्द या गावाचे पुनर्वसन करण्यासंदर्भात पत्र

आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील कपिलधारवाडी येथे भूस्खलन झाल्याने रस्ते, जमीन आणि डोंगर खचल्याने माळीण सारखी दुर्घटना घडू शकते. तसेच हिंगणी खुर्द अतिवृष्टीने संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा घातल्याने गावकरी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावाच्या पुनर्वसनासाठी महसूल आणि वन विभागाला परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हा परिषद-पंचायत समिती आरक्षण सोडतीची तारीख ठरली

0

बीड — राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीची तारीख जाहीर केली आहे.

जिल्हा परिषद-पंचायत समिती : आरक्षणाचे वेळापत्रक

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यपदांचे आरक्षण १३ ऑक्टोबर २०२५ रोजी निश्चित केले जाणार आहे. स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारे हे महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे असतील.

आरक्षण सोडतीची सूचना –

१० ऑक्टोबर २०२५ जिल्हाधिकारी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आरक्षणासंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील.

आरक्षण सोडत काढणे

१३ ऑक्टोबर २०२५ – सदस्यपदांसाठी आरक्षण सोडत काढली जाईल आणि प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध होईल.

हरकती व सूचना दाखल करणे

१४ ते १७ ऑक्टोबर २०२५ – प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ४ दिवसांचा कालावधी.

अंतिम आरक्षण प्रसिद्धी

३ नोव्हेंबर २०२५ – प्राप्त हरकतींचा विचार करून शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल.

नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठीही निवडणूक तयारी सुरू

जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसोबतच राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारीही सुरू झाली आहे. या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार यादीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी

८ ऑक्टोबर २०२५ – प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

हरकती व सूचना दाखल करणे

१३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत – प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख.

अंतिम मतदार यादी जाहीर

२८ ऑक्टोबर २०२५ – प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.

मतदार यादीबाबत महत्त्वाची नोंद

या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ जुल २०२५ पर्यंत अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरली जाईल. निवडणूक आयोगाकडून या यादीत नवीन नावांचा समावेश करणे, वगळणे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे अशी कार्यवाही केली जात नाही.

हरकती कशासाठी?

मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून झालेल्या चुका, चुकून प्रभाग बदलणे, किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे यांसारख्या दुरुस्त्यांसाठी मतदार हरकती व सूचना दाखल करू शकतात.

एकंदरीत, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी अंतिम आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. स्थानिक राजकारणातील ही सर्वात मोठी संधी असल्याने, सर्व इच्छूक उमेदवारांनी आता कोणतीही वेळ न दवडता, आपल्या उमेदवारीसाठी आणि प्रचारासाठी जोरदार तयारीला सुरुवात करणे अत्यावश्यक आहे.

नारायणडावर  दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी उपाय योजना करा – आ.संदीप क्षीरसागर

0

मनोज जरांगे यांची उपस्थितीत दसरा मेळावा

बीड — नारायणगड (धाकटी पंढरी) येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविक आणि नागरिकांसाठी उपाय योजना करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

महंत प्रेममूर्ती ह भ.प.श्री.शिवाजी महाराज आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत नारायणगड (धाकटी पंढरी) येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक येणार आहेत. त्यामुळे पोलिस विभागाकडून वाहतूक व्यवस्था, गर्दी नियंत्रण, सुरक्षेची काटेकोर व्यवस्था, आरोग्य विभागाकडून प्राथमिक उपचार केंद्र, रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय पथकांची उपलब्धता करून द्यावी, एस.टी.महामंडळाकडून अतिरिक्त बस गाड्यांची सोय व वाहतुकीची व्यवस्था करावी, तहसील कार्यालय व महसूल विभागाकडून आवश्यक शासकीय देखरेख, समन्वय, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत स्तरावरून स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था व इतर सोयीसुविधा देण्यात याव्यात. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे निरीक्षण व देखरेख यासाठी संबंधित अधिकारी यांच्या वतीने अंमलबजावणी करण्यात यावी. वरील प्रमाणे सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून आवश्यक ती कारवाई करावी जेणेकरून दसरा मेळावा शांततेत, निस्तबद्ध व यशस्वीपणे पार पडेल. सदर मेळाव्यास कोणताही अडथळा येऊ नये शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यासाठी आवश्यक सर्व शासकीय उपायोजना करण्यात याव्यात या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड, उपविभागीय अधिकारी बीड/पाटोदा, तहसीलदार बीड/ शिरूर कासार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड, जिल्हा शल्य चिकित्सक बीड,अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.ली.बीड,विभाग, नियंत्रक एस.टी महामंडळ बीड यांच्याकडे आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्रकातून मागणी केली आहे.

कपिलधारवाडीची माळीण होण्याची भीती

0

कपिलधारवाडी प्रश्न मा.अजित पवार यांची डॉ. ज्योती मेटे यांनी घेतली

गावात आणि परिसरात अनेक ठिकाणी रातोरात पडल्या भेगा

बीड — तालुक्यातील कपिलधार वाडी हे गाव डोंगराच्या कुशीत बसलेले आहे. या गावात आणि परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याचे पहावयास मिळत आहे. मागील काळात झालेला मुसळधार पाऊस आणि येणाऱ्या काळात परतीचा पाऊस पडल्यास या ठिकाणी माळीण सारखी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. गावकऱ्यांचे रात्रीतून स्थलांतर करण्यात आले असून भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना गरजेची आहे. यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांची शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी भेट घेतली.

परतीच्या पावसाने मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून गेला आहे. रस्ते पूल वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी देखील वाहून गेले आहेत. यातच बीड तालुक्यातील कपिलधार वाडी या गावाला भूस्खलनासारख्या संकटाला समोर जाण्याची वेळ आली आहे. या गावांमध्ये अनेक ठिकाणी जमिनींना भेगा पडल्या आहेत प्रशासनाने याची दखल घेत गावकऱ्यांना या ठिकाणाहून कपिलधार येतील मन्मथ स्वामी मंदिर येथे स्थलांतरित केले आहे. परंतु या गावकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासादायक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांच्याशी संवाद साधून व्यथा मांडल्यानंतर लागलीच डॉक्टर ज्योती मेटे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे तज्ञांमार्फत या गावाचे परिसराची पाहणी करण्यात येऊन यथोचित कार्यवाहीस्तव कृपया जिल्हाधिकारी यांस सुचित करावे तसेच गावकऱ्यांना आवश्यक ती मदत पुरविण्यात यावी आणि अतिवृष्टीमुळे ज्या गावातील रस्ते, पूल वाहून गेले आहेत त्या रस्ते व पुलांचे काम तत्काळ हाती घेण्यात यावे असे निवेदन सादर केले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्याच खिशावर फडणवीसांचा डल्ला;ऊस बिलातून गोळा करणार गल्ला!

0

मुंबई — राज्यातील अतिवृष्टी आणि पूर बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन पाच रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये कपात याप्रमाणे प्रतिटन १५ रुपये कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळपसंदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे यंदाचा (२०२५-२६) ऊस गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

मंत्रालयात फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सन २०२४ -२५ ऊस गाळप हंगामाचा आढावा आणि सन २०२५-२६ मधील नवीन गाळप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री (विदर्भ,तापी आणि कोकण विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे आणि साखर संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यात विशेषः सप्टेंंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मराठवाड्यात शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने विविध पातळीवर मदतकार्य सुरु केले आहे. ऊस गाळप हंगामात मुख्यमंत्री साह्यता निधीसाठी आजवर शेतकऱ्यांकडून प्रतिटन पाच रुपये कपात केली जात होती. मात्र यंदा अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यात तीनपट वाढ करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आता प्रतिटन ५ रुपयांवरुन १० रुपये आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन ५ रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत साखर संघाने अतिवृष्टी आणि पुराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांंनाही फटका बसला आहे.
अशावेळी कपातीमध्ये तीनपट वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असे सांगत या निर्णयास विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही कपात शेतकऱ्यांसाठीत असून त्यात गैर काही नाही असे सांगत साखर संघाचा विरोध झुगारुन देण्यात आल्याचे समजते. मागील गळीत हंगामातील ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमत(एफआरपी) शेतकऱ्यांची २९७ कोटींची थकबाकी काही साखर कारखान्यांनी दिली नसल्याची बाब यावेळी समितीच्या निद

यावेळी राज्यातील पाऊसाची परिस्थिती लक्षात घेऊन गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी प्रति मेट्रीक टन ३ हजार ५५० रुपये एफआरपी जाहीर करण्यात आली आहे.यंदाच्या ह्ंगामासाठी १३.७१ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाचे पीक असून एकूण ९४० लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या हंगामात सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून यामध्ये ९९ सहकारी व १०१ खाजगी कारखान्यांचा समावेश होता. शेतकऱ्यांना ३१ हजार ३०१ कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे. राज्याने ९९.०६ टक्के एफआरपी अदा केली आहे. यामध्ये १०० टक्के एफआरपी केलेल्या कारखान्यांची संख्या १४८ आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पात सन २०२४ -२५ मध्ये कारखान्यांनी निर्यात केलेली वीज २९८ कोटी युनिट्स असून कारखान्यांना वीज निर्यातीपासून प्राप्त उत्पन्न १९७९ कोटी आहे. कारखान्यांना इथेनॉल विक्रीपासून उत्पन्न ६ हजार ३७८ कोटी आहे, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.