Home Blog Page 50

बीड न.प निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रा.काँ. (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने बैठकीचे आयोजन

0

शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आ.संदीप क्षीरसागरांनी केले आवाहन

बीड  — आगामी बीड नगर परिषद निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे बीड शहरातील कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बीड नगर पालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक आरक्षण सोडतीनंतर आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दि.11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन,बार्शी रोड,बीड येथे होणार असून या बैठकीस आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नगर परिषद निवडणुकी संदर्भातील संघटनात्मक तयारी, उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार आराखडा आणि पक्ष बळकटीकरण यावर सविस्तर चर्चा होणार आहे. बीड शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) तर्फे आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

आबाऽऽबाऽऽ! एम पी डी ए तुन बाहेर येताच गुटख्याची पाळे”मुळे”बीड जिल्ह्यात रुजली? वाशीत कारवाई बीडमध्ये दिलजमाई

0

बीड — गुटखा माफिया आबा मुळे एमपीडीए सारख्या कारवाईतून बाहेर पडताच आपलं बस्तान बसविण्यासाठी धाराशिवमधून आपली मूळं बीड जिल्ह्यात पसरली असल्याचे सांगितले जाते. स्थानिक गुन्हे शाखेसह नेकनूर बीड ग्रामीण, पेठ बीड यांना मोठी बिदागी देऊन पिक अप च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुटखा जिल्ह्यात सप्लाय केला जात आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्यामुळे गुटखा माफीयांना हातपाय पसरायला बीड जिल्ह्यात जड जात आहे. पण “घर का भेदी लंका ढाय” अन् एस पी चा आदेश करणार काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. गुटख्यातील माफियागिरीला आळा घालण्यासाठी आबा मुळे वर एम पी डी ए अंतर्गत कारवाई देखील केली.पण यातून बाहेर पडताच आबा मुळेने गुटखा तस्करीचे केंद्र म्हणून धाराशिव जिल्ह्याचा वापर करायला सुरुवात केल्याच्या चर्चा आहेत.दरम्यान इथूनच मग आपली पाळे मूळे बीड जिल्ह्यात देखील पसरली आहेत. वाशी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी करणं सोपं जात असल्यामुळे तिथून सगळी सूत्र हलवली जात आहेत. गुटखा तस्करीला कुठेही अडथळा येऊ नये यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पेठ बीड, बीड ग्रामीण, नेकनूर,केज पोलीस ठाणे यांच्या प्रमुखांना बांधील बिदागी मोठ्या प्रमाणावर वाटप देखील केली जाते. परिणामी गुटखा तस्करीसाठी धाराशिव व बीड जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर सुरक्षित वातावरण निर्मिती केली गेली आहे. बीड जिल्ह्याच प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या मांजरा नदी किनारी महामार्ग पोलीस ढगारे आणि वाशी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून 13 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 6 लाख 60 हजार रुपयांचा माल तसेच पिक अप देखील हाती सापडला. हा प्रतिबंधित गुटख्याचा माल बीड जिल्ह्यात सप्लाय साठी आणण्यात येत होता. बीड जिल्ह्यात गुटखा माफियाला आपली पाळमूळ खोलवर रुजवण्यात कोण सहकार्य करत आहे? सहकार्य करणारांची चौकशी पोलीस अधीक्षक करणार का? आपल्याच घरात लपून बसलेल्या बिभीषणाला पोलीस अधीक्षक आळा घालणार का? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

मराठवाडयात 10 कोटी 78 लाख रूपयांची वीज चोरी उघड

0

10 कोटी 29 लाख रूपये दंडाची रक्कम वसूल

छ. संभाजीनगर — महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या मंडल कार्यालय अंतर्गत माहे एप्रिल 2025 ते 30 सप्टेबर 2025 या सहा महिन्यांच्या कालावधीत वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 2,593 वीज मिटरची तपासणी व इतर अनियमिततेची पाहणी करण्यात आली. यात 1,186 मिटरमध्ये वीज चोरी आढळून आली. यात 11304547 युनिट वीज चोरी प्रकरणी 10 कोटी 78 लाख 87 हजार रूपयांच्या अनुमानित वीज बिल दंडाच्या रक्कमेची आकारणी करण्यात आली आहे. या प्रकरणात 10 कोटी 29 लाख 40 हजार रूपये वसूल करण्यात आले आहेत.संबंधित 191 वीजचोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वीज चोरीची रक्कम कोटी रूपयांमध्ये पुढील प्रमाणे
वीज चोरी पथक ग्राहक वीज चोरीची रक्कम
छत्रपती संभाजीनगर शहर  280.         337.02
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 136         137.36
जालना   157          106.55
छत्रपती संभाजीनगर
परिमंडल.   573               620.93

बीड  — 77                    21.41
धाराशिव  — 140           95.17
 लातूर —         177.              170.20
लातूर परिमंडल.    394.         286.78
नांदेड                  170.               122.94

परभणी.            49.                          88.23
नांदेड परिमंडल.    219.         211.17
मराठवाडा एकूण.   1186            1078.87

मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण, जालना, परभणी, नांदेड, लातूर,धाराशिव व बीड जिल्हयात एप्रिल 2025 ते 30 सप्टेबर 2025 या कालावधीत भरारी पथक आणि दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविण्यात आली. विघुत कायदा 2003 नुसार कलम 126 अंतर्गत शेजा—याकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुस—या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो. तसेच कलम 135 मध्ये मिटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सव्हिेसवायर टॅप करणे व कलम 138 मध्ये महावितरणचे मिटर, वायरसह इतर वस्तु चोरी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो.
वीज चोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. अनधिकृत विजेचा वापर करू नये. आगामी काळात वीज चोराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अनधिकृतपणे विजेचा वापर करतांना आढळून आल्यास विघुत कायदयानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणचे प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांनी दिले आहेत

एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाचा मोठा निर्णय!

0

मुंबई — एससटी महामंडळाने आपल्या विविध मागण्यासाठी येत्या १३ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. असे असतानाच आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या पगारासाठी काल राज्य शासनाने ४७१.०५ कोटीचा निधी देण्यास मंजूरी दिली आहे.

त्यातच आता दिपावली सणासाठी आता सण उत्सव अग्रीम उचल देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरचे वेतन मिळणार आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण तोंडावर आल्याने ऊत्सव अग्रीम उचल मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. या वर्षाचा दिपावली हा सण दि.२१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांची रु. १२,५००/- उत्सव अग्रीम घेण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांचे विभाग नियंत्रकांकडे अर्ज जमा करावेत. त्या अर्जाची तपासणी करुन पात्र कर्मचाऱ्यांची यादी १५ ऑक्टोबर २०२५ पर्यन्त या कार्यालयास पाठवावी असे आदेश देण्यात आले आहेत.

उत्सव अग्रीम मिळण्यासाठी कमाल मूळ वेतन मर्यादा रु.४३४७७/- इतकी ठेवण्यात आली आहे. याचा अर्थ ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन रु. ४३४७७/- पेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम मिळणार नाही असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे. शिवाय ज्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती अग्रीम वाटपापासून १० महिन्यांच्या आत असेल अशा कर्मचाऱ्यांनी उत्सव अग्रीम अर्जाचा विचार करु नये असेही या पत्रकात म्हटले आहे. अग्रीम वाटपाकरीता आपल्या घटकास किती रक्कम लागणार आहे याची माहिती दि. १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत विभागीय लेखा अधिकारी राज्य परिवहनाला कळवावी असे या पत्रकात म्हटले आहे.विभागिय कार्यालयातील इच्छुक कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज हे संबंधित शाखा प्रमुख यांच्या मार्फतच पाठवावेत. स्वतंत्रपणे अर्ज सादर करु नयेत, ते स्वीकारले जाणार नाहीत असेही पत्रकात म्हटले आहे.

कपिलधारवाडीत भूगर्भ सर्वेक्षण पथकाची पाहणी, तातडीने पुनर्वसनाचे निर्देश

0
बीड —  कपिलधारवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या व अतिवृष्टीमुळे जमिनीचा पृष्ठभाग खचला असून, अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत तसेच रस्त्यांवर खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या भूस्खलनग्रस्त क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचे (GSI) संचालक मेगो चासी आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक संदीपकुमार शर्मा यांनी बुधवारी स्थळाची पाहणी केली. त्यांनी प्राथमिक निरीक्षण अहवाल सादर करत नमूद केले की, संबंधित भागात पाण्याचा नैसर्गिक निचरा न झाल्याने भूपृष्ठाखाली पाणी साचले आहे आणि त्यामुळे भूस्खलनाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. काही कुटुंबांवर तत्काळ धोका असल्याने त्यांचे तात्पुरते पुनर्वसन आवश्यक असल्याचे त्यांनी सुचविले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशासनास प्रतिबंधात्मक आणि पुनर्वसनात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अधिकारी बैठक घेऊन परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला.
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने स्थलांतरित कुटुंबांसाठी मन्मथस्वामी देवस्थान परिसरात तात्पुरती निवारा व अन्नाची व्यवस्था केली आहे. महिलांना साड्या व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून, मदतकार्य व पाहणीसाठी अधिकाऱ्यांची सतत उपस्थिती आहे.प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत सांगितले की, “परिस्थिती नियंत्रणात असून प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे.

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत होणार शिवाजीराव पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा

0

बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे
अभिष्टचिंतन सोहळा आयोजन समितीचे आवाहन

ना. राजन पाटील यांची प्रमुख उपस्थिती

गेवराई — तालुक्याचे भाग्यविधाते माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार , दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. शिवनगरी, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ (नाना) बागडे, श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज, श्रीक्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ.प. महादेव महाराज, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. राजन पाटील यांच्या शुभहस्ते शिवाजीराव पंडित यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार असून यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीने केले आहे.

गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भिष्माचार्य म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि.३ ऑक्टोबर पासून गेवराई शहरात श्रीमद्‌‍ भागवत कथा आणि भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भावरत्न समाधान महाराज शर्मा यांच्या मधूर वाणीतून सुरु असलेल्या भागवत कथेमुळे गेवराईचे वातावरण भक्तिमय झाले आहे. अनेक नामांकित किर्तनकारांची सेवा सप्ताहभर सुरु आहे.

शुक्रवार दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ (नाना) बागडे यांच्या हस्ते माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.शिवाजी महाराज, श्री क्षेत्र चाकरवाडीचे ह.भ.प. महादेव महाराज यांच्यासह साधु, संत-महंत आणि गेवराई तालुक्यातील वारकरी सांप्रदायात काम करणारे किर्तनकार, गायक, वादक यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने होणार कीर्तन महोत्सवाचा समारोप

माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात गेवराई विधानसभा मतदार संघातील सर्व साधु, संत-महंत, किर्तनकार यांचाही हृदय सत्कार अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त होणाऱ्या भव्य सत्कार समारंभानंतर ह.भ.प.शिवाजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद वाटप केला जाणार आहे भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही आयोजन समितीने केले आहे.

कार्यकर्ते एकत्र येऊन
करत आहेत दादांचे अभिष्टचिंतन

शिवाजीराव पंडित आणि शिवछत्र परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून किर्तन महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले आहे. र.भ.आट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या शिवनगरीत गेल्या सप्ताहभर सुरु असलेल्या किर्तन महोत्सवाला भाविक भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. याप्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

एलसीबी पथकाने घाटनांदुर मध्ये मारलेल्या छाप्यात 12 किलो गांजा जप्त

0

बीड — अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे अण्णाभाऊ साठे चौकाजवळील घरावर स्थानिक गुन्हे शाखेने मारलेल्या छाप्यात बारा किलो गांजा जप्त करण्यात आला.
पोलिस अधीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून घाटनांदूर (ता.अंबाजोगाई) येथे मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक करून चोरून विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड सहायक पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप यांच्या पथकाने व अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे पोलिस निरिक्षक मुरलीधर खोकले यांनी संयुक्तपणे मंगळवारी (दि.7 ) रात्री निहाल रामभाऊ गंगणे याच्या घरावर छापा मारून 2 लाख 43 हजार 720 रुपये किंमतीचा 12 किलो गांजा जप्त केला असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे रामचंद्र परशुराम केकान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजनवतीत महिलेवर चौघांचा प्राणघातक हल्ला; पाय तोडण्याचा प्रयत्न

0

बीड — शेतीच्या वादातून महिलेवर भावकीतील चार जणांनी प्राणघातक हल्ला करत तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न केल्याची खळबळ जनक घटना चौसाळा जवळील अंजनवती येथे घडली आहे.
अश्विनी येडे असं मारहाण झालेल्या पीडित महिलेचं नाव आहे. तिच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघण्याची सुरू झालेली मालिका अजूनही चालूच आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात राहणाऱ्या आश्विनी येडे या महिलेला निर्दयीपणे मारहाण करून तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही मारहाण भावकीतील चार जणांनी केल्याचे उघड झाले आहे. तसेच शेतीच्या वादातून आश्विनी येडे या महिलेवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आश्विनी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
विशेष म्हणजे आरोपीकडून याआधीही तीन महिलांवर अशाच पद्धतीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यापूर्वी इतर महिलेला मारहाण करतानाचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. महिलांना अमानुष मारहाण करतानाचा हा व्हिडिओ तीन महिन्यापूर्वीचा असून बीड जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेकनूर पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणामुळे कुटुंब मोठ्या दहशतीत असून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून आरोपींना जेरबंद करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

तारखांच्या चक्रव्यूहात अडकली “शिवसेनेच्या पक्ष चिन्हाची सुप्रीम सुनावणी

0

नवी दिल्ली — शिवसेना पक्ष आणि त्याच्या धनुष्यबाण या चिन्हावरून सुरू असलेल्या वादाची सुनावणी आज ८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादास सुरुवात केली.मात्र, ही सुनावणी पूर्ण न होता आता १२ आणि १३ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

या सुनावणीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, ‘खरी शिवसेना कोणाची?’ या प्रश्नाचे उत्तर पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजच्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल  यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका  होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची लवकर सुनावणी घेणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी त्यांनी न्यायालयासमोर केली.

सिब्बल यांच्या युक्तिवादादरम्यान काही अन्य वकिलांनी वारंवार मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, त्यावर त्यांनी ‘आधीच खूप वेळ गेला आहे, कृपया आम्हाला आमचा वेळ द्या,’ असे सांगत आपली बाजू स्पष्ट केली. त्यांनी आपल्या युक्तिवादासाठी किमान ४५ मिनिटांचा वेळ मागितला, त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी १२ आणि १३ नोव्हेंबरला घेण्याचे ठरवले.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद होईल. त्यानंतर खऱ्या शिवसेनेबाबतचा अंतिम निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल घडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले की, ‘आम्ही कोर्टात महापालिका निवडणुका जानेवारीत होणार आहेत, हे स्पष्ट केले. न्यायालयाने आम्हाला सांगितले की त्या निवडणुका होण्यापूर्वीच ही सुनावणी पूर्ण केली जाईल.’ सुरुवातीला १९ नोव्हेंबर ही तारीख विचारात होती, परंतु कोर्टाने आधीची म्हणजेच १२ नोव्हेंबरची तारीख दिली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

असीम सरोदे यांच्या मते, १२ नोव्हेंबरपासून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आपला युक्तिवाद सुरू करतील, त्यानंतर इतर वकील बाजू मांडतील. त्यामुळे १२, १३ आणि १४ नोव्हेंबर या तीन दिवसांत सुनावणी पूर्ण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे, आगामी निवडणुका आणि शिवसेनेचे भवितव्य यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली “नव”चेतना;दीड हजार गरजूंना दिला संसारोपयोगी वस्तू व किराणा

0

बीड — नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी व शेतमजुरांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ’नवचेतना ’ सर्वांगीण विकास केंद्र सरसावले असून बीड जिल्ह्यातील दीड हजार पूरग्रस्तांना संसार उपयोगी वस्तू व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. बुधवारी बीड तालुक्यातील हिंगणी बुद्रुक येथील 65 गरजूंना संसार उपयोगी साहित्य व किराणा किट चे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या प्रमुख मनीषा घुले यांची विशेष उपस्थिती होती.

मागील पंधरवड्यात मराठवाड्यात बहुतां जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आजही पाणी साचलेले आहे. हातात तोंडाशी आलेली पिके आसमानी संकटामुळे उध्वस्त झाली आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांवर मोठे संकट ओढवले आहे. या बिकट परिस्थितीमध्ये बीड मधील नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या मनीषा घुले यांनी शेतकरी व शेतमजूर यांना मदतीचा हात दिला आहे .

बीड जिल्ह्यात अति पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासन पंचनामे करत आहे शासनाची मदत येण्यासाठी वेळ जाणार आहे तोपर्यंत जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना मदत व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या वतीने मदत केली जात आहे मराठवाड्यातल्या विविध भागांमध्ये अनेक संस्था शेतकरी व शेतमजुरांच्या मदतीसाठी धावून आलेल्या आहेत अनेक ठिकाणी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे याचाच एक भाग म्हणून नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या वतीने बीड तालुक्यातील गरजवंत शेतकरी व शेतमजूर यांना मदत केली जात आहे.

नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या मनीषा घुले यांनी बीड जिल्ह्यातील विविध भागात एकूण दीड हजार पूरग्रस्त नागरिकांना संसार उपयोगी वस्तू व किराणा साहित्याचे वाटप केले आहे. गेवराई सह इतर तालुक्यांमध्ये देखील संस्थेच्या वतीने मदतीचा हात गरजूंना दिला आहे. यामध्ये बुधवारी बीड तालुक्यातील हिंगणी बु. येथील गरजूंना संसार उपयोगी वस्तू व किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा घुले, सुरज वैष्णव, दत्ता घुले, बबनदास वैष्णव, आदींची उपस्थिती होती.