Home Blog Page 48

चोरट्यांची मध्यरात्री शेतकऱ्यांना बेदम मारहाण; दागिने ओरबडल्याने महिलेचा कान फाटला

0

आष्टी — मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांच्या घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण केली आणि 3 तोळे सोने व रोख 13 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील अरणविहरा येथे घडली.

अरणविहरा येथील नवनाथ जाधव आणि रावसाहेब जाधव या दोन शेतकऱ्यांची घरे अर्धा किलोमीटर अंतरावर आहेत. नेहमीप्रमाणे जेवण करून गाढ झोपलेल्या या कुटुंबांना लक्ष्य करत चोरट्यांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास बंद घराचे दार तोडून आत प्रवेश केला. घरात ठेवलेले सोने आणि पैसे लुटल्यानंतर त्यांनी कुटुंबातील वृद्धांना धमकावले. वृद्ध दाम्पत्याने याला विरोध करताच, चोरट्यांनी अमानुषपणे त्यांना मारहाण केली. दागिने ओरबाडून घेत असताना महिलेच्या कानातील दागिने काढताना तिचा कान तुटला आणि नाकालाही गंभीर दुखापत झाली. पुरुषांनाही बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान, गंभीर जखमी शेऊबाई नवनाथ जाधव, नवनाथ नारायण जाधव यांच्यावर अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून, बिबट्याप्रमाणेच आता चोरटेही आपली ‘गाव’ बदलून दहशत माजवत असल्याचे दिसत आहे. एकीकडे बिबट्या तर दुसरीकडे घरातही असुरक्षितता निर्माण झाली आहे. सरपंच अण्णासाहेब शिरसाठ यांनी तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करून परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे.

बीडच्या झमझम कॉलनीत अडीच लाखाचा गुटखा जप्त

0

बीड — शहरातील झमझम कॉलनी मध्ये प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहिती आधारे पोलिसांनी पत्र्याच्या शेडवर मारलेल्या छाप्यात अडीच लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी अवैध धंद्या विरोधात कारवाई करण्यासाठी आदेशित केले आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या कारवाया करणे सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेला पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा साठवून ठेवल्याची गूप्त माहिती मिळाली होती. या माहिती आधारे पोलिसांनी दुपारी पाच वाजेच्या सुमारास पत्र्याच्या शेड वर छापा मारला. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये 2 लाख41 हजार 875 रुपयांचा गोवा गुटखा जप्त करण्यात आला.
सय्यद अजमदउल्ला याने सय्यद रजाउल्लाह याच्या सांगण्यावरून पत्र्याच्या शेडमध्ये पांढ-या रंगाच्या 15 गोण्यामध्ये गोवा गुटखा विक्रीसाठी ठेवला होता. दरम्यान याप्रकरणी दोघाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, गोविंद राख, बागवान, राहुल शिंदे, अंकुश वरपे,आनंद मस्के, स्वाती मुंडे, बबन सलगर, अलीम शेख, सुनिल राठोड यांनी केली.

न.प. अध्यक्षपदी नव्या महिला नेतृत्वाला संधी मिळणार – डॉ योगेश क्षीरसागर

0

बीड — नगरपरिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीतील महिलेसाठी आरक्षित असल्याने आता नव्या महिला नेतृत्वाला संधी मिळणार आहे. ज्यांना पूर्वी संधी मिळाली नाही, त्यांचाही विचार केला जाईल. तसेच, ५० टक्के प्रतिनिधित्व तरुणांना दिले जाईल. गेली ३० वर्ष बीडकरांनी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. ही विजयाची परंपरा पुढेही कायम राहणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत बीडमध्ये सौ.के.एस.के. महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (दि.१६) बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ.सारिकाताई क्षीरसागर, माजी नगरसेवक किशोर काळे, गणेश वाघमारे, भास्कर जाधव, नरसिंग नाईकवाडे, शिवाजी जाधव, संजय होळकर, शुभम धूत, अशोक वाघमारे, विकास जोगदंड, प्रकाश कानगावकर, प्रेम चांदणे, रवी जवेरी, राहुल गुरखुदे, बाळासाहेब जाधव, सुभाष सपकाळ, संगीता वाघमारे, शालिनी परदेशी, मुस्तफा भाई, नशीर अन्सारी, बाळासाहेब आंबेकर, महेश गर्जे, अमोल पवळ, साउद भाई, सतीश पवार, नबील जमा, बाळासाहेब गुंजाळ, दत्ता जाधव, संभाजी दुधाळ, रवींद्र कदम, जुनेद जहागिरदार, अशोक शेजवळ, बाबू अत्तार, मुजीब एवन, गुड्डू चाऊस, बिलाल, असरार, पिंटू माने, खमर, द्वारकादास फटाले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, नगरपरिषद निवडणूक ही आपल्यासाठी नवी नाही. परिस्थिती काहीही असो, शहरातील जनता आपल्या सोबत उभी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बीड नगरपरिषद निवडणुकीत मी माझ्या विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक ताकद लावणार आहे. कायम निष्ठेने सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनाच पक्षाकडून संधी दिली जाणार आहे. परंतु आपण उभे केलेले काही लोक आज पक्षातील नेत्यांकडेच आपली तक्रार करत आहेत, ही खेदजनक बाब आहे. प्रत्येकाने आपापले घर मजबूत करावे, इतरांकडे पाहू नये. ज्यांना आजपर्यंत स्वतःची नगरपरिषद ताब्यात घेता आली नाही, ते बीडमध्ये येऊन काय करणार? असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालून आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. अजितदादांनी बीड शहरासाठी सर्वाधिक निधी दिला आहे. सीट्रिपलआयटी, शासकीय इमारती, नदी सुशोभीकरण, डीपी रस्ते यांसारखे महत्वाचे विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. अनेक प्रस्तावांवर बसून चर्चा करून निधी मिळवला, परंतु त्याचे श्रेय आमदार घेत आहेत. आमदारांचा फंड नेमका कुठे गेला याबाबत मात्र कोणी बोलत नाही. माजी आमदारांच्या कामांचे बोर्ड दिसतात; मात्र निधी कोणत्या कामावर खर्च झाला याचा हिशोब कोणी देत नाही, असेही त्यांनी नमूद केले. बीडच्या विकासासाठी नगरपरिषद निवडणूक आपल्या ताब्यात येणे आवश्यक आहे. गेल्या तीन ते साडेतीन दशकांत मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. मात्र लोकसंख्या व क्षेत्रफळ वाढल्याने शहराच्या हद्दीबाहेरील भागात विकासकामे अद्याप अपूर्ण आहेत, असेही ते म्हणाले. या बैठकीत अनेकांनी मनोगत व्यक्त केले. तसेच, आगामी निवडणुकीची रणनीती, संभाव्य उमेदवारांबाबत प्राथमिक चर्चा झाली. नगरपरिषद निवडणूक नियोजनबद्ध पद्धतीने लढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांसाठी पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार : डॉ.सारिकाताई क्षीरसागर

डॉ.सारिकाताई क्षीरसागर मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, डॉ.योगेश क्षीरसागर हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. त्यांचा शांत स्वभाव आहे, याचा अर्थ आम्ही कमजोर नाहीत. डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड शहराचा विकास केला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉ.योगेश हे राजकारणात पुढे जात आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सोबत असलेल्या निष्ठावंत, विकासाभिमुख उमेदवारांना नगरपरिषदेत संधी दिली जाणार आहे. आता महिलांनी नेतृत्व करण्यासाठी सज्ज रहावे. आम्ही निवडणूक लढविणार की नाही, याबाबत निर्णय नाही. परंतु कार्यकर्त्यांसाठी मात्र पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार आहोत. शहरात वॉर्ड ५२ की ५० हे विरोधकांना ठाऊक नाही. त्यांनी शहरात नेमका विकास कुठे केला? हे दाखवून द्यावे, असा टोला विरोधकांना लगावला.

कामगार कल्याण अधिकारी “सुधा”कर ‘कोना’ले मध्येच खरी कळ; घोटाळे करणारानाचं दिल जातंय बळ !

0

बीड — बांधकाम कामगार कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचारी कारभार चव्हाट्यावर येऊन “सुधा”कर ही नाही अन् डर ही नाही.”कोनाले” भ्यायचे कारणच नाही. असं म्हणत घडत असलेल्या प्रकरणांची चौकशी करण्याऐवजी कामगार कल्याण अधिकाऱ्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांची बदली करून प्रकरण दाबण्याचा खाल्लेलं जिरवण्याचा निष्फळ प्रयत्न केला आहे.
बीडचं कामगार कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बनवून ठेवला. दलाला सह अनेकांनी कामगारांचे अधिकार व योजना खाऊन माया जमवली. कामगारांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या योजना कामगारांचं कल्याण तर करू शकल्या नाहीच पण कर्मचारी मात्र रंगीलाल झाले. हे प्रकरण “सह्याद्री माझा” ने लावून धरलं. भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामगार कल्याण अधिकाऱ्यांनी कुठलीच ठोस कारवाई केली नाही. फक्त जगदाक्षायणी त्यांच्या बदल्या केल्या. बदल्या करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचं काम “सुधा”कर ‘त’असल्याचं दिसलं. महिना दोन महिने कर्मचारी कार्यालयात दिसले नाहीत. तर झालेला भ्रष्टाचार पचवायला आता सोपा जाईल. “कोनाले” काय कळणार? अशी धारणा ठेवून बदली प्रक्रिया राबवण्यात आली. चौकशी ची कारवाई न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांना एवढं पाठीशी घालण्यामागे कामगार कल्याण अधिकार्‍यांचा स्वार्थ दडला आहे. हे न समजण्याइतकी दूध खुळी जनता निश्चितच नाही. एक दोन महिन्यानंतर हे कर्मचारी पुन्हा आहे त्याच जागेवर दिसतील. पुन्हा भ्रष्टाचाराची परिस्थिती जैसे थेच राहणार? आपलं कल्याण यातून होतच राहणार याची जाणीव ठेवून ही कृती करण्यात आली. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नि:पक्ष चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी ही धरलेली अपेक्षा सपशेल फेल ठरवण्याचं काम केलं गेलं. मग आता या प्रकरणात कामगार कल्याण अधिकारी “कोनाले”तच आहे खरी कळ; म्हणून घोटाळे करणाऱ्यांनाच दिलं जातंय बळ असं जनतेतून बोललं जाऊ लागला आहे. गोरगरिब बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजना ग्रामपंचायत, नगरपालिकांचे खोटे सही शिक्के तयार करून बोगस लाभार्थ्यांना फायदा देण्याचं काम केलं गेलं. ग्रामपंचायत चे बोगस सही शिक्के तयार करण त्यांचा दुरुपयोग करणं गंभीर गुन्हा असताना देखील यामध्ये कामगार कल्याण अधिकारी यांना त्याचं काहीच वाटलं नाही. कमीत कमी स्वतःच नाव “विवेक” असलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आपला “विवेक” जागा ठेवत कामगार कल्याण अधिकाऱ्यांसह कंत्राटी कामगारावर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी कामगारांमधून होऊ लागली आहे.

“ब्राह्मण एक सुधारक”व्हाट्सअप ग्रुप तर्फे विस्थापित कपिलधारवाडीकरांना फराळाचे वाटप

0

बीड — यावर्षी अतिवृष्टीच्या संकटाने शेतकरी वर्ग उध्वस्त केला आहे.पिकं पाण्याखाली गेल्याने केलेला खर्चही निघाला नाही. त्यातच कपिलधारवाडी मध्ये भूस्खलन झाल्याने ग्रामस्थ विस्थापित झाले आहेत. याच विस्थापितांच्या मुखी दिवाळीचे गोडधोड जावे या उद्देशाने “ब्राह्मण एक सुधारक” या व्हाट्सअप ग्रुपने आज फराळाचे वाटप केले.


यावर्षी अतिवृष्टी झाल्याने पूरबाधित शेतकरी पीक नुकसानीमुळे दिवाळी कशी साजरी होणार? वर्षभर जगायचं कसं? पेरणीसाठी घेतलेला पैसा फेडायचा कसा? या प्रश्नात अडकलेला आहे. हे संकट कमी की काय म्हणून कपिलधारवाडीकर भूस्खलनाने भयभीत झाले आहे. येथील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागायचा आहे.अशावेळी विस्थापित झालेल्या या ग्रामस्थ बंधूंच्या घरात दिवाळी साजरी होण अवघड होऊन बसलं आहे. दिवाळीच्या प्रसंगी आपल्या घासातला घास यांना देणं ही आपली जबाबदारी आहे.

आपल्या आधी दिवाळी फराळाचे चार घास त्यांच्या मुखात जावे याची सामाजिक जाण ठेवून ब्राह्मण एक सुधारक ग्रुपवर अॅड. दीपक कुलकर्णी यांनी आवाहन केलं. ग्रुपमधील लोकांमधूनच निधी गोळा केला. स्वेच्छेने दिलेल्या निधीतूनच आज कपिलधारवाडीतील 90 कुटुंबांना दिवाळीच्या फराळाचं वाटप केलं. यावेळी व्हाट्सअप ग्रुपमधील अनेक जण उपस्थित होते.

पीक कर्जासाठी चौसाळा स्टेट बँके समोर आमरण उपोषण करणार – बाळासाहेब मोरे 

0

चौसाळा — येथील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेमध्ये चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून खरीपाच्या पिकासाठी पीक कर्जाची मागणी केलेली आहे. परंतु सध्या खरिपाच्या पिकांची काढणी झाली तरी शेकडो शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळालेले नसून पीक कर्जासाठी टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे अद्याप पर्यंत शेकडो शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. तसेच बँकेच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी २९ ऑक्टोबर बुधवार रोजी रोजी चौसाळा शाखेसमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे अविनाश उर्फ बाळासाहेब मोरे पाटील यांनी जिल्हाधिकारी बीड, स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा बीड, जिल्हा अग्रणी बँक बीड यांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे.
पीक कर्जाची मागणी केलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत लाभ मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्यात येईल व यावेळी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चौसाळा व क्षेत्रीय कार्यालय बीड यांची राहील असे निवेदन बाळासाहेब मोरे पाटील यांनी दिलेले आहे.
अगोदरच अतिवृष्टीच्या दुष्टचक्रात शेतकरी पूर्णपणे खचलेला असून बँकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना बँकेत वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वायाला जात आहेत. तसेच सध्या पिकांच्या काढणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील कामही बुडत आहे. आता तरी बँक प्रशासनाने मनमानी कारभार थांबवून शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. म्हणजे किमान त्यांना आता रब्बीच्या पेरणीसाठी तरी हे पीक कर्ज उपयोगी येईल असे प्रसार माध्यमांना प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात अविनाश उर्फ बाळासाहेब मोरे पाटील यांनी सांगितले आहे.

लाडेवडगावात ह.भ.प.अर्जुन महाराज लाड यांच्या एकसष्ठी सोहळ्याला गर्दी

0

संत, कीर्तनकारांची उपस्थिती; ह.भ.प. संदिपान महाराज हासेगावकर यांचे कीर्तन

केज — तालुक्यातील होळ येथील भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, व्याकरणाचार्य ह.भ.प.अर्जुन महाराज लाड यांच्या एकसष्ठी सोहळ्यानिमित्त अखंड रामकृष्णहरी नामजप यज्ञ सोहळ्याची सांगता लाडेवडगाव येथील वेदांत साधनास्थली गुरुकुल आश्रमावर मंगळवारी (दि. १४) झाली. यावेळी ज्ञानसिंधू ह.भ.प. संदिपान महाराज हासेगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले.

या सोहळ्यास स्वामी भारतानंद गिरी, नामदेव महाराज शास्त्री, महादेव महाराज चाकरवाडीकर, लक्ष्मण महाराज मेंगडे, आदिनाथ महाराज, मनिषानंद स्वामी, सोपान महाराज सानप, महारुद्र खाडे महाराज, प्रकाश महाराज साठे, नाना महाराज कदम, पांडुरंग महाराज मुंडे, डॉ.प्रल्हाद महाराज शास्त्री, आप्पा महाराज चौरे, अर्जुन महाराज लटपटे, पांडुरंग महाराज डोंगरेश्वर यांच्यासह राज्यभरातील वारकरी संप्रदायातील संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील माजी मंत्री पंडितराव दौंड, नंदकिशोर मुंदडा, रमेश आडसकर, काशीराम कराड, भाई ज्ञानोबा मुंडे, बन्सी सिरसट, संतोष हांगे, विष्णू घुले, हिंदूलाल काकडे, नेताजी शिंदे, सूर्यभान मुंडे, पिंटू ठोंबरे, सौरभ सोनवणे, भगवान केदार, दत्ता धस, अयोध्याताई केंद्रे आदी मान्यवरही उपस्थित होते. यावेळी मान्यवरांसह अनेकांनी अर्जुन महाराज लाड यांचे अभिष्टचिंतन करत सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाडेवडगाव व होळ ग्रामस्थांसह भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था, वेदांत साधनास्थली गुरुकुल आश्रमाचे आजी-माजी विद्यार्थी आणि भाविकांनी परिश्रम घेतले.

नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते अर्जुन महाराज लाड यांचा सत्कार

नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते अर्जुन महाराज लाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “अर्जुन महाराज लाड यांनी वेदांत साधनास्थली गुरुकुल आश्रम व भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करून वारकरी संप्रदायात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी आयुष्याची ६१ वर्षे पूर्ण केली असून ते ३४ अपघातांतून बचावले आहेत. यामागे पांडुरंगाची कृपा आहे.” भगवानगडाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असून ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरानंतर पहिल्यांदाच भगवानगडावर मंदिर उभारण्यात येत आहे. त्या सोहळ्याचे निमंत्रणही याप्रसंगी देण्यात आले.

राज्यभरातून भाविकांची हजेरी

अर्जुन महाराज लाड यांचे अनुयायी, भाविक व विद्यार्थी राज्यभरात मोठ्या संख्येने आहेत. या सोहळ्यास भाविकांची लक्षणीय गर्दी होती. यावेळी मांडे जेवणाचा आस्वाद घेण्यात आला. कार्यक्रमासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कैद्यांच्या धर्मांतराचे प्रयत्न भोवले; पेट्रस गायकवाड बीडमधून गेले

0

बीड — सक्तीने कैद्यांचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपावरून वादग्रस्त ठरलेले कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड विरोधात राज्यात वादळ उठले आहे. याचं प्रकरणामुळे त्यांची उचल बांगडी करण्यात आली आहे.
बीड कारागृह सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारागृहात असलेल्या वाल्मीक कराड प्रकरणावरून अनेक वेळा बीड कारागृह या ना त्याकारणाने नेहमी चर्चेत राहिले आहे. पेट्रस गायकवाड‌ कारागृह अधीक्षक बनल्यानंतर मात्र कारागृहात महापुरुषांचे फोटो काढून टाकण्यात आले. भजन कीर्तन बंद करण्यात आले. याबरोबरच कारागृहातील भिंतीवर बायबलचे श्लोक लिहिण्याचं कामही त्यांनी करून घेतलं. कारागृहातील कैद्यांना स्वतःची घरची कामे देखील करण्यास भाग पाडले जात होते. या संदर्भात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आवाज उठवला होता. आरोपांचं वादळ उठल्यानंतर राज्यात खळबळ माजली. अखेर पेट्रस गायकवाड यांच्या या कारनाम्यामुळे अखेर बदली करण्यात आली. नागपूर येथे उपाधिक्षक म्हणून त्यांना पाठविण्यात आले आहे.

सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाची आत्महत्या

0

गेवराई — तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत पत्नी आणि सासरच्या मंडळींना कंटाळून जावयाने गळफास घेत आत्‍महत्‍या केल्‍याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन तलवाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भागवत अंकुश राठोड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई सुनिता राठोड यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार भागवत राठोड याला पत्नी, सासरा आणि मामेसासरा हे मानसिक त्रास देत होते. त्यामुळे तो नैराश्यात होता असे म्हटले आहे.
त्यातूनच त्याने 1 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली, ज्यात होणाऱ्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. मुलाच्या निधनाच्या दुःखातून सावरल्यानंतर भागवतच्या आईने पोलिसांत ही तक्रार नोंदविली आहे.दरम्यान, याप्रकरणी त्याची पत्नी राणी राठोड, सासरा संतोष राठोड आणि मामेसासरा दत्ता राठोड यांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, सासरच्या त्रासाल कंटाळून जीव देण्यापर्यंत टोकाचे पाऊस भागवतने का उचलले, याचाही तपास पोलीस करत आहेत.

राहू,केतू शनिच्या फेऱ्यातले बांधकाम कामगार मीठ मिरचीतच त्रस्त; त्रिकूटानेच केल्या योजना फस्त

0
बीड — दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या बांधकाम मजुरांच्या पाल्यांच कल्याण व्हावं. त्यांनी मुख्य प्रवाहात यावं, कुठेतरी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे.मात्र मीठ मिरचीची सोय करण्यातच व्यस्त असलेल्या मजुरांच्या कुंडलीत बसलेल्या त्रिकूटांनी शासनाच्या योजना फस्त करण्याचा व मजुरांचं जीवनमान उध्वस्त करण्याचा विडा उचलल्याचं चित्र कामगार कार्यालयात निर्माण झालं आहे.
बीडचं कामगार कल्याण कार्यालयात राहू,केतू ,शनि बनून
आपण कसाही नंगानाच केला तरी “सुधा” कोनाले”च काही फरक पडत नाही. कोणालाच काही कळत नाही.मग मन मानेल ते “कर”त रहा हा विचार करत “नीती” न ठेवता पाण्यावर घि(तूप) काढताना खऱ्या बांधकाम मजुरांना फायदाच होणार नाही. या योजना “गे” (षंढ)ठराव्यात व चव”हाणत त्या आपल्यालाच वरपता याव्यात याची काळजी घेतली जात आहे. अगदी बिनदिक्कत हा सगळा खेळ सुरू आहे. विशेष म्हणजे कार्यालयात काम करणार त्रिकूट कमी की काय म्हणून आणखी एजंटा सारख्या ग्रहासोबत देखील त्यांनी युती केली आहे. यांच्या मर्जी शिवाय कागद पुढे हलत नाही. मीठ मिरची मध्ये व्यस्त असलेल्या कामगारांना त्रुटींच्या जाळ्यात अडकून पुन्हा नव्या फेऱ्यात टाकलं जातं. तीन पाप ग्रहाला पूरक असलेला एजंटासारखा चौथ्या ग्रहाची भरभक्कम दक्षिणा देऊन शांती केली तरच कुठेतरी या पापग्रहांची कृपादृष्टी मजूरांवर होते. नाहीतर सरकारच्या कल्याणकारी योजनांचा फायदा बांधकाम कामगारा ऐवजी चांगल्या चांगल्या घरातल्या स्वतःला प्रतिष्ठित म्हणवून घेणाऱ्या लोकांचाच यात समावेश आहे. त्यांचा समावेश सहज सुलभ व्हावा यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे बनावट सही शिक्यांची देखील सोय ऑफिसमध्ये कंत्राटावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे. शिष्यवृत्ती, लग्नाचे अनुदान, वारस मदत याबरोबरच भांड्याकुंड्याचा दिला जाणारा सेट यामध्ये मोठी रक्कम या तीन पापी ग्रहांच्या चरणी अर्पण करावी लागते. त्यानंतर यांची कृपा कुठेतरी मिळते. अन्यथा खऱ्या लाभार्थींना याचा फायदा होणं दुरापास्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. बांधकाम मजुरांच्या योजना त्रिकुटांच्या फेऱ्यात अडकल्याने बांधकाम मजुरांच्या हालाखीत कुठलाच फरक पडला नाही. मात्र लाखो रुपयांच घबाड मिळवून हे त्रिकूट गब्बर होत असतानाच चित्र निर्माण झाल आहे.