Home Blog Page 47

बीडच्या डॉक्टर तरुणीची पोलिसांच्या लैंगिक छळाला कंटाळून फलटण मध्ये आत्महत्या

0

फलटण — बीडच्या कोठरबन येथील डॉ.संपदा मुंडे या वैद्यकीय अधिकारी म्हणून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असताना पोलीस निरीक्षक गोपाल बदने व पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांनी चार वेळा बलात्कार करून मानसिक छळ केला. तसेच पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी खासदाराच्या पीए कडून दबाव येत असल्याची सुसाईड नोट आपल्या हातावर लिहून आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
मानसिक तसेच लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या डॉ संपदा मुंडे यांचे वडील श्रीकृष्ण श्रीपती मुंडे (रा. कोठारबन, सध्या रा. कवडगाव, ता. वडवणी, जि. बीड) येथील रहिवासी असून शेती करतात. शेती करून मुलीचे शिक्षण पूर्ण केले होते. डॉ. संपदा मुंडे यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ढेकणमोहा येथे झाले. तर वैद्यकीय शिक्षण हे एमबीबीएस शिक्षण जळगाव येथे पूर्ण केले.सातारा फलटण येथे 2022 पासून उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. पहिलीच पोस्टिंग फलटण येथे झाली होती.
गुरुवारी रात्री संपदा मुंडे या डॉक्टरने फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी मृतदेह खाली उतरला. सुरवातीला हा आत्महत्या कोणत्या कारणावरुन केली याचा तपास सुरू असताना आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट पहायला मिळाली. त्यामध्ये असे नमूद केले आहे की “पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चारवेळा बलात्कार केला. तर पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर मला सतत मानसिक त्रास दिला” या धक्कादायक सुरसाईट नोटनंतर पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली
या प्रकरणात आता मृत डॉक्टरच्या आतेभावाने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “मागील वर्षभरापासून संपदावर राजकीय तसेच पोलिसांकडून दबाव टाकण्यात येत होता. तिला चुकीचे आणि खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यास भाग पाडले जात होते. ती घरी सगळं सांगत नव्हती, पण आपल्या बहिणीला सगळी माहिती देत होती.” त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की, “या त्रासाला कंटाळून तिनं हे टोकाचं पाऊल उचललं. जून महिन्यात तिनं या प्रकरणाची तक्रार डीवायएसपींकडे केली होती, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.”

आतेभावाने आणखी गंभीर आरोप करत सांगितलं की, “त्या तक्रारीत संपदाने एका खासदाराचे, त्यांच्या दोन पीएंचे आणि काही पोलिसांचे नाव स्पष्टपणे नमूद केले होते. या सर्वांचा राजकीय दबाव तिला सतत जाणवत होता.” त्यामुळे आत्महत्येच्या या प्रकरणामागे राजकीय आणि पोलीस साखळीतील दबाव हे महत्त्वाचे कारण असल्याचं कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

या प्रकरणात डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. “माझ्या बहिणीला न्याय मिळावा, या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी आणि खोट्या रिपोर्टसाठी दबाव टाकणाऱ्यांना उघड करावं,” अशी मागणी डॉ. मुंडे यांच्या आतेभावाने केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, आत्महत्येपूर्वी सापडलेली माहिती, तिच्या मोबाईलमधील चॅट्स आणि तक्रारींचा तपास तपशीलवार केला जात आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि पोलीस विभागातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

🎇🪔🎆सोयाबीन हमीभाव केंद्रं तातडीने सुरू करण्यात यावी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची लिंबागणेशकरांची मागणी 🎆🪔🎇

0

लिंबागणेश — अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील ७ लाख २१ हजार हेक्टरवरील पिकांचे पुर्ण नुकसान होऊन ८ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. शिवारातील सोयाबीन, कपाशी, तूर यांसह अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. नदीनाल्यांच्या पुरामुळे शेतीबरोबरच जनावरे व शेतीतील साहित्य वाहून गेले असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे.

सरकारने पंचनामे करून “दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल आणि दिवाळी गोड करण्यात येईल” असे आश्वासन दिले होते. मात्र ही घोषणा फक्त कागदावरच राहिली. राज्यात दिवाळीचा प्रकाश साजरा होत असताना शेतकऱ्यांच्या घरात मात्र अजूनही निराशेचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर आज बलिप्रतिपदेच्या दिवशी लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हक्कासाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रजाहितदक्ष, शेतकऱ्यांचा लोककल्याणकारी दानशूर राजा महासम्राट बळीराजा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

डॉ. ढवळे म्हणाले, “ज्याप्रमाणे वामनाने कपटाने बळीराजाला पाताळात घातले, त्याचप्रमाणे आजचे सरकार आपल्या धोरणांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक पाताळात ढकलत आहे.”

निदर्शनावेळी “ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो” अशा घोषणा देऊन शासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मुख्य मागण्या:

खरडून गेलेल्या जमिनी व विहिरींचे वास्तविक पंचनामे करण्यात यावेत.

विहीर दुरुस्ती अनुदानातील ३० हजार रुपये अपुरे असून त्यात वाढ करण्यात यावी.

८५ रुपये गुंठा मदत ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे; म्हणून भरीव आर्थिक मदत द्यावी.

बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांना जिरायती प्रमाणे मदत देणे अन्यायकारक आहे; यावर पुनर्विचार करावा.

सोयाबीन हमीभाव केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावीत, कारण व्यापारी सध्या ३५००–३८०० रुपयांत सोयाबीनची खरेदी करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलत आहेत.या मागण्यांसह निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना देण्यात आले.

या निदर्शनावेळी सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ गिरे, कल्याण वाणी, अँड . गणेश वाणी,सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, बाळासाहेब मुळे, पांडुरंग वाणी, शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, कॉम्रेड सुनील भोसले , विक्रम दाभाडे,सुरेश निर्मळ,बाळकृष्ण थोरात, संतोष भोसले , अशोकराजे वाणी, रामदास मुळे, सुरेश मोरे, दिलीप ढास, हरिभाऊ कदम, अमोल निर्मळ, बबन आबदार, बाबुराव सोनावणे, राजेंद्र ढास , सतिश वायभट, प्रमोद निर्मळ आदी
शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🪔🎇निवडणुका तोंडावर येताच “लाडकी बहीण योजनेसाठीची ईकेवायसी प्रक्रिया थांबवली 🪔🎆

0

मुंबई — विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राज्यातील सत्ता पुन्हा महायुतीकडे आली होती. मात्र आता या योजनेत अपात्र लाभार्थींची संख्या मोठी असल्याचे निदर्शनास आल्याने सरकारने पडताळणी मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर महिला अपात्र ठरण्याची शक्यता असून, त्यातून नाराजी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्या सरकारने या योजनेतील e-KYC पडताळणी प्रक्रिया तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान ऑक्टोबर चा हप्ता लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या दिवशी मिळणार आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपयांचा हप्ता जमा केला जातो. योजनेच्या सुरुवातीला तब्बल 2 कोटी 56 लाख महिलांनी अर्ज केले होते आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व अर्जांना मान्यता देण्यात आली होती.मात्र सहा महिन्यांनंतर सरकारने योजनेच्या पात्रतेसंबंधी निकषांवर बोट ठेवत लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली. त्यासाठी e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सुमारे 70 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतक्या मोठ्या संख्येने महिलांना अपात्र ठरवले गेले तर त्यातून निर्माण होणारी नाराजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला महागात पडू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे सरकारने तातडीने e-KYC प्रक्रिया थांबवली असून, ऑक्टोबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात वितरित केला जाणार आहे.

दरम्यान, योजनेच्या पहिल्या टप्प्यातच चारचाकी वाहने असलेल्या महिला, केंद्र व राज्य सरकारच्या इतर योजनांच्या लाभार्थी महिला, सरकारी नोकरदार महिला, तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

यात काही सरकारी कर्मचारी महिलांसह पुरुष नोकरदारदेखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. तसेच चुकीचे वय नमूद करून किंवा वयोमर्यादेबाहेर जाऊनही लाभ घेतल्याचे प्रकार उघड झाले आहेत. अशा सर्व लाभार्थ्यांविरुद्ध आता कारवाई करण्यात येणार आहे.

पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 45 लाख महिलांना आतापर्यंत लाभ मिळालेला नाही. आता e-KYC च्या माध्यमातून ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा लाभार्थींची छाननी केली जाणार आहे. या निकषांनुसार सुमारे 70 लाख महिला अपात्र ठरू शकतात, असा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महिलांच्या नाराजीचा फटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू नये, या भीतीनेच सरकारने सध्या e-KYC प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

🎆 जि.प.व पं.स. निवडणुक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बैठकीचे आयोजन🎇

0

बीड आणि शिरूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आ.संदीप क्षीरसागरांनी केले आवाहन

बीड — आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे बीड आणि शिरूर तालुक्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.


जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीनंतर आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दि.२४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन,बार्शी रोड,बीड येथे होणार असून या बैठकीस आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भातील संघटनात्मक तयारी, उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार आराखडा आणि पक्ष बळकटीकरण यावर सविस्तर चर्चा होणार आहे. बीड आणि शिरूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) तर्फे आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

🎆 सरकारचं धोरणच “बळीराजा” पाताळात घाल; अतिवृष्टी अनुदान वाटपात मोठा झोल झाल 🎇

0

बीड — बलिप्रतिपदेच्या पूर्वसंध्येला सरकारने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत थेट खात्यावर जमा केली. मात्र या मदतीत मोठा झोल झाल सरकारने केला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सरकारही वामनासारखंच बळीराजाला पाताळात घालत असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.


अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालं.हात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. लोकांचं झालेलं देणं पाणी कसं फेडायचं या विवंचनेत शेतकरी पुरता अडकला गेला‌. अनेकांनी आत्महत्याचा मार्ग स्वीकारला. महापुराने जमिनी खरवडून गेल्या क्षणात होत्याचं नव्हतं झालं. दिवाळी तोंडावर असताना बळीराजाचं पुरतं “दिवाळ” निघालं. अशावेळी अल्पशी मदत करण्याची घोषणा सरकारने करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली.यामुळे राज्यात शेतकरी तसेच विरोधकांकडून टीकेची राळ उठली.मात्र सरकारने नेहमीप्रमाणेच आपला हेका कायम ठेवला 85 रुपये गुंठा मदत दिवाळीपूर्वी देण्याचं मोठ्या थाटात आश्वासन दिलं.हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टर पर्यंत ही मदत दिली जाणार असे शासन आदेश काढले गेले. बलिप्रतिपदेच्या पूर्वसंध्येला सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी अनुदानाची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. काही काळ आनंदाचे वातावरण शेतकरी वर्गात पसरलं गेलं कमीत कमी फुल नाहीतर फुलाची पाकळी मिळाली याचा आनंद झाला. मात्र तो आनंद क्षणिकच ठरला. शेतकऱ्यांच्या खात्यावर जसजशी रक्कम जमा होत होती. तसं तसं सरकारचा लबाडपणा उघडकीस येऊ लागला. हेक्टर भर जमीन असलेल्या शेतकऱ्याला तीन हजार रुपये दिले. दोन हेक्टरहून अधिक जमीन असलेल्या लोकांना कुणाला तेरा हजार रुपये, कुणाला दोन हेक्टर चे 3200 आले. सरकारने हे पैसे कोणत्या हिशोबाने दिले यावर समाज माध्यमातून प्रतिक्रिया उमटू लागल्या.
शेतकऱ्यांसाठी काम करत नेहमीच व्यापक लढा उभा करणारे बीडच्या पिंपळनेर सर्कलमधील धनंजय गुंदेकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून अनुदान वाटप सुरू झाले असा मेसेज शेतकऱ्यांना दिला.त्यावेळी शेतकरी वर्गातून उमटलेल्या प्रतिक्रिया मधून सरकारने केलेल्या लबाडीचा पर्दाफाश झाला गेला. नारायण देवकते या शेतकऱ्याने दोन हेक्टर जमिनीला 3200 अनुदान आल्याचं सांगितलं. माजलगाव मधील नित्रुड मंडळात हेक्‍टरी सोळाशे रुपये मदत मिळाल्याचं गणेश शिंदे या शेतकऱ्याने सांगितलं. रायमोहा मंडळात हीच मदत अनिस शेख या शेतकऱ्याच्या खात्यात 73 रुपये 33 पैशांने जमा झाली. मोतीराम राजे नाईकवाडे या शेतकऱ्याच्या खात्यात 64.6 पैसे प्रति गुंठा याप्रमाणे मदत जमा झाली. नोमन चाऊस या शेतकऱ्याने आठ हजार पाचशे ऐवजी 4505 रुपये खात्यात आल्याची माहिती प्रतिक्रियेत दिली. विकास चोले या शेतकऱ्याने दहा हजार रुपये अतिरिक्त देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवा भाऊंनी केली होती. तेही या अतिवृष्टी अनुदानातच समाविष्ट आहे का? असा खोचक प्रश्न विचारला आहे. नारायण शेरकर या शेतकऱ्याला 55 रुपये गुंठ्याने पैसे खात्यात जमा झाले. अविनाश पाटील या शेतकऱ्याने मला 17000 रुपये यायला पाहिजे होते. पण प्रत्यक्षात नऊ हजार आठशे रुपये आल्याचं सांगितलं. गणेश राज या शेतकऱ्याला मात्र 18 गुंठ्याला आठ हजार पाचशे रुपये अनुदान पडलं गेलं.
एकंदरच समाज माध्यमातून शेतकरी वर्गाकडून सरकारने शेतकऱ्यांची केलीली क्रूर चेष्टा जगजाहीर होऊ लागली आहे. पुन्हा एकदा आश्वासनांच्या खोट्या चक्रव्यूहात अडकवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसल्याचं स्पष्ट होऊ लागला आहे.अतिवृष्टी अनुदान वाटपात झालेल्या घोळामुळे व बलिप्रतिपदेच्या पूर्वसंध्येलाच फसवणूक उघड झाल्यामुळे सरकारने पुन्हा एकदा “वामनाने” बळीराजा पाताळात घातला होता. याची जाणीव करून दिल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

याला जीआर तरी कळतो का? धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर टीका

0

बीड –ओबीसी आरक्षणासाठी धक्का लागू नये यासाठी ओबीसी नेत्यांकडून राज्यभर महाएल्गार सभेचं आयोजन करण्याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर आज (शुक्रवार) बीडमध्ये ओबीसी समाजाच्या वतीने महाएल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले . या मोर्चाला राज्यातील ओबीसी समाजाचे नेते उपस्थित होते,या मोर्चाला मंत्री छगन भुजबळ, आमदार धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यातील अनेक ओबीसी नेते उपस्थित आहेत. या सभेला आमदार धनंजय मुंडे यांनी संबोधीत केले. यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
ओबीसी महाएल्गार सभेत धनंजय मुंडे म्हणाले, मी ‘दोन अडीच महिने गप्पच होतो. मला तर बोलू द्या. आज या मी इथे उभा आहे. मी कुणाला विरोध करण्यासाठी नाही. मी इथे ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी उभा आहे. आमचे मार्गदर्शक, नेते भुजबळ साहेब आहेत. तुम्ही मघाशी खंत व्यक्त केली की आज मुंडे साहेब असते तर ही वेळ आली नसती. मुंडे साहेबांची बरोबरी कोणी करू शकत नाही. ओबीसी हक्कांसाठी तुम्ही हयात घातली. आज कार्यकर्ते म्हणून आम्ही इथे आहोत. अस म्हणत धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळ यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जातीचे सर्व लोक एकत्र नांदत होते. दोन वर्षापासून एका व्यक्तीने एका प्रवृत्तीने मी समाज म्हणत नाही, ओबीसी एससी एसटी आणि मराठा समाजात अंतर पाडायचं काम केले. हे अंतर कुठून पडलं. आज माझा मराठा समाजाला नम्र हात जोडून विनंती आहे, हे अंतर फक्त दोन समाजात अंतर पडलेले नाही. तर तुमच्याशीही तो दगाफटका करत आहे. अशी टीका त्यांनी जरांगे पाटलांचे नाव न घेता केली.

जरांगे पाटलांवर टीका करताना धनंजय मुंडे म्हणाले, याला जीआर तरी कळतो का? किती डोकेबाज माणूस समजायचं, किती डोकेबाज माणूस समजायचं. दसरा संपल्यावर म्हणतो धनगरांचं 94 चं आरक्षण काढा. याला जीआर तरी कळतो का. वंजाऱ्याचंही आरक्षण काढतो. काय काढा. द्यायचं सांगा. काहीही बोलून जमणार नाही. काही दिवस माणसं येडे करताल. पण खऱ्याला खरं आज ना उद्या कळणार आहे. आपल्याला गावगाडा सांभाळायचा आहे. आपल्याला कुणाचा द्वेष करायचा नाही. आपला संताप एक व्यक्ती आणि एका प्रवृत्तीला आहे. बाकी कुणाला नाही.

मालकाच्या अंत्यसंस्कारानंतर निष्ठावान कुत्रा नऊ दिवसापासून स्मशानभूमीतच राहिला

0

सोलापूर — जीव लावतोय माणसावरी माणसापेक्षा मेंढर बरी हे दादा कोंडके च्या चित्रपटातील गाजलेल्या गाण्याची आठवण करून देणारी घटना घडली आहे. कुत्र्याला जीव लावला, तर जिवाच्या पलीकडेही तो कुत्रा प्रामाणिकपणे काम करतो.याचा प्रत्यय नुकताच सोलापूरमध्ये अनुभवायला मिळाला. वडवळ येथे एका शेतकऱ्याचा नऊ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मृत्यूनंतर ज्या स्मशानभूमीत त्या शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या ठिकाणी शेतकऱ्याचा कुत्रा मागील नऊ दिवसांपासून एकटाच हताशपणे बसून आहे. त्याला स्मशानभूमीतून बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता तो तेथून जात नाही असे पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील वडवळ येथील शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांची जेमतेम दोन एकर शेती आहे. पत्नी आणि मुलांच्या सोबत राहणाऱ्या तानाजी पवार यांचा अल्पशा आजाराने 7 ऑक्टोबर 2025 रोजी मृत्यू झाला. मृत्यूनंतर नातेवाईकांनी त्यांच्या पार्थिवावर वडवळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.तानाजी पवार यांचा लाडका कुत्रा स्मशानभूमीतून बाहेर जात नाहीये. मालकावर अंत्यसंस्कार केल्यापासून आता नऊ दिवस झाले, तरी पवार यांचा कुत्रा स्मशानभूमीतच बसून आहे. काहीजणांनी त्याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण तो कुत्रा स्मशानभूमीतच बसून आहे. हे चित्र पाहताना वडवळ येथील नागरिकांच्या तोंडून मुक्या प्राण्याविषयी तसेच मालकाबद्दल असलेल्या कुत्र्याच्या प्रेमाच कौतुक केलं जात आहे.

वाहऽ रेऽऽपठ्ठे!शेतकरी एकवटला,रेन्यू पाॅवर कंपनीला नडला; अधिकाऱ्यांचा ताफा 28 तास अडकून ठेवला

0

वाशीसंघटित नसलेल्या शेतकऱ्यांचा गैरफायदा घेत आपला मुजोरपणा बीडसह धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांनी दाखवला. यामध्ये पोलिसांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेत. शेतकऱ्यावर अत्याचार केले. इंग्रज, मोगलाई असल्यासारखं वातावरण  जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार, पोलीस अधीक्षक, यांनी निर्माण केलं. लोकशाहीची ऐसी तैसी करताना शेतकऱ्यांचा विचार केला नाही. त्यांच्या घरावर वरवंटा फिरवताना कुठलंच वैषम्य वाटलं नाही.पण शेतकरी संघटित झाला तर काय होतं याच उदाहरण वाशीच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं.

रेन्यू पाॅवर कंपनीच्या पवनचक्कीच्या तुटलेल्या टॉवरचे काम करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काम करण्यास विरोध करीत बुधवारी 15 ऑक्टोबर दुपारी तीन वाजल्यापासून ते गुरुवारी सायंकाळी सातपर्यंत म्हणजेच तब्बल 28 तास वाहनासह एकाच जागेवर शेतकऱ्यांनी थांबविल्याचा प्रकार सारोळा (मां ) येथे घडला.
तारांचे प्रति मिटर 22 हजार रुपयेप्रमाणे, तर पवनचक्कीच्या प्रती टॉवर 17 लाख रुपये देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.याबाबत मिळालेली माहिती अशी, की सारोळा ( मा.) तसेच परिसरातील काही गावांत रेन्यू पॉवर कंपनीने पवनचक्कीच्या टॉवरची तसेच इतर आवश्यक कामे केलेली आहे.

मात्र मिळालेला मोबदला अत्यल्प असून, तारांसाठी प्रतिमीटर 22 हजार रुपये तर प्रति टॉवर 17 लाख रुपये संबंधित कंपनीने देण्यासाठी मागील काही दिवसांपासून शेतकरी व कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे.

बुधवारी सारोळा ( मां.)येथील एका टॉवरच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी संबंधित कंपनीचे अधिकारी गेले होते. दुरुस्तीच्या कामासाठी अधिकारी आल्याची माहिती मिळाल्यानंतर सुमारे 150 ते 200 शेतकऱ्यांनी एकत्र येत कामासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काम करण्यास विरोध केला.

सोबतच आमचा मोबदला मिळाल्याशिवाय येथून जायचेही नाही असा आक्रमक पवित्रा घेऊन मागील जवळपास 28 तासांपासून चार अधिकाऱ्यांना थांबवून ठेवले. तसेच एक बुलेरो, एक स्कार्पिओ व दोन जेसीबी मशिनसह एकाच जागेवर थांबवले

 जेवण, नाश्त्याची शेतकऱ्यांनी केली व्यवस्था:

गुरुवारी सायंकाळी सातपर्यंतही शेतकरी व कंपनीमध्ये झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने शेतकरी व अधिकारी घटनास्थळावरच होते. दरम्यान, बुधवारी रात्री शेतकऱ्यांनी खिचडी बनवत अधिकाऱ्यांसाठी जेवाणाची, तसेच गुरुवारी सकाळी नाश्त्याची सोय केली होती.

दसरा मेळाव्यातील सोनसाखळी चोराला पोलिसांनी पकडले

0

बीड — सावरगाव घाट मध्ये पार पडलेल्या दसरा मेळाव्यात एकाच्या गळ्यातील सोन्याची साखळी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती.याप्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून आरोपीला जेरबंद केले आहे.

पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी येथील लहू काशिनाथ नागरगोजे हे दसरा मेळावा निमित्त सावरगाव या ठिकाणी आले होते. परंतु या ठिकाणी आल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास केली. यानंतर नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या संदर्भात तपास सुरू केला. खबऱ्या मार्फत सोन्याची चैन विकण्यासाठी चोर बीड मध्ये थांबला आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने चोरटा आकाश सोपान ससाणे रा.राजूरी ता.जि.बीड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडुन दोन तोळ्याची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड, सहा. पोलीस निरीक्षक धनराज जारवाल, आशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, आनंद मस्के, बळी सानप, यादव, सिध्देश्वर मांजरे यांनी केले. संबंधित आरोपीला अंमळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले.

जालना: मनपा आयुक्त संतोष खांडेकर लाचखोर निघाला

0

जालना — महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर याला तब्बल दहा लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले ही कारवाई गुरुवारी 16 ऑक्टोबरला मोतीबाग परिसरात असलेल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी सायंकाळी उशिरा करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराकडून प्रशासकीय काम सोडवून देण्यासाठी आयुक्तांनी दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.कारवाई दरम्यान आयुक्तांनी कथित लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. या प्रकरणानंतर जालना महानगरपालिकेत आणि शहरात चर्चेला उधाण आले.आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी ही कारवाई स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर कर्मचारी वर्गात मात्र खळबळ माजली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दोन वर्षांपूर्वी जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर करण्यात आले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आल्यामुळे जालना महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त म्हणून तत्कालीन मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांचीच नियुक्ती करण्यात आलेली होती. जालना महानगरपालिकेचे पहिले आयुक्त होण्याची संधीही खांडेकर यांना मिळाली होती. मात्र, गुरुवारी ते लाच घेताना पकडल्या गेल्यामुळे पहिलेच आयुक्त लाचखोरीत अडकले. यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.