Home Blog Page 116

गायरान जमिनीत गांजाची लागवड; 58 लाखाचा गांजा जप्त

0

बीड — केज तालुक्यातील बनसारोळा येथे सरकारी गायरान जमिनीवर पोलिसांनी छापा मारून 57 लाख 90 हजार रुपये किमतीची गांजाची 500 किलो झाडे जप्त करण्यात आली.सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह युसुफवडगाव पोलिसांनी शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.

. बनसारोळा येथील शासकीय गायरान जमिनीत हा गैरप्रकार सुरु होता. या जमिनीत पारधी समाजाची लोकवस्ती आहे. या वस्तीलगत गांजाची लागवड करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना व युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी सहकाऱ्यांसह शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी गायरान जमिनीत गांजाची झाडे लागवड केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन तासाहून अधिक वेळ परिश्रम घेऊन गांजाची झाडे उपटून काढली.

नायब तहसीलदार आशा वाघ व तलाठी श्रीमती वाघमारे यांच्या उपस्थितीत सदरील गांजाच्या झाडांचे जागेवरच वजन करण्यात आले. तेव्हा पोलिसांनी अंदाजे 57 लाख 90 हजार रुपयांचा 550 किलो गांजा ताब्यात घेतला. ही गांजाची झाडे
नेमकी कोणी लागवड केली? याचा पोलीसांकडून तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक थोरात, दिनकर तोंडे, योगेश समुद्रे, गणेश राऊत, महादेव केदार, जीवन जाधव, सुधीर बामदळे, भगवान खेडकर, प्रेमीला गाडेकर यांच्या पथकाने कारवाई केली आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रघुनाथराव पेशव्यांची आठवण करून देणारे प्रकाश दादा जनतेचं भलं कसं करणार?

0

बीड — पेशवाईची वस्त्र अंगावर यावीत यासाठी रघुनाथराव पेशव्यांनी नारायणराव पेशव्यांचा घात केला होता. याच इतिहासाची पुनरावृत्ती माजलगाव मध्ये प्रकाश दादा सोळंके यांनी केली. आरक्षण आंदोलनात सोळंकेंची भूमिका वादग्रस्त ठरली.जे जातीचे झाले नाहीत पुतण्याचे झाले नाहीत ते गोरगरीब जनतेचे भलं कसं करणार? असा मतप्रवाह जनतेत बनल्याने प्रकाश दादांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

प्रचाराचा नारळ फोडून पुरुषोत्तमाच्या साक्षीने डोळ्यात अश्रू आणणाऱ्या प्रकाश सोळंके यांचे मगरीचे अश्रू म्हणून गणना होऊ लागली आहे.
प्रत्येक वादा मतदार संघाला भकास करणारा आहे.राजकारणी हा कलाकार असतो;रडून केलेलं कर्म धुण्याचा प्रयत्न करत जनतेला मूर्ख बनवायच असतं याच हातखंड्याचा वापर सोळंकेंनी केला.प्रत्येक वेळी मतदारांनी संधी दिली.यामुळे राजकीय अनुभवाने त्यांच्यात कोडगेपणा इतका आला की अक्षरशःभावनाच संपल्या गेल्या. विकासाची वाट लावत त्यांनी स्वतःची सरंजामशाही निर्माण केली. मात्र लोकशाहीत असं होत असतं असं म्हणून जनतेने प्रत्येक वेळी दिलेली संधी जनतेच्या विकासाला घातक ठरली. त्यांच्या याच कोडगेपणातून मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात सगळ्यात वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्व म्हणून आपली ओळख प्रकाश सोळंके यांनी निर्माण केली. समाजात त्यांच्या वागणुकीमुळे प्रचंड चिडही निर्माण झाली. पण हा माझा शेवटचा कार्यकाळ आहे.असं म्हणून जनतेच्या मनात पेटलेली विरोधाची भावना त्यांनी शांत केली. हे करताना प्रकाश दादांनी आपला नवा राजकीय डाव खेळत समाजात असलेली आग शांत करण्यासाठी पुतण्याचा वापर केला. आपला राजकीय उत्तराधिकारी जाहीरही करून टाकला. मात्र ऐनवेळी राजकीय सारीपाटावर चाली खेळत पुतण्याच्या पाठीत खंजीर खुपसत “पेशवाईची आठवण करून दिली. पेशवाईत देखील पेशवाईची राज वस्त्र आपल्याला मिळावीत यासाठी रघुनाथराव पेशव्यांनी नारायणराव पेशव्यांचा असाच घात केला होता. आजही इतिहासाची पानं चाळली तर “काका मला वाचवा” ही हाक ऐकायला मिळते. “नुसता काका मला वाचवा”ही हाक कानी पडताच महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यासमोर पेशवाई चा इतिहास उभा राहतो. धोका, दगाबाजी साठी हे उदाहरण आवर्जून आजही दिलं जातं. प्रकाश सोळंके च्या बाबतीत देखील “ध”चा “मा” झाल्याचं पाहायला मिळालं.
जे प्रकाश दादा सोळंके प्रत्येक वेळी जनतेच्या भावनेशी खेळून त्यांची वाट लावण्यात वाकबगार झाले. ते कधी स्वार्थापुढे जनतेचे ही झाले नाहीत. स्वतःच्या जातीचे देखील झाले नाहीत. स्वतःच्या भावाने “धैर्यशील सोळंके काकांनी” त्याग करून प्रकाशदादांची पाठराखण केली.त्यांच्या मुलाच्या भवितव्य घडवण्याची वेळ आली त्यावेळी धाकट्या भावासोबतच पुतण्याच्या सोबत देखील दगाबाजी केली. एवढं करूनही धैर्यशील काकांनी धैर्याचा परिचय देत गप्प बसण्याचा मार्ग स्वीकारला. त्याचा परिणाम देखील प्रकाश सोळंकेवर यत्किंचितही झाला नाही. ते प्रकाशदादा माजलगावकरांच्या अंधारलेल्या वाटा म्हातारपणी म्हणे प्रकाशमान करणार आहेत. उमेदीच्या काळात मतदार संघाकडे त्यातील जनतेच्या भल्याकडे ढुंकूनही बघितले नाही. ते दादा आता शेवटच्या काळात जनतेचा भलं करणार आहेत. हे सांगूनही विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न जनतेपुढे निर्माण झाला आहे. जातीचे न होणारे दादा, पुतण्याचे झाले नाहीत ते जनतेचे गोरगरिबांचे कसे होणार?
जाता जाता एकदा माजलगावची उरली सुरली सुद्धा वाऽऽट ते लावणार? असा मतप्रवाह सुरू झाल्याने प्रकाश दादांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

पाडळशिंगी जवळील अपघातात पिता पुत्राचा मृत्यू

0

बीड — नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईहून बीडकडे येणाऱ्या चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले तर चौघे जण जखमी झाले.हा अपघात इतका भीषण होता की, एका मयताच्या मृतदेहाच्या चिंधड्या झाल्या होत्या. ही दुर्दैवी घटना आज सकाळी सहा वाजता पाडळसिंगीच्या टोल नाक्याजवळ घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सय्यद हमीद वय 70 वर्षे रा. मुंबई यांच्या नातेवाईकाचे 10 नोव्हेंबर रोजी बीड येथे लग्न होते. या लग्नानिमित्त ते आपल्या कुटुंबियासमवेत चारचाकी गाडीने बीडकडे येत होते. सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान पाडळसिंगी टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात सय्यद हमीद वय 70 वर्ष व त्यांचा मुलगा सय्यद मुदस्सीर वय 35 वर्षे, रा. अंधेरी, मुंबई हे दोघे जागीच ठार झाले तर गाडीतील अन्य चार जण जखमी झाले. त्यामध्ये दोन लहान मुलांचा आणि दोन महिलांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की, गाडी चक्काचूर झाली होती. त्यातील एका मयताचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल बीड शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शरद पवारांची बीडमध्ये शनिवारी सभा; मुक्कामाने संदीप क्षीरसागरांचा विजयावर शिक्कामोर्तब

0

सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा-आ.संदीप क्षीरसागर

बीड — बीड विधानसभा मतदार यांनी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांच्या विजय निश्चिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष, महाविकास व इंडिया आघाडीचे प्रमुख नेते खा.शरदचंद्र पवार यांची बीड शहरात शनिवारी (दि.९) रोजी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे. याबरोबरच खा. शरद पवार बीडमध्ये मुक्काम करून आपले डावपेच खेळणार असल्याने संदीप क्षीरसागर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे. या मुक्कामात बीड जिल्ह्यात अनेक राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बीड जिल्ह्यात सगळे आमदार आणि पुढारी सत्तेत सहभागी झाले. परंतु जिल्ह्यात एकमेव निष्ठावंत आमदार संदीप क्षीरसागरांनी पवार साहेब व आपल्या पक्षाची साथ सोडली नाही. याच एकनिष्ठतेचे आणि आपली भूमिका व विचार न सोडण्याचे फळ म्हणून आ.संदीप क्षीरसागर यांना दुसर्‍यांदा संधी मिळाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांची महाविकास आघाडी यांचे अधिकृत उमेदवार असलेले संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी खा.शरदचंद्र पवार यांची  बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे शनिवार दि. 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीची पाहणी संदीप क्षीरसागर यांनी आज करत प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या मुक्कामामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरण प्रचंड बदलणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे खा. शरद पवारामुळे बीड चा बालेकिल्ला मजबूत होणार असून मोठमोठे राजकीय भूकंपांना देखील विरोधकांना सामोरे जावं लागणार आहे.या जाहीर सभेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी डॉ. योगेश क्षीरसागरांच्या पाठीशी राहा –इद्रिस नाईकवाडी

0

बीड — उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अल्पसंख्याक समाजासाठी मदतीला धाऊन येणारे नेते आहेत. त्यांनी समाजाच्या योजना अंमलात आणल्या. राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत गेल्यामुळे अल्पसंख्याक समाजाची विरोधकांकडून दिशाभूल केली जात आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी धडपड करणारे युवा नेतृत्व डॉ.योगेश क्षीरसागर यांना एकदा संधी देऊन विधानसभेत पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष तथा आमदार इद्रिसजी नाईकवडी यांनी केले आहे.

बीडचे महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शहरात बुधवारी आयोजित केलेल्या अल्पसंख्याक मेळाव्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर बीडचे महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर, राष्ट्रीय सरचिटणीस साजिद बेग काझी, राष्ट्रीय उपाध्यक्ष शेख शफीक, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इकबाल शेख, जिल्हा कार्याध्यक्ष रमिज खान, ज्येष्ठ माजी नगरसेवक सादेक उज्जमा, नसीर अन्सारी, जुनेद जहागीरदार, बागवान समाजाचे अध्यक्ष हशम बागवान, हाजी असीम बागवान, जकिरिया साहेब, इलियास मेंबर, युवा नेते इरफान बागवान, बिलाल भाई, सद्दाम भाई, जावेद खान, माजेद कुरेशी, साजेद जहागीरदार, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आ.इद्रिस नायकवडी म्हणाले की, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात अल्पसंख्याक समाजासाठी काम करता येत आहे. ते समाजासाठी शिक्षण, संरक्षण व आरक्षण हे महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असतात. सामान्य लोकांच्या हक्क व अधिकारांसाठी अजितदादा हे महायुतीत सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी महायुतीत सहभागी झाला असला तरी आपली विचारधारा सोडलेली नाही. भविष्यात सोडणारही नाही. मात्र राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत गेल्यामुळे अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल केली जात आहे. समाजाच्या मनात गैरसमज निर्माण केले जात आहे. अजितदादांनी मागच्या अर्थसंकल्पात मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळाचे ३० कोटीवरून ७०० कोटी वर नेले. प्रत्येक मदरसा लसाठी वर्षाला १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम समाज कुठल्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवतो. त्यामुळे लोकसभेत ज्या चुकीच्या अफवा पसरवल्या गेल्या, त्यामुळे चुकीच्या लोकांना मतदान केले. मात्र यावेळी विधानसभेला ही चूक करू नका. लोकसभेला काय घडले कसे घडले याचा विचार न करता विधानसभा निवडणुकीत मात्र अजितदादा, धनुभाऊ आणि डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन आ.इद्रिस नायकवडी यांनी केले.

माजी नगरसेवक जुनेद जहागीरदार यांचा प्रवेश

बीड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक जुनेद जहागीरदार यांच्यासह साजेद जहागीरदार, आमेर जहागीरदार, समीर शेख, इम्रान शेख यांच्यास कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत केले.

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील : डॉ.योगेश क्षीरसागर

डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, अजितदादा यांनी वादा केल्याप्रमाणे विधानसभेत १० टक्के अल्पसंख्याक समाजाचे उमेदवार दिले. विधान परिषदेत २ पैकी १ आमदार इद्रिस नायकवडी यांच्या रूपाने अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व विधानपरिषदेत पाठवले. अल्पसंख्याक समाजासाठी मार्टी रिसर्च सेंटर मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला. क्षीरसागर परिवार हा मागील ५० वर्षांपासून लोकांची सेवा करत आहे. बीडमध्ये तकिया मस्जिदशेजारील जागा ही कब्रस्थानसाठी दिली. बालेपीर येथील इदगाह, पेठ बीड भागातील जुना इदगाह यासाठी कंपाऊंड वॉलसाठी निधी उपलब्ध केला. अल्पसंख्याक समाजासाठी बीडमध्ये ५ तर ग्रामीण भागात २ कोटी रुपये मंजूर करून आणले. नवगण, विनायक संस्थेत अल्पसंख्याक समाजाचे १० टक्के कर्मचारी आहेत. आपण सर्व जातीधर्माला सोबत घेऊन विकासकामे करत राहू, असा विश्वास देत २० तारखेला मोठ्या संख्येने मतदान करून निवडून देण्याचे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.

नावच बल्लाळ म्हणून “अर्थ”कारणाची टपकते लाळ;दस का दम जोरात शहर पोलिसांना नजराना लाखात

0

बीड — कर्तव्यदक्षतेचा आव आणून किती जरी भूशारक्या मारल्या तरी “अर्थ” चक्रीतील फायद्याची टपकणारी लाळ उघडकीस येऊ लागली आहे. लाखोंच्या मिळणाऱ्या नजराण्यामूळे बीड शहर ठाणे प्रमुखाच्या नियतीचे बिंग फुटले आहे.

बीड शहर पूर्वीपासून संवेदनशील मानलं जातं त्यामुळे कायदा व्यवस्थेकडे पोलीस यंत्रणेला काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. सध्या पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अवैध धंदे बंद करण्यात यावेत असे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिलेले आहेत.मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम बीड शहर पोलीस ठाण्याचे स्वतःला कर्तव्यदक्ष समजणारे प्रमुख शितल कुमार बल्लाळ यांनी केले आहे. बीड शहरात बस स्थानकासमोर अवैध धंद्यांची जत्रा भरलेली असतानाच शहरात दहा ते बारा ठिकाणी ऑनलाइन “बिंगो ” चक्री जुगार जोरात सुरू आहे.यातून लाखोंचा नजराना ठाणे प्रमुखांना मिळत आहे. पूर्वी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चांगलं काम केल्यामूळे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून बल्लाळांनी आपली प्रतिमा उंचावली. मात्र सध्या याउलट स्थिती त्यांनी निर्माण केली आहे. कर्तव्यदक्षतेच्या प्रतिमेचा वापर करून अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात त्यांनी आश्रय देऊन स्वतःची तुंबडी भरण्याचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनाला शीतलता मिळत असली तरी गोरगरिबांच्या संसाराची राख रांगोळी होऊ लागली आहे. सध्या निवडणूकीच वातावरण असल्यामुळे गुन्हेगारीला वाव मिळणं बीडच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोक्याच ठरू शकत त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई करून बल्लाळांच्या मुजोरपणाला आळा घालावा अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

मी निवडणूक लढवणार नाही; शरद पवारांचे राजकीय निवृत्तीचे संकेत

0

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार बारामती मतदारसंघात दौरे करत आहेत, या प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत.वयाच्या 84 व्या वर्षीही शरद पवार राजकारणात सक्रिय असताना पाहायला मिळत आहे, तरीही शरद पवारांनी असं का म्हटलं आहे?

यावेळी शरद पवार यांनी निवृत्तीचे संकेत देताना म्हटलं की, इशारा देत आता नव्या लोकांना निवडून द्यावे, असे म्हटले आहे. यावेळी शरद पवार यांनी म्हटलं की, मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या असंही यावेळी शरद पवारांनी म्हटलं आहे.
निवृत्तीचे संकेत देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आम्हाला कुठेतरी थांबावे लागेल, “मला आता कोणतीही निवडणूक लढवायची नाही. आता मला निवडणुका थांबवाव्या लागतील आणि नवीन लोकांना पुढे यावे लागेल.” मला जनतेची सेवा करायची आहे. सरकार आल्यास आम्ही सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.

“मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या”.

या वर्षाच्या सुरुवातीला अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला
होता आणि या वयात त्यांनी घरीच राहावे, ते कधी निवृत्त होतील हे माहीत नाही, असे म्हटले होते. यानंतर शरद पवारांनीही प्रत्युत्तर दिले. “अजित पवार माझ्या वयाबाबत वारंवार विधाने करतात. माझ्या राज्यसभेच्या कार्यकाळात अजून वेळ आहे. तोपर्यंत मी सेवा करेन. त्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही.”

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर होणार “या” दिवशी सुनावणी

0

नवी दिल्ली — शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर सुनावणी कधी होणार याबाबत सर्वांनाचं प्रश्न पडला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केली होती.

आता यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी सुनावणी होणार आहे. कामाच्या शेवटच्या दिवशी तरी सरन्यायाधीश काही महत्त्वाचे निर्देश देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे येत्या 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यादिवशी ते काही महत्वाचे निर्णय घेणार आहेत. यातीलच एक अत्यंत महत्वाचा निर्णय म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर असलेली सुनावणी. या निर्णयाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा, मदरसा कायद्याची वैधता, सरकारी संपत्तीचे पुनर्वितरण, वाहन परवाना कायदा तसेच सरकारी नियुक्ती प्रक्रियेतील नियमांबद्दलच्या विषयांवर निर्णय देणार आहेत.

हे तर नाक कापून अवलक्षण;बस स्थानकासमोरील अवैध धंदे बल्लाळांना आंदण

0

बीडलक्ष्मी दर्शनामुळे “कुमार” असलेला इतका “शितल” झाला की गावोगावच्या लोकांच्या वर्दळीच्या ठिकाणी अवैध धंद्यांची बस स्थानकासमोर भरलेली जत्रा जहागिरीत आंदण मिळाली आहे. अशा अविर्भावात सगळा कारभार राजरोस सुरू आहे. बल्लाळांच्या शीतलतेमुळे गोरगरिबांचे संसार मात्र उध्वस्त होत आहेत. हा कारभार म्हणजे आपलं नाक कापून दुसऱ्याला अवलक्षण दाखवणारा असल्याच पाहायला मिळत आहे.

बीड बस स्थानकासमोरचा परिसर म्हणजे इतर शहरातील प्रवाशांच्या वर्दळीचं ठिकाण त्यामुळे या भागात व्यवसाय देखील चांगली कमाई करून देतात. याच ठिकाणी अवैध धंद्यांनी शितल कुमार बल्लाळ यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर बस्तान बसवले आहे. मटका, जुगार, दारू, अवैध प्रवासी वाहतूक, चक्री, ऑनलाइन लॉटरी,गुटखा यासारख्या धंद्यांनी जोर धरला आहे. बस स्थानक भागात चालणाऱ्या या धंद्यामुळे बीडच्या कायदा सुव्यवस्थेच्या इज्जतीची लक्तर मराठवाड्याच्या वेशीवर टांगली जात आहेत. एकीकडे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अवैध धंद्यावर करडी नजर ठेवत असताना दुसरीकडे मात्र राजरोस अवैध धंदे चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. थोडक्यात सांगायचं तर बीड शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी शितल कुमार बल्लाळ यांनी नाकातलं काढून ओठावर मांडत बीडच्या इज्जतीचे धिंडवडेच काढले आहेत. एकीकडे कायदा सुव्यवस्था बळकट होत असताना दुसरीकडे “बल्लाळ“व्यवस्थेच नाक कापून अपशकुन घडवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी या प्रकाराची दखल घेऊन बीडच्या इभ्रतीच होणार वस्त्रहरण श्रीकृष्णासारखं रोखावं अशी मागणी होऊ लागली आहे.

संगीता ठोंबरे यांची माघार; साठेंना दिला पाठिंबा

0

केज — उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले होते. केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. यानंतर भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आता संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली आहे. आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संगीता ठोंबरे यांनी थेट भाजपाला आव्हान दिले आहे.

केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा दिला आहे. 2014 मध्ये संगीता ठोंबरे केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. परंतु 2019 मध्ये त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आता पुन्हा या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने संगीता ठोंबरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज अखेर त्यांनी उमेदवारी मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. केज विधानसभा मतदार संघात 25 उमेदवार लढतीत उतरलेले आहेत. मात्र भाजपाच्या नमिता मुंदडा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पृथ्वीराज साठे यांच्यात सरळ सामना होणार आहे