Home Blog Page 106

राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; चारित्र्य पडताळणी करून होणार नवी नियुक्ती

0

बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठे राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष होता, तर या प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचा आरोप असलेलाअसलेल्या वाल्मिक कराडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.त्यामुळे पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे याचे नाव आरोपी म्हणून समोर आल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. यामुळेच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

खंडणीला अडथळा ठरल्यानेच संतोष देशमुखांचा खून; वाल्मीक कराडला 7 दिवसाची पोलीस कोठडी!

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या व अवादा कंपनीला मागितलेली खंडणी दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे. खंडणीला अडथळा ठरत असल्याने संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची महत्त्वाची माहिती एसआयटीने आज वाल्मीक कराडला न्यायालयात हजर केल्यानंतर दिली.त्यामुळे, याप्रकरणाच्या आणखी तपासासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची असल्याचं सांगत आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. त्यानुसार, वाल्मिक कराडला न्यायालयाने 7 दिवसांची एस आय टी कोठडी दिली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटीने बीड न्यायालयात दिलेल्या माहितीत अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. आरोपींकडून वारंवार अवादा कंपनीकडे खंडणीची मागणी होत होती,पण कंपनीने ती पूर्ण केली नाही.त्यावेळी, संतोष देशमुख हेच खंडणीसाठी अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचं एसआयटीने न्यायालयात म्हटलं आहे. एसआयटीने आज न्यायालयात 7 दावे केले आहेत. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने केला आहे.

एसआयटीने न्यायालयात सात मुद्दे मांडले
🌑 9 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला. याकाळात सुदर्शन घुले, विष्णू चाटे व वाल्मिक कराड यांचे घटनेच्या अगोदर, नंतर का घटनेदरम्यान एकमेकांना कॉल असल्याचे सीडीआरवरुन दिसत आहेत.

🌑 29 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्वी ऑक्टोबर महिन्यात सुदर्शन घुले याने सदर कंपनीचे काम बंद पाडले होते.

🌑 अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेकवेळा परळी येथील कार्यालयात बोलवून आरोपी वाल्मिक कराडने दोन कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती, आणि न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली होती.

🌑 29 नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडने विष्णू चाटे याच्या फोनवरुन सुनिल शिंदे यांना फोन करुन काम बंद करण्याची व सुदर्शन म्हणतो त्याप्रमाणे करण्याची धमकी दिली होती.

🌑 त्याचदिवशी सुदर्शनने अवादा कंपनी येथे जाऊन वाल्मिक कराड यांची डिमांड पूर्ण करण्याची नाहीतर काम बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींच्या मागण्या पूर्ण न झाल्याने दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्यांच्या साथीदारांनी पुन्हा अवादा कपंनी येथे जाऊन तेथील गार्ड व शिवाजी थोपटे यांना मारहाण, शिवीगाळ व धमकी दिली होती.

🌑 त्यादिवशी मयत संतोष देशमुख व गावकऱ्यांनी विरोध केल्यावरुन 9 डिसेंबर 2024 रोजी खंडणीला अडथळा ठरणाऱ्या मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला आहे.

🌑 दरम्यान, वरील सर्व घटना होत असतानाच्या काळात आरोपी वाल्मिक कराड इतर आरोपींच्या फोनवरून संपर्कात असल्याचे सीडीआरवरुन दिसून येत आहे.

वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी एस आय टी ने दिली ही कारणं

या गुन्हयातील आरोपींनी कट करुन अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला आहे. सदर गुन्हयातील एक आरोपी अटक होणे बाकी असून तो आरोपी फरार होण्यामध्ये वाल्मीक कराड यांनी काही मदत केली आहे का ? त्याबाबत तपास करणे आहे. नवीन अटक झालेले आरोपी व सदर आरोपी यांचेकडे एकत्र बसवून गु्न्ह्याचे संबंधाने तपास करणे बाकी आहे. आरोपी वाल्मिक कराडने मयत संतोष देशमुख यांना दिलेल्या धमकीबाबत तपास करणे आहे. आरोपी घटनेच्या दरम्यान मोबाईलवरुन एकमेकांच्या संपकांत होते, त्यांचेत काय बोलणे झाले याचा तपास करणे आहे. सदरच्या गुन्हयामध्ये आणखी कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का याबाबत तपास करणे आहे. सदर आरोपी संघटीत गुन्हे करण्यामध्ये सवयीचे असून या संदर्भात सखोल तपास करणे आहे, म्हणून 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी एसआयटीने कोर्टात केली होती. मात्र, 7 दिवसांची म्हणजेच 22 जानेवारी पर्यंत एस आय टी कोठडी सुनावण्यात आली आहे.

धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबतची भेट 10 मिनिटात उरकली परळीला रवाना झाले !

0

मुंबई — खंडणी प्रकरण व सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापलेले असताना वाल्मीक कराडला मकोका लावण्यात आला. त्यानंतर परळी येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. कराड समर्थकांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला तर रात्री एका कार्यकर्त्यांनी पेटवून घेतले. त्यात तो जखमी झाला आहे. दरम्यान मुंबईत मंत्री धनंजय मुंडे यांनी देवगिरी निवासस्थानी जात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीला विशेष महत्त्व होते परंतु अवघ्या 10 मिनिटांत ही बैठक संपवून धनंजय मुंडे परळीच्या दिशेने रवाना झाले. परळीतील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता धनंजय मुंडे यांनी परळीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. परळीत सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बीड शहर पोलीस स्टेशनबाहेर सकाळपासून मोठ्या संख्येने कराड समर्थक जमले होते. वाल्मिक कराडची आई आणि पत्नीसह इतर महिला ठिय्या आंदोलनासाठी बसल्या होत्या. वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करत समर्थकांनी परळी बंदचीही हाक दिली होती. त्यात कराड समर्थकांमधील २ तरुणांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला परंतु त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला.

परळीत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि तणाव निर्माण झाला असून त्याच बाबतीत धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेऊन माहिती दिली.
अजित पवारांना परळीतील स्थितीचा आढावा देऊन धनंजय मुंडे परळीच्या दिशेने रवाना झालेत. पुढील २ दिवसांनी परळीतील परिस्थिती शांत झाल्यानंतरच माध्यमांशी संवाद साधला जाईल. बीड प्रकरणात जे म्हणणं आहे त्याबाबत भूमिका मांडू असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

आज दिवसभरात काय घडलं?

मस्साजोग येथील आवादा ऍनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना २ कोटी रुपयाची खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याच्या दिलेल्या धमकी प्रकरणी वाल्मिक कराड १५ दिवस पोलीस कोठडीत होता. आज मंगळवारी दुपारी केज येथील न्यायालयात हजर केले असता, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश दिशांत गोळे यांनी त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी मिळताच वाल्मिक कराडला मकोका लागल्यामुळे पुढील तपास करण्यासाठी त्याला आमच्या ताब्यात देण्यात यावे. असा अर्ज ‘एसआयटी’च्या अधिकाऱ्यांनी केला. यातच परळीत वाल्मिक कराड समर्थकांनी बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर जमून घोषणाबाजी केली. काही समर्थकांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला.

वाल्मीक कराड वर मकोकाची संक्रांत; परळी शहर झाले अशांत

0

बीड — वाल्मीक कराड वर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होताच परळी येथील वातावरण आणखी तापलं आहे. अवघ्या दहा मिनिटात परळी शहर बंद झालं.सकाळपासून पोलीस ठाण्यासमोर वाल्मीक कराडच्या आईने ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. काही महिलांसह कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न केला.

खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली होती. आज शेवटचा दिवस असल्यामुळे त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. दुसरीकडे मात्र परळी सकाळपासून वाल्मीक कराड समर्थकांनी राणी लक्ष्मीबाई टावर वर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले होते. वाल्मीक कराड वर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी करत असताना समर्थकांनी आ.सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, खा. बजरंग सोनवणे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली होती. वाल्मीक कराडची आई पारूबाई कराड यादेखील परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या देऊन समर्थक महिलांसह आंदोलनाला बसलेल्या होत्या. वाल्मीक कराडला केज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र मकोका कायद्यांतर्गत वाल्मीक कराड वर गुन्हा दाखल होताच परळी शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले. वाल्मीक कराड समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळून वाहतूक ठप्प केली. काही समर्थकांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वातावरण इतकं तणावपूर्ण बनलं की अवघ्या दहा मिनिटात परळी शहर बंद झालं. समर्थकांनी परळी शहर बंदची हाक दिली. पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसलेल्या पारूबाई कराड यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. काही बस गाड्यावर संतप्त कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळे बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाल्मीक कराड वर संक्रांत; आका वर अखेर लागला मोक्का

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपी पोलिसांनी पकडले आहेत. त्यांच्यावर मकोकांतर्गत गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड यास केजच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मात्र आज मोका कायद्यांतर्गत वाल्मीक कराड वर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याने कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे.

मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोक्का कायद्याअंतर्गत सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. मात्र या प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचा आरोप असणारा वाल्मीक कराडला‌ खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडी संपल्यामुळे केज न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. सीआयडीने पोलीस कोठडीची मागणी करून देखील न्यायालयाने 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी दिली. दरम्यान वाल्मीक कराडवर संक्रांत आली व मोका अंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला. त्यामुळे आता वाल्मिक कराडला जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे. वाल्मिक कराडवर अद्यापही खुनाचा गुन्हा दाखल नाही. दरम्यान मकोकोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने सत्र न्यायालयाकडून जामीन दिला जात नाही. मकोकाअंतर्गातील गुन्ह्यात विशेष न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करावा लागतो. ते विशेष न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. त्यामुळे, मकोका अंतर्गत जामिनासाठी संभाजीनगरच्या कोर्टात अर्ज करावा लागणार आहे.

खंडणी प्रकरणात न्यायालयाने वाल्मिकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. परंतु त्याचवेळी एसआयटीने हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून त्याप्रकरणी चौकशी करायची आहे, असे सांगून कोठडीची मागणी केली आहे. वाल्मिक कराड याच्यावर 302 च्या गुन्ह्यात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी दिली.

काय आहे मकोका कायदा ?

महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम अ‍ॅक्ट (MCOCA) म्हणजेच मकोका कायदा संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी 1999 मध्ये आणला. त्यापूर्वी असलेल्या टाडा कायद्याच्या धर्तीवर मकोका हा कायदा आणला गेला. हप्ता वसुली, खंडणी वसुली, अपहरण, हत्या, सामुहिक गुन्हेगारी या विरोधात मकोका लावला जातो. संघटीत गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. हा कायदा लावल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळत नाही.

कायद्यात आशा आहेत तरतुदी –
मकोका कायदा एकापेक्षा जास्त आरोपी टोळी म्हणून गुन्हे करत असतील तेव्हा लावला जातो. या कायद्यात पोलिसांना 180 दिवस दोषारोपत्र दाखल करण्यासाठी मिळतात. हा कायदा लावल्यानंतर आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही. एका आरोपीवर दोन पेक्षा जास्त आरोपपत्र त्यापूर्वी दाखल असतील, तेव्हाच हा कायदा लावला जातो. या कायद्यातंर्गत आरोपीचा कबुलीजबाब नोंदवता येतो. त्या कबुलीजबाबाचा वापर इतर सहआरोपींसाठी करता येतो. मकोको कायदा फरार आरोपीवरही लावता येतो. त्याची संपत्ती जप्त करता येते. त्याची बँक खाती गोठवता येते.
‌. मकोका कायदा कठोर आहे. हा कायदा लावल्यानंतर आरोपींची सहजासहजी सुटका होत नाही. यामध्ये किमान शिक्षा पाच वर्षांची व कमाल जन्मठेपेची शिक्षा आहे. गुन्हा ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडतो, त्या ठाण्याचा अंमलदार संबंधित आरोपींवर टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव पाठवतो. शहरी भागामध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे हा प्रस्ताव पाठवला जातो, तर ग्रामीण भागामध्ये स्पेशल आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव पाठवला जातो. या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर मकोका त्या – त्या प्रकरणांत लावला जातो.
एखाद्या टोळीवर मकोका लावण्यात आला तर त्याचा तपास शहरी भागात एसपी दर्जाचा अधिकारी तर ग्रामीण भागामध्ये डीवायएसपी दर्जाचा अधिकारी करतो. 180 दिवसापर्यंत पोलिसांना यामध्ये आरोपपत्र दाखल करता येते. मकोका लागल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही. विशेषतः गुन्ह्याचा तपास होत नाही तोपर्यंत जामीन दिला जात नाही. पुढे देखील आरोपींना जामीन मिळणे कठीण असते. मकोका गुन्ह्यात किमान 5 ते 10 वर्षांची शिक्षा व 5 लाखांचा दंड होऊ शकतो. जास्तीत जास्त शिक्षा ही गुन्ह्याच्या स्वरुपावरुन ठरत असते. या प्रकरणी आरोपींना जन्मठेप किंवा फाशीही होऊ शकते

कोणावरही दयामाया दाखवू नका ! मुख्यमंत्र्यांचा एसपी-सीआयडी अधिकाऱ्यांना फोन

0

मूंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. एकही आरोपी सुटता कामा नये अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत.तसेच कुठलीही दयामाया कोणाला दाखवू नका, असेही देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

धनंजय देशमुख यांच्या टाकीवर चढून केलेल्या आंदोलनानंतर फडणवीसांनी बीडच्या एसपींशी संपर्क केला असल्याचे बोलले जात आहे.

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण संपूर्णपणे ढवळून निघाले आहे. त्यात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. आरोपींना काठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे.

वाल्मिकची कोठडी वाढणार?
तसेच धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जाणारा वाल्मीक कराडवरही खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. सध्या तो पोलिस कोठडीत असून त्याची कोठडी उद्या संपणार आहे. त्यामुळे उद्या दुपारी त्याला केज न्यायालयात हजर केले जाईल. वाल्मीक कराडला पुन्हा किती दिवसांची कोठडी मिळते, हे पहावे लागणार आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: एस आय टी मध्ये फेरबदल

0

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये आता बदल करण्यात आला आहे. एसआयटीमधील काही अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतले गेल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने एसआयटी मध्ये बदल केला आहे. आता सीआयडीच्या अप्पर पोलीस अधिक्षक किरण पाटील या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये अप्पर पोलीस अधिक्षक किरण पाटील यांच्यासोबत सीआयडीचे पोलीस उपअधिक्षक अनिल गुजर, सीआयडीचे पोलीस निरीक्षक सुभाष मुठे, सीआयडीच्या भराभरी पथकाचे पोलीस निरीक्षक अक्षयकुमार ठिकणे, सीआयडीच्या भरारी पथकातील हवालदार शर्मिला साळुंके आणि दिपाली पवार यांचा समावेश केलेला आहे.

राज्यभर संताप आंदोलनं तरीही आरोपींची पाठराखण; संतोष देशमुखांच्या हत्येची ही स्थिती तर सामान्यांचे काय?

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी मोकाट आहे. हत्येच्या मास्टर माईंड ला वाचवलं जातंयं, एसआयटी असो की सीआयडी देशमुख कुटुंबीयांना माहिती देत नाही. वाल्मीक कराड वर 302 मोक्का लावण्यात यावा यासाठी टोकाची भूमिका घेत टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करावे लागतय, राज्यात हत्येनंतर संतापाची लाट उसळली अनेक ठिकाणी आंदोलन झाली. एवढं होऊनही सरपंच संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची अमानवीय पद्धतीने हत्या केल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली. लोकसभेत,विधानसभेत हत्येचे पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याचे तसेच तपास सीआयडी मार्फत करण्याचे जाहीर केले. त्या अनुषंगाने कारवाई देखील केली. असं असताना देखील वाल्मीक कराडने समर्पण केल्यामुळे‌ तो सीआयडीला सापडला मात्र पोलिसांना शरण न आलेला कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. राज्यात ठीक ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आंदोलन झाली. संतोष देशमुखांच्या लेकीने प्रत्येक ठिकाणी आक्रोशाचा टाहो फोडला. तीच स्थिती भाऊ असलेल्या धनंजय देशमुख यांची आहे. राज्यभर न्यायाची मागणी होत असली तरी या घटनेचा मास्टरमाइंड म्हणून आरोप असलेला वाल्मीक कराड उद्या जामिनावर बाहेर येईल व आपल्याला त्रास देईल कदाचित जीवावर उठेल अशी भीती मसाजोग ग्रामस्थांना वाटू लागली आहे. अजूनही दहशतीचा अंक संपायला तयार नाही. त्याला परिस्थिती ही तशीच कारणीभूत आहे. या प्रकरणातील प्यादे असलेले आठ आरोपीवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल झाले मात्र मास्टरमाइंड वाल्मीक कराड याला वाचवलं जात आहे अशी शंका म्हणण्यापेक्षा खात्रीच जनतेच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. वाल्मीक कराड वर फक्त आतापर्यंत खंडणीचाच गुन्हा दाखल आहे. वाल्मीक कराडचा शस्त्र परवाना रद्द करून आपण खूप मोठी कारवाई केली असा आव जिल्हा प्रशासनाने आणला. इतकंच नाही तर पीडित देशमुख कुटुंबीयांना तपासा संदर्भात माहिती सुद्धा देण्यात येत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तपासात एवढी गुप्तता मास्टर माईंड ला वाचवण्यासाठी केली जात असल्याची जनभावना निर्माण होऊ लागली आहे. याच परिस्थितीला कंटाळून शेवटी आरोपी सुटलाच तर आपला जीव घेणार त्यापेक्षा आपणच आत्मदहनासारखा मार्ग स्वीकारलेला बरा अशी उद्विग्न भावना व्यक्त करत धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील तसेच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्यांचे मन वळवण्यात व त्यांना खाली उतरवण्यात यश मिळवले. एवढं आंदोलन पेटून लोकप्रतिनिधींनी सर्वोच्च सभागृहात आवाज उठवून गाव समाज पाठीशी असताना देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नसेल? न्यायासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागत असेल? तर गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे काय हाल असतील हा विचार न केलेलाच बरा. शेवटी हे राज्य न्यायाचे आहे की अन्याय करणाऱ्या गुंडांचे आहे असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

वाल्मीक कराडसह 100 जणांचे शस्त्र परवाने रद्द

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्याचा मुद्दा समोर आला होता. दरम्यान याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये प्राथमिक स्वरूपात 100 परवाने रद्द केले असून यात वाल्मीक कराड याच्या शस्त्राचा देखील समावेश आहे.

बीड जिल्ह्यात शस्त्र परवान्यावरून राजकारण तापले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा प्रश्न समोर आणला होता. दरम्यान याची प्रशासनाने दखल घेतली असून ज्या व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. तसेच ज्याला न्यायालयाकडून एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झाली. त्याचा शस्त्र परवाना रद्द केला जात आहे. दरम्यान आत्तापर्यंत प्रशासनाने 100 परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्या शस्त्र परवान्याचा देखील समावेश आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण:मकर सक्रांतीच्या दिवशी आत्मदहनाचा ग्रामस्थांचा इशारा

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्येला महिना उलटून गेला आहे. या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे.मात्र या प्रकरणात वाल्मिक कराडवर देखील आरोप करण्यात आले आहेत, कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे, मात्र त्याच्यावर मोक्का न लावण्यात आल्यानं मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्या 13 जानेवारीला ग्रामस्थांच्या वतीनं टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येणार आहे, तर 14 जानेवारीला मकर संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी मस्साजोगचे ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार आहेत. मस्साजोग येथील महादेव मंदिरासमोर अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. वाल्मिक कराड याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करून मोक्का लावण्यात यावा, आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी. शासकीय वकील म्हणून उज्वल निकम किंवा सतीष मानशिंदे यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. SIT कमिटीमध्ये पंकज कुमावत या अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे? याची माहिती देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी, केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सहआरोपी करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, त्याच्यावर देखील हत्येचं 302 कलम लावा. नाहीतर उद्या हे आरोपी माझा देखील खून करतील. जर त्याच्यावर मोक्का लागला नाही तर उद्यापासून आम्ही टॉवरवर जाऊन आंदोलन करणार आहोत. मी स्वत:लाच संपवून घेतो, म्हणजे माझ्या भावाला तरी समाधान मिळेल की माझा भाऊ स्वता:हूनच संपला, त्याला आपल्या सारखं मारलं नाही, असं धनंजय देशमुख यांनी उद्वेग्न भावना व्यक्त केल्या आहेत.