लिंबागणेश पाणीपुरवठा विहिरीच्या मोटारची वायर दीड महिन्यात २ वेळा चोरी

लिंबागणेश — बीड तालुक्यातील लिंबागणेश गावात ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील विहिरीच्या मोटारीची विद्युत वायर गेल्या दीड महिन्यात तब्बल दोन वेळा चोरीला गेल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावाच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या या योजनेवर परिणाम होत असून पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या वारंवार होणाऱ्या चोरीमुळे ग्रामपंचायतीवर मोठा आर्थिक बोजा पडत असून आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सरपंच बालासाहेब जाधव यांनी दिली. यापूर्वी झालेल्या चोरीबाबत नेकनुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पुन्हा चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, आज (दि.०४) नेकनुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे व लिंबागणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड यांनी भायाळा साठवण तलाव परिसरातील चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, डॉ. गणेश ढवळे, विक्रांत वाणी, विनायक वाणी, शिवाजी वाणी तसेच पाणीपुरवठा कर्मचारी सुखदेव वाणी उपस्थित होते.

डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले की, भायाळा साठवण तलावातून लिंबागणेश व पोखरी गावांना पाणीपुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत सार्वजनिक विहिरीच्या मोटारींच्या वायरची वारंवार चोरी होणे हे गंभीर असून चोरट्यांनी पोलिस प्रशासनालाच आव्हान दिले आहे. यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून चोरट्यांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करून चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles