अहिल्यानगर — महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने 14 फेब्रुवारीच्या रात्रीपासून राज्याच्या दोन जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई केली आहे. यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील एकूण 21 ठिकाणांवर एटीएसच्या पथकांनी एकाच वेळी छापे टाकले तरुणांचे कट्टरपंथीय विचार सरणीकडे वळण आणि संशयास्पद दहशतवादी हालचालींच्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
एटीएसने 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू केलेली ही शोधमोहीम पहाटेपर्यंत सुरू होती. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड शहरांतील 14 ठिकाणी, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील 7 ठिकाणी छापे टाकण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने एटीएसच्या विविध पथकांनी संशयितांच्या घरांची आणि कार्यालयांची झडती घेतली.
या छापेमारीत एटीएसच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांच्या ठिकाणांहून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स जप्त करण्यात आली आहेत. तसेच काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या साहित्यावरून तरुणांना भडकवण्याचे किंवा दहशतवादी संघटनांशी संपर्क साधण्याचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या कारवाईत अद्याप कोणालाही अधिकृतपणे अटक करण्यात आलेली नाही. मात्र, प्राथमिक चौकशीसाठी 12 पेक्षा जास्त संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचे देशविरोधी संघटनांशी काही संबंध आहेत का, याचा कसून तपास एटीएस करत आहे.गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र एटीएसने अल-कायदा आणि इतर प्रतिबंधित संघटनांशी संबंधित असलेल्या नेटवर्कवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील तरुणांना ऑनलाईन माध्यमातून कट्टरपंथी बनवण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर ही 21 ठिकाणची छापेमारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तपास अधिकारी सध्या जप्त केलेल्या तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करत असून, यातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.




