मुंबई — तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या प्रसिद्ध लाडूसाठी वापरले जाणारे तूप शुद्ध नसून बनावट असल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भोले बाबा डेअरी नावाच्या कंपनीने तब्बल पाच वर्षांपासून (२०१९ – २०२४) तिरुमला तिरुपती देवस्थानला २५० कोटींचे बनावट तूप पुरवल्याचं सीबीआय – एसआयटी तपासात स्पष्ट झालं आहे.याप्रकरणी दिल्लीतील व्यापारी अजय कुमार सुगंधा याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या डेअरीने खऱ्या दुधाऐवजी पाम ऑईल आणि केमिकल्सपासून बनवलेलं मिश्रण तूप म्हणून पुरवलं. हे मिश्रण सुगंध आणि रंगासाठी कृत्रिम पदार्थ वापरून तूपासारखं दिसेल अशा पद्धतीने तयार केलं जात होतं. सीबीआय – एसआयटीने केलेल्या लॅबोरेटरी चाचणीत उघड झालं की तूपामध्ये दुधातील कोणतंही फॅट नव्हतं. त्यामुळे हे पूर्णपणे बनावट असल्याचं सिद्ध झालं.
सध्या या प्रकरणात भोले बाबा डेअरीचे मालक, पुरवठा साखळीतील काही अधिकारी आणि तिरूमला तिरूपती देवस्थानच्या खरेदी विभागातील काही कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे. सीबीआय – एसआयटीने आर्थिक अनियमितता, फसवणूक आणि धार्मिक भावनांचा अपमान या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
या घोटाळ्यामुळे लाडू प्रसादाची शुद्धता आणि श्रद्धाळूंचा विश्वास दोन्ही प्रश्नचिन्हाखाली आले आहेत. तिरूमला प्रशासनाने सांगितलं की, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि पुढे सर्व तुपाच्या बॅचेसची स्वतंत्र लॅबमध्ये चाचणी केली जाईल.सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या एस आय टे ने सत्य समोर आणले आहे. दोषींना कायद्याचा फटका बसणार आहे. हे केवळ भेसळ प्रकरण नाही, तर हिंदूंच्या श्रद्धेवर थेट प्रहार आहे, आपल्या विश्वासाचा अपमान आहे आणि भारताच्या आत्म्याविरुद्धचा गुन्हा आहे. पवित्रतेशी खेळ करणाऱ्यांना आता त्याची किंमत चुकवावीच लागेल.

