बीड — दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या मराठवाड्याची अक्षरशः पाण्यात बुडायची वेळ आली आहे. बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, छ. संभाजीनगर, जालना अतिवृष्टीने जलमग्न झाल्याचं पहायला मिळत आहे. पाण्यात बुडालेल्या पिकांसोबतच गुराढोरांसह झालेली जीवित हानी भयग्रस्त आक्रोश करायला भाग पाडत आहे. आशातच सरकार काहीतरी मदत करेल कर्जमाफी करून दिलासा देईल याची वाट सध्या तरी पाहिली जात आहे.मराठवाड्यात काही दिवसात झालेल्या पावसात 8 जणांचा बळी गेला. तर बीड आणि धाराशिवमध्ये अजूनही मदतकार्य सुरूच आहे. तर जायकवाडी आणि माजलगाव धरणातून विसर्ग वाढल्यानं लष्कराचं पथक बोलवण्यात आलं आहे.

मराठवाड्यात 1 जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 124 टक्के पाऊस पडला आहे. 22 सप्टेंबरपर्यंत सरासरी 604 मिमी पाऊस होत असतो. मात्र आता 747 मिमी इतका सरासरी पाऊस मराठवाड्यात झाला आहे. फक्त सप्टेंबरचा विचार करायचा 165 टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे.

पूरस्थितीची पाहणी करा — मुख्यमंत्री
अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना दिले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना सूचना दिल्या. 31 लाख शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा जीआर काढल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली मात्र ओला दुष्काळ जाहीर करणार का या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ सोडा, सर्वांना सर्वोतोपरी मदत करणार असं आश्वासन देत ओला दुष्काळाबाबत थेट भाष्य करणं टाळलं.

शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना पूर परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. त्यानुसार शिवसेनेचे सर्व मंत्री आज किंवा उद्या पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.
लातूर — पीक पाण्याखाली गेलं
लातूरमध्ये हाताला आलेलं पीक पाण्यात गेल्यानं निलंग्यात महिलेनं आर्त टाहो फोडला. पुराच्या पाण्यात बैल अडकले, कोंबड्या वाहून गेल्या, शासन मदत करेना, वाचवा, वाचवा म्हणत महिलेने आर्त टाहो फोडला. गुंजर्गा गावात गुडघाभर पाण्यात जाऊन महिलेनं आक्रोश केला, तर महिलेचा टाहो बघून उपस्थितही हतबल झाल्याचं दिसून आलं.

धाराशिव — मोठं नुकसान
धाराशिव जिल्ह्यात पावसाने हैदोस घातला आहे. आंबी गावात पुराचं पाणी शिरल्याने मुकेश गटकळ यांचा संसार उघड्यावर आला. घरात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलं असून, एबीपी माझाशी बोलताना घरातील माऊलीच्या अश्रुंचा बांध फुटला. यावेळी एबीपी माझाचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनाही अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरूड परिसरात अनेकांच्या घरात पाणी शिरलं. तर नागरिकांनी अन्न धान्य वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण मोठं नुकसान झाल्याचं पहायला मिळालं.
जालना — पीक जमीनदोस्त
जालन्यातील दुधना काळेगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसाचा खरीप पिकांसह ऊस पिकाला मोठा फटका बसला. दुधना काळेगाव येथील शेतकरी प्रकाश भांदरगे यांचा दोन एकर ऊस जमीनदोस्त झाला. दुधना काळेगाव परिसरातील खरिपातील सोयाबीन, कपाशी मक्का पिकासह उसाचं प्रचंड नुकसान झालं आहे.
बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या सादोळा गावाला गोदावरीच्या पुराचा फटका मोठा फटका बसला. सोयाबीन, ऊस, कापूस अशी सर्व पिकं पाण्याखाली गेल्यानं बळीराजावर मोठं संकट कोसळलंय. आता तरी सरकारनं मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बीड — अनेक गावांचा संपर्क तुटला
बीड जिल्ह्यातील शिरसमार्ग गावातून वाहणाऱ्या सिंदफणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला पूर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. तर नदीपात्र परिसरात अडकलेल्या स्थानिक नागरिकांना NDRF टीमच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आलं आहे. शिरसमार्ग गावाला सिंदफणा नदीचा पूर्णपणे वेढा पडला आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वारंवार तहसील प्रशासनाकडून केलं जातंय.
बीडच्या परळी तालुक्यातील पोहनेर गावाला गोदावरीच्या पाण्याने वेढा घातल्याने रात्रीपासून पोहनेर गावचा संपर्क तुटलाय. आता गावात जाण्यासाठी फक्त चप्पूचाच पर्याय आहे. त्यातच गावातील गर्भवतीला प्रसूती वेदना होऊ लागल्याने तिला चप्पूच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर आणलं. प्रशासन नाही तर भोई बांधवच मदतीला येत असल्याचं महिलेच्या कुटुंबीयाने सांगितलं. या महिलेला परळीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
परभणी — दुधना नदीला पूर
सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे दुधनेला पूर आलाय आणि अनेक गावांना पाण्याने वेढा दिलाय. मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण गावातील पूल पूर्णत: पाण्याखाली गेला. शेतीचंही मोठं नुकसान झालं. गावाला पाण्याने वेढा दिल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.
हिंगोली – हळद, सोयाबीन पाण्याखाली
हिंगोली जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्या पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या ओढे नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. तर अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वसमत शहरातलगत असलेल्या नदीला पूर आला आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाच ते सहा जणांची सुटका करण्यात आली. दोरीच्या सहाय्याने नागरिकांना बाहेर काढलं गेलं.
हिंगोली जिल्ह्यातील आसेगाव शिवारातील शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. आसना नदीचे बॅक वॉटर शेतात शिरल्याने शेतातील सोयाबीन, कापूस, हळद ही पिके पूर्णतः पाण्याखाली आली आहेत. शेतकऱ्यांना शेतातील सोयाबीनचे पीक पाण्यात शोधून काढाव लागत आहे, हजारो रुपये खर्च करून शेतात पेरणी केलेल पिकाचा चिखल झाल्यानं शेतकरी पूर्णत हतबल झाल्याचं चित्र

