शैक्षणिक संकुल बाहेर तगडा बंदोबस्त; आरोपी पकडण्यासाठी तीन पथक रवाना
बीड — उमा किरण शैक्षणिक संकुलातील दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर मानसिक, लैंगिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर बीडमध्ये संतापाची लाट उसळली असून, सर्व स्तरांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी आरोपींची नावे असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. मात्र आज सकाळी उमाकिरण बंद ठेवण्यात आले असून पालक आणि विद्यार्थी यांनी परिसरात गर्दी केली होती. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांचा तगडा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

असं आहे प्रकरण
पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने एप्रिल 2024 मध्ये बीडमधील उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये निट परीक्षेच्या तयारीसाठी प्रवेश घेतला. नियमितपणे वर्गात हजेरी लावत असताना, तिला प्रशांत खाटोकर नावाच्या फिजिक्स विषयाच्या शिक्षकाकडून सतत त्रास सहन करावा लागला. प्रशांत खाटोकर पीडित विद्यार्थिनीला वर्ग संपल्यानंतर कॅबिनमध्ये बोलवून बॅड टच, कपडे उतरवायला लावणे, व अश्लील फोटो काढणे यांसारखी कृत्ये करत असे. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, ती घाबरलेल्या अवस्थेत त्याचा विरोध करत असे, पण शिक्षक तिला धमकी देत की, “जर कोणाला सांगितले तर तुला जीवे मारून टाकीन.”प्रशांत खाटोकरकडून होणाऱ्या त्रासाविरुद्ध मदतीसाठी पीडित विद्यार्थिनीने दुसऱ्या शिक्षक विजय पवार यांच्याशी संवाद साधला. मात्र धक्कादायक म्हणजे, विजय पवार यानेही तिच्यावर अशाच प्रकारचा छळ सुरू केला. त्याने पीडितेला सांगितले की, “प्रशांतला मुलींना त्रास देण्यासाठीच ठेवलंय”, आणि त्यानेही तिच्यासोबत अश्लील वर्तन केले.या घटनेचा मानसिक ताण वाढल्यानंतर पीडित मुलीने आपल्या पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला. तिच्या पालकांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पाॅक्सो कायद्याअंतर्गत, भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरू केली आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न या घटनेमुळे केवळ उमा किरण शैक्षणिक संकुल नव्हे, तर संपूर्ण बीड जिल्ह्यातील कोचिंग क्लासेसमधील मुलींच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक पालकांनी अशी मागणी केली आहे की, जिल्ह्यातील सर्व क्लासेसची तपासणी करून पोलीस प्रशासनाने विद्यार्थिनींसोबत थेट संवाद साधावा व सूरक्षेसाठी उपाययोजना कराव्या.दरम्यान या घटनेमुळे बीडमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, उमा किरण क्लासेसची विश्वासार्हता धुळीला मिळाल्याची भावना पालक व्यक्त करत आहेत. जिथे शिक्षकच अश्लील वर्तन करत असतील, तिथे मुलींच्या सुरक्षेची खात्री कशी द्यायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

