बीड — संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड विषयी मोठी माहिती समोर आली आहे. कराडलाच खंडणीसाठी धमकावण्यात आले होते. त्यानंतर जीवाच्या भीतीने त्याने खंडणी खोराला 15 लाख रुपये दिले होते.माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातून हे पैसे दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
https://x.com/anjali_damania/status/1897924759859638443
कराडला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी मागील वर्षी जानेवारी महिन्यातच गुन्हाही दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या बाबतचा एफआयआर सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यानुसार माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील कार्यालयात टाइप रायटरची नोकरी करणाऱ्या गणेश उगले याने ही फिर्याद दिली आहे. तो इतर कार्यालयीन कामही पाहतो. शिवराज बांगर हा 1 जानेवारी 2023 रोजी जगमित्र संपर्क कार्यालयात आला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.वाल्मिकअण्णा कराड यांना बोललो आणि त्यांनी मला 15 लाख रुपये देण्यात सांगितले आहेत, असे बांगर आपल्याला म्हणाल्याचे उगले याने फिर्यादीत नमूद केलेआहे. कराड यांना फोन करून आपण याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, बांगर मला वारंवार व समक्ष भेटून तसेच वॉट्सअपद्वारे कॉल करून धमकी देत होता. मला 15 लाख रुपये देत नाहीतर तुझ्या अंगावर गाडी घालून ठार मारीन, तुझी समाजामध्ये बदनामी करेन. मला माझ्या जिवाचा धोका नको आहे. त्यामुळे त्याला 15 लाख रुपये दे, असे कराड यांनी सांगितल्याचे उगले म्हटले आहे.
बांगरला पैसे दिल्याचे सीसीटीव्हीमध्ये असल्याचा दावाही उगलेने केला आहे. पैसे घेतल्यानंतर बांगरकडून धमकी दिली जात होती. त्यामुळे पोलिसांत फिर्याद दिल्याचे उगलेने म्हटले आहे. ही फिर्याद मागील वर्षी 2 जानेवारी 2024 रोजी परळी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.एफआयआर पोस्ट करताना दमानिया यांनी म्हटले आहे की, वाल्मिक कराड कडून 15 लाखाची खंडणी शिवराज बांगर यांनी वसुल केली होती, असा एफ आय आर बाहेर आला आहे. वारंवार समक्ष भेटून व व्हॉट्सअप कॉल वरून, “पैसे दे नाहीतर तुला मारून टाकिन” अशी धमकी शिवराज बांगर यांनी दिली आणि 15 लाख कराडच्या सांगण्यावरून, जगमित्रच्या लॉकर मधून देण्यात आले? कराडला कोणी धमकी देऊ शकत होतं, हे माझ्या बुद्धीला पटत नसल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे.

