Sunday, December 14, 2025

दमानियां आधी माझ्यावर खटला दाखल करा, गंभीर आरोप करत धसांचे मुंडेंना आवाहन

बीड — आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या वरदहस्ताने कृषी खात्यात 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर खून खटल्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपावरूनही धनंजय मुंडें अडचणीत आले असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना कृषी खात्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सातत्याने करत आहेत. त्यानंतर, आता आष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी स्वत: राजीनामा दिला होता, सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर आम्ही स्वत: पाहिलंय की अजित पवारांनी राजीनामा दिला होता. मग, धनंजय मुंडे का देत नाहीत, असा सवालही आमदार धस यांनी उपस्थित केला आहे.

मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी झालेल्या आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंच्या वरदहस्ताने कृषी खात्यात 300 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केले आहेत. शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदी करण्याचा निर्णय घेतला. एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी जीआर निघाला. हे सर्व डीबीटीने द्यावे असे तत्कालीन सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सूचवले होते. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्रिम देण्यात यावा असे आदेश काढल्याची माहिती आमदार धस यांनी दिली.

धनंजय मुंडे यांनी आज अर्ज उद्या कर्ज अशा स्वरुपात सर्व करुन ठेवले, टेंडर काढताना अतिशय डोक्याने ते काढले आहे. कुणाला काही कळू नये असे टेंडर काढण्यात आले, महाराष्ट्राचे डोके चक्रावेल असे सर्व आहे, असे आमदार धस यांनी म्हटले आहे. नॅनो युरियामध्ये 21 कोटी 26 लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे, DAP मध्ये 56 कोटी 76 लाख रुपये, बॅटरी 45 कोटी 53 लाख, कापूस साठवणूक बॅगमध्ये 577 ची बॅग 1250 रुपये घेण्यात आली. तर, 180 कोटी 83 लाख रुपये धनंजय मुंडे आणि त्यांच्या चमूने बाहेर काढल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे. रफिक नाईकवाडे यातील मुख्य ॲक्टर आहे, भामरे आजही त्यांच्यासोबत आहेत. या चमूने फक्त कागदपत्रे रंगवली आहेत, लोकायुक्त कार्यालयाल देखील खोटी माहिती देण्यात आली. त्यामुळे, धनंजय मुंडे यांच्या काळातील या भ्रष्टाचाराची एस आय टी स्थापन करून चौकशी करा, अशी मागणीही आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

भारतीय किसान संघाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते, संबंधित घोटाळ्याची तपासून कारवाई करावी. मात्र, वाल्मिक कराड यांनी हे पत्र फाडून टाकले होते. कृषी विभागाला चॅलेंज करतो हे पत्र तुमच्याकडे आहे का? असंही धस यांनी म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याचे उत्तर द्यावे.भारतीय किसान सभेचे पत्र त्यांनी फाडून टाकले. त्यामुळे, त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे. तसेच, सीबीआय, ईडी एसीबी, यांच्याकडे याबाबतची सविस्तर तक्रार करणार आहे, धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्ंयामध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. बदल्यांसाठीचे रेट कार्ड त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांकडे सापडले आहे, धनंजय मुंडे यांच्याकडे सर्व वाटा जात होता, असा गंभीर दावा आमदार धस यांनी केला आहे.

वाल्मिक कराड यांनी निविदा ठरवल्या, वाल्मिक कराड हे राज्याचे बाप होते का? महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणूक केली होती. या सर्वांचे सिडीआर काढा, 100 कोटींपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार यात आहे. वाल्मिक कराड जिल्ह्याचे बाप वाटत होते, मात्र निविदा काढण्यात देखील तो बाप होता असा टोला सुरेश धस यांनी लगावला आहे. आकाचे कार्य फक्त बीड जिल्हा पुरते नव्हते, संपूर्ण महाराष्ट्रभर होते, आता कागदाचा लढा चालू द्या, आता खटला करा पण मी माघार घेणार नाही. हा सगळा एकूण 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. धनंजय मुंडे म्हणतात अंजली दमानिया यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा करणार, पण मी म्हणतो त्यांनी माझ्यावर खटला दाखल करावा, असे म्हणत सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना चॅलेंजच दिले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles