बीड — सध्या राज्यात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना वीस दिवस उलटून गेले असले तरी पकडण्यात यश आले नाही. मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली असता दोन दिवसात फरार आरोपी गजाआड करण्यात येतील असा विश्वास सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मिळवण्यासाठी सीआयडीची पथक बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अनेक महत्त्वाचे पुरावे देखील सीआयडीच्या हाती सापडले आहेत. दरम्यान मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज सीआयडी कार्यालयात जाऊन तपास कुठपर्यंत आला आहे या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न केला. उद्या सीआयडी चे अधिकारी केज मध्ये जाऊन धनंजय देशमुख यांना तपासाची माहिती देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीदरम्यानच या गुन्ह्यातील फरार आरोपींना दोन दिवसात पकडून गजाआड केले जाईल असा विश्वास सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आला असल्याची माहिती देखील मिळत आहे. धनंजय देशमुख यांनी सीआयडी करत असलेल्या तपासावर आपला विश्वास असल्याचं मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. याच प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतली.