‘ती’ हत्या केवळ स्व.संतोष यांची नाही, माणुसकीची सुध्दा झालीये!
बीड – दिवंगत सरपंच स्व.संतोष देशमुख यांची हत्या होऊन तब्बल १५ दिवस उलटले आहेत. या गुन्ह्याचा तपास तीन वेगवेगळ्या यंत्रणांकडे गेला तरीही अद्यापपर्यंत आरोपी अटक नाहीत. वारंवार लोकप्रतिनिधी आणि सामान्यांकडून कॉल रेकॉर्डस तपासण्याची मागणी करत असतानाही मुख्य सुत्रधाराला वाचविण्यासाठी असे केले जात नाही. मुख्य सुत्रधार वाल्मीक कराड आहे, हे संपूर्ण जिल्ह्याला माहीती आहे. परंतु ते एका सत्ताधार्याचा उजवा हात असल्याने त्यांना पाठीशी घातले जात आहे. या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि जिल्ह्यात वाढणार्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बीडमध्ये शनिवारी (दि.२८) रोजी आयोजित केलेल्या सर्वसमावेशक मूक मोर्चामध्ये सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची अमानवीय हत्या ही केवळ एका व्यक्तीची नव्हे तर अक्षरशः माणुसकीची हत्या आहे. इतक्या क्रुरपणे मारले जाते. एखाद्या चित्रपटात ज्याप्रकारे अतिशयोक्तीपूर्णतेने खलनायक पात्र कोणाला तरी मारत असते त्यापेक्षाही कैक पटीने बिभत्स प्रकारे स्व.संतोष देशमुख यांना मारले जाते. आणि हे इतके गंभीर प्रकरण असताना १५ दिवस उलटूनही या गुन्ह्यातील आरोपी आणि सुत्रधाराला अटक केली जात नसेल, केवळ ते एका सत्ताधाऱ्याच्या राजाश्रयाला असल्यामुळे! किती संतापजनक प्रकार आहे हा! हा प्रकरण म्हणजे केवळ स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येचे नाही, तर माणुसकीच्या हत्येचे आहे. त्यामुळे पुन्हा कोणाचा संतोष देशमुख होऊ द्यायचा नसेल तर २८ डिसेंबर रोजी होणार्या सर्वसमावेशक मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. या मोर्चाला सर्व राजकीय पक्षांचे जेष्ठ नेते, सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य जिल्हावासीय मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत
असा असेल मोर्चाचा मार्ग
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर माळीवेस, सुभाष रोडवरून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग असेल.
*चौकट (अतिमहत्त्वाचे)*
*याठिकाणी असेल पार्कींगची व्यवस्था*
खंडेश्वरी मंदीराच्या समोरील क्रिडांगण
एमआयडीसी परिसर, फटाका मैदान
मोंढा रोड परिसर, शासकीय आयटीआय परिसर,जुनी व नवी पंचायत समिती परिसर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोड परिसर, माने कॉम्प्लेक्स परिसर, जिल्हा रूग्णालयाच्या मागील बिंदुसरा रेस्ट हाऊस परिसर, निळकंठेश्वर मंदिर परिसर, कनकालेश्वर मंदिर परिसर, बिंदुसरा नदीपात्र परिसर, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसर, छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण परिसर (स्टेडियम), छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण (मल्टीपर्पज ग्राउंड) रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागील परिसर.
सुनियोजित मूक मोर्चा होणारच
२८ डिसेंबर रोजी होणारा सर्वसमावेशक मोर्चा रद्द झाल्यची अफवा काही लोकांकडून पसरवली जात आहे. परंतु सर्वसमावेशक असणारा ज्यामध्ये सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना, सर्व धर्म आणि सर्व जाती यांच्याकडून काढला जाणारा हा सर्वसमावेशक मोर्चा सुनियोजितपणे भव्यदिव्य होणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी उद्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे.