बीड — केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी आज तिसऱ्या आरोपीला पुण्यामधून अटक केली आहे.
प्रतिक भीमराव घुले वय 25 वर्ष, रा.टाकळी ता.केज असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.प्रतिकच्या अगोदर पोलिसांनी जयराम माणिक चाटे वय 25 वर्ष रा.तांबवा ता. केज, महेश सखाराम केदार वय 21 रा. मैंदवाडी ता.धारुर या दोघांना अटक केली होती. आरोपी प्रतिक हा खून केल्यानंतर पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली आहे. या आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान जयराम चाटे व महेश केदार यांना सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
असं आहे प्रकरण ?
संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले.
याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन देखील करण्यात आले. देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं तपासात कसूर केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आल्याने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी संबंधित पीएसआयचे निलंबन केले.