बीड — बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे यांची डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये भव्य सभा पार पडली. डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उमेदवारीपासून ते चुलते माजी मंत्री जयदत्तआण्णा यांच्या पाठिंब्यापर्यंत अनेक योगायोग जुळून आले. या काळात मुंडे बहीण भावाचे मिळालेले पाठबळ, कालच्या सभेपूर्वी राष्ट्रवादीतील मिटलेला अंतर्गत कलह यामुळे डॉ.योगेश क्षीरसागर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल दिसत आहे.
अजितदादा पवारांच्या उपस्थितीत अनेक मोठे प्रवेश झाले. यामुळे डॉ.योगेश क्षीरसागर यांची ताकद नक्कीच वाढली आहे. डॉ.योगेश यांना सर्व समाजातून पाठिंबा मिळत आहे. अनेक संघटना देखील त्यांना पाठिंबा देत आहेत. डॉ.योगेश यांच्यासाठी आ.पंकजाताई मुंडे, माजी खा.प्रीतमताई मुंडे, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी देखील सभा घेऊन विजयी करण्याचा निश्चय केला. तसेच, काल खुद्द अजित पवार, धनंजय मुंडे यांनी देखील सभा घेतली. डॉ.योगेश क्षीरसागर यांना मतदारसंघातून जनसामान्य नागरिकांच्या सभा, कॉर्नर बैठका, रॅलीमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विरोधकांमध्ये धाकधूक वाढली आहे. डॉ.योगेश क्षीरसागर आणि डॉ.सारिका क्षीरसागर यांनी मागील एक ते दीड वर्षात बीड मतदारसंघ पिंजून काढला. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामुळेच त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत आहे. डॉ.योगेश क्षीरसागर हे उच्चशिक्षित, सुसंस्कृत, शांत, संयमी, युवा नेतृत्व असल्याने त्यांना नागरिकांच्या समस्यांची जाण आहे. त्यामुळे त्यांना निवडून विधानसभेत पाठवण्याची तयारी बीड मतदारसंघातील मतदारांनी केली असल्याचे चित्र आहे.
असा मिटला राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह
बीडमध्ये सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी योगेश क्षीरसागरांच्या पाठिशी मोठी ताकद उभी केली. सभेपूर्वी धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये एका ठिकाणी बैठक घेतली. त्या बैठकीत सर्व नाराज व्यक्तींची मते जाणून घेतली. या बैठकीला डॉ.योगेश क्षीरसागर हे देखील उपस्थित होते. बैठकीनंतर अजित पवार यांचे आगमन होताच व्यासपीठावर माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, माजी गटनेते फारुक पटेल, ज्येष्ठ नेते मोईन मास्टर, बबनराव गवते, महादेवराव उबाळे, बाळासाहेब गुजर, बरकत पठाण, अलीम पटेल, जीवन घोलप, रामदास सरवदे, संतोष क्षीरसागर, संभाजी काळे, नंदू गवळी, बाळासाहेब धोत्रे, गौरव जावळे, शकीलखान, आक्रम बागवान असे अनेकजण पोहोचले. या सर्वांनी आता योगेश क्षीरसागरांचे काम जोमाने करण्याचा निर्णय अजितदादांच्या उपस्थितीत घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह सध्यातरी मिटल्याचे चित्र आहे.