बीड — गंगाधरच शक्तीमान आहे असे म्हणण्याची परिस्थिती बीडमध्ये निर्माण झाली आहे. चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे तुतरीच्या प्रचारात होते. तर त्यांचे पुतणे आणि महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर हे भाजपाच्या प्रचारामध्ये व्यस्त होते. दोघे दोन पक्षाकडे लोकसभेला आणि विधानसभेला मात्र पुन्हा एकत्र. हे कसलं राजकारण. बीडवासियांना मुर्खात काढण्याचे काम काका-पुतण्यांकडून सुरू आहे.
आपल्याला संधी कुठे मिळती, सावज कुठे सापडते, या शोधातच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर व्यस्त होते हे आता स्पष्ट झाले. आपली डाळ कशी तरी शिजली पाहिजे. त्यासाठी जणू काही ठरवून रणनिती आखली. लोकसभेला जयदत्त क्षीरसागरांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मदत केली तर महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांनी भाजपाला मदत केली. तीन महिनेच झाले. लोकसभेला वेगवेगळी भूमिका असणारे हे काका-पुतणे विधानसभेला संदीप क्षीरसागरांच्या विरोधात एकत्र आले. या काका पुतण्यांचे जणू आधीच ठरले होते की काय म्हणूनच जयदत्त क्षीरसागरांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. जर योगेश क्षीरसागरांना महायुतीची उमेदवारी मिळाली नसती तर जयदत्त क्षीरसागर हे अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरले असते. आणि योगेश क्षीरसागरांनी जयदत्त अण्णांचे काम केले असते. मात्र योगेश क्षीरसागरांना अजित पवार गटाची उमेदवारी मिळाली आणि गोची झालेल्या जयदत्त क्षीरसागरांनी माघार घेत योगेश क्षीरसागरांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. क्षणाक्षणाला राजकीय विचार बदलतातच कसे येतात, यांचे बदललेले निर्णय लोकांना आवडतील काय याचाही विचार केला जात नाही. जणू बीडवासिय मुर्ख आहेत अशी खेळी या काका-पुतणे क्षीरसागरांनी खेळली.