बीड — गेल्या चाळीस वर्षांपासून मी प्रामाणिकतेने आणि निष्ठेने शिवसेनेत सक्रिय असून शिवसेनेच्या माध्यमातून मी जनसेवा करत आलो आहे, सर्वसामान्यांचे समस्या अडचणी सोडवत आलो आहे. परंतु वारंवार शिवसेनेने माझ्यावर अन्याय करत मला डावलले आहे. जेंव्हाही विधानसभा निवडणुकीची तयारी केली तेंव्हा तेंव्हा मला सोडून उमेदवारीची माळ दुसर्याच्या गळ्यात घालण्यात आली.
बीडमधील अठरा पगड जाती धर्मातील जनसमुदाय माझ्याजवळ येऊन वारंवार दुःख व्यक्त करतो की, सातत्याने शिवसेनेकडून अन्याय तुमच्यावर होतो तरी तुम्ही का हा अन्याय सहन करतात? पण आता बस्स, मी वैतागलोय या अन्यायाला. आता सहन होत नाही. त्यामुळे मी आणि माझे सर्व सहकारी पदाधिकारी शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र ठोकून माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहोत. असे अनिलदादा जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. इथून पुढे मला मानणारी सर्व जाती धर्मातील जनताच माझी नेता आणि सन्मानीय मनोजदादा जरांगे पाटील हाच पक्ष आहे. मी बीड विधानसभेचा अपक्ष उमेदवार असून माझा विजय निश्चित होणार आहे आणि मी विजयी झाल्यानंतर कोणत्याच पक्षात जाणार नाही व कोणत्याच पक्षातील नेत्याला मानणार नाही.असे शिवसेनेला वैतागलेल्या अनिलदादा यांनी पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले.
अनिलदादा जगताप यांनी आज दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्याला कार्यलयात पत्रकार परिषद घेत शिवसेनेकडून झालेल्या अन्यायाला वैतागून आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. याबरोबरच बीड शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्यांनी देखील आपला राजीनामा दिला असल्याचे अनिलदादा यांनी स्पष्ट केले.