बीड — उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अल्पसंख्याक समाजासाठी मदतीला धाऊन येणारे नेते आहेत. त्यांनी समाजाच्या योजना अंमलात आणल्या. राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत गेल्यामुळे अल्पसंख्याक समाजाची विरोधकांकडून दिशाभूल केली जात आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी धडपड करणारे युवा नेतृत्व डॉ.योगेश क्षीरसागर यांना एकदा संधी देऊन विधानसभेत पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष तथा आमदार इद्रिसजी नाईकवडी यांनी केले आहे.
बीडचे महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शहरात बुधवारी आयोजित केलेल्या अल्पसंख्याक मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर बीडचे महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर, राष्ट्रीय सरचिटणीस साजिद बेग काझी, राष्ट्रीय उपाध्यक्ष शेख शफीक, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इकबाल शेख, जिल्हा कार्याध्यक्ष रमिज खान, ज्येष्ठ माजी नगरसेवक सादेक उज्जमा, नसीर अन्सारी, जुनेद जहागीरदार, बागवान समाजाचे अध्यक्ष हशम बागवान, हाजी असीम बागवान, जकिरिया साहेब, इलियास मेंबर, युवा नेते इरफान बागवान, बिलाल भाई, सद्दाम भाई, जावेद खान, माजेद कुरेशी, साजेद जहागीरदार, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आ.इद्रिस नायकवडी म्हणाले की, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात अल्पसंख्याक समाजासाठी काम करता येत आहे. ते समाजासाठी शिक्षण, संरक्षण व आरक्षण हे महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असतात. सामान्य लोकांच्या हक्क व अधिकारांसाठी अजितदादा हे महायुतीत सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी महायुतीत सहभागी झाला असला तरी आपली विचारधारा सोडलेली नाही. भविष्यात सोडणारही नाही. मात्र राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत गेल्यामुळे अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल केली जात आहे. समाजाच्या मनात गैरसमज निर्माण केले जात आहे. अजितदादांनी मागच्या अर्थसंकल्पात मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळाचे ३० कोटीवरून ७०० कोटी वर नेले. प्रत्येक मदरसा लसाठी वर्षाला १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम समाज कुठल्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवतो. त्यामुळे लोकसभेत ज्या चुकीच्या अफवा पसरवल्या गेल्या, त्यामुळे चुकीच्या लोकांना मतदान केले. मात्र यावेळी विधानसभेला ही चूक करू नका. लोकसभेला काय घडले कसे घडले याचा विचार न करता विधानसभा निवडणुकीत मात्र अजितदादा, धनुभाऊ आणि डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन आ.इद्रिस नायकवडी यांनी केले.
माजी नगरसेवक जुनेद जहागीरदार यांचा प्रवेश
बीड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक जुनेद जहागीरदार यांच्यासह साजेद जहागीरदार, आमेर जहागीरदार, समीर शेख, इम्रान शेख यांच्यास कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत केले.
अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील : डॉ.योगेश क्षीरसागर
डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, अजितदादा यांनी वादा केल्याप्रमाणे विधानसभेत १० टक्के अल्पसंख्याक समाजाचे उमेदवार दिले. विधान परिषदेत २ पैकी १ आमदार इद्रिस नायकवडी यांच्या रूपाने अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व विधानपरिषदेत पाठवले. अल्पसंख्याक समाजासाठी मार्टी रिसर्च सेंटर मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला. क्षीरसागर परिवार हा मागील ५० वर्षांपासून लोकांची सेवा करत आहे. बीडमध्ये तकिया मस्जिदशेजारील जागा ही कब्रस्थानसाठी दिली. बालेपीर येथील इदगाह, पेठ बीड भागातील जुना इदगाह यासाठी कंपाऊंड वॉलसाठी निधी उपलब्ध केला. अल्पसंख्याक समाजासाठी बीडमध्ये ५ तर ग्रामीण भागात २ कोटी रुपये मंजूर करून आणले. नवगण, विनायक संस्थेत अल्पसंख्याक समाजाचे १० टक्के कर्मचारी आहेत. आपण सर्व जातीधर्माला सोबत घेऊन विकासकामे करत राहू, असा विश्वास देत २० तारखेला मोठ्या संख्येने मतदान करून निवडून देण्याचे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.