अंबाजोगाई तालुक्यात गाव भेट दौरा, परळीत आ.इंद्रिस नायकवडी यांच्या समवेत अल्पसंख्यांक मेळावा तर सायंकाळी व्यापारी संवाद मेळाव्याचे आयोजन
बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात घेणार सभा
परळी — परळी विधानसभेच्या लढतीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांच्यासह अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लढतीचे चित्र स्पष्ट होताच राज्याचे कृषिमंत्री तथा महायुतीचे परळी विधानसभेचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांचा परळी मतदारसंघात उद्यापासून प्रचाराचा झंजावात सुरू होत असून, उद्या सकाळच्या सत्रात अंबाजोगाई तालुक्यात गाव भेट दौरा, दुपारच्या सत्रात राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नाईकवडी यांच्या समवेत परळी शहरात अल्पसंख्यांक मेळावा तर सायंकाळी व्यापारी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे उद्या (दि.05) सकाळी आठ वाजता अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथून गाव भेट दौऱ्यात सुरुवात करतील. त्यानंतर सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीस ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहतील, पुढे सकाळी साडेनऊ वाजता दैठणा राडी व त्यानंतर मुडेगाव आणि राडी तांडा येथील ग्रामस्थांशी संवाद साधतील.
धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार इद्रीस नायकवडी यांच्या उपस्थितीत परळी शहरातील व्हीआयपी फंक्शन हॉल येथे दुपारी दोन वाजता अल्पसंख्यांक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यास अल्पसंख्याक समाज बांधव तसेच महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
सायंकाळी साडेपाच वाजता अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथे ग्रामस्थांशी संवाद साधून सायंकाळी आठ वाजता श्री मुंडे हे भागवत मंगल कार्यालय परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी मेळाव्यास उपस्थित राहणार असून या मेळाव्यास परळी शहरासह तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे यांनी केले आहे.
दरम्यान धनंजय मुंडे हे स्वतःच्या परळी विधानसभा मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार असून राज्यभरातही धनंजय मुंडे यांच्या सभांना प्रचंड मागणी आहे. त्या सर्व ठिकाणी धनंजय मुंडे हे सभा घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.