जालना — राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होताच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला आहे.
आता तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
निवडणूक जाहीर होताच जरांगेंनी माध्यमांशी बोलताना मराठा समाजाला आवाहन केलं की, मराठ्यांनी १०० टक्के मतदान करावं, एकही मतदान वाया जाता कमा नये. कारण आता अशी वेळच आली आहे. त्यांना (भाजप) आपल्याला संपवायचं आहे. विधासभेसाठी आता वेगानं आपल्याला ताकद दाखवायची आहे.मागण्या मान्य करायच्या की नाही हे तुमच्या हातात होतं कारण तुम्ही सत्तेत होतात. पण आता मतं द्यायची की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे. आमची लेकरं भिकारी बनवण्यासाठी मी सर्व शक्ती लावली. आमची लेकरं सत्तेत बसली नाही पाहिजेत यासाठी पूर्ण सत्तेचा तुम्ही गैरवापर केला. पण आता तुम्हाला खुर्तीवर बसून द्यायचं की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे. तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसत नाही आणि आताही बसत नाही. त्यांच्या १७ पिढ्या आल्या तरी या महाराष्ट्रात मराठ्यांना बाजुला ठेवून ते कधीच सत्तेत येऊ शकत नाही.
कारण इथं प्रश्न नुसता मराठ्यांचा नाही. इथं प्रश्न मुस्लिमांचा गोरगरीब दलितांचा आहे. विशेष म्हणजे इथं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तसंच इथं अठरापगड जातीचे लोक आहेत इथं गोरगरीब ओबीसींचा, धनगरांचा प्रश्न आहे.
माझी हात जोडून मराठ्यांना विनंती आहे की आता आपल्या समाजाला तुम्ही बळ आणि शक्ती द्यायचं काम करा. आत्तापर्यंत तुम्ही सभेला जाऊन करोडोची ताकद दाखवली. यावेळी १०० टक्के मराठ्यांचं मतदान झालं पाहिजे. एकाही मराठ्याचं मतदान घरी राहता कामा नये, एकही मतदान वाया जाता कामा नये, कारण शेवटी अस्तित्वाची लढाई तुमच्या मुलांची आहे, अशा शब्दांत मराठा समाजाला त्यांनी आवाहन केलं आहे.