नवी दिल्ली — निवडणूक आयोगाने आज 15ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. अनेक दिवसांपासून या निवडणूकांच्या तारखांची सर्व राजकीय पक्षांकडून वाट पाहिली जात होती.
दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा करण्यात आले आहे.
यादरम्यान निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला. तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्ह फ्रीज करणार का? कारण तशी अशी शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आली होती.
यावर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 2 मागण्या केल्या होत्या, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लहान आहे ते मोठं करण्याची पहिली मागणी त्यांनी केली होती. दुसरी मागणी त्यांनी पिपाणी हे चिन्ह फ्रीज करण्याची केली होती. पहिली मागणी आम्ही मान्य केली आहे. आम्ही त्यांना लिखित स्वरूपात विचारल होतं की तुमचं चिन्ह कसं असाव ते सांगा.. त्यांनी दिलेल्या आकारातील पाहिला आकार आम्ही मान्य केला आहे. पिपाणी हे चिन्ह पूर्ण वेगळं आहे… त्याला आम्ही हात लावला नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.