मुंबई — राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरू आहे.
शनिवारी रात्री म्हणजेच दसऱ्याच्या रात्री ही गोळीबाराची घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालया समोरच शनिवारी रात्री सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची माहिती समोर येत आहे. करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या हत्येच्या तपासासाठी जवळपास पाच ते सहा पथक गुन्हे शाखेकडून तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर हा हल्ला कोणी केला असेल, यामागे कारण काय आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. एसआरएच्या प्रकल्पासंबंधीच्या कथित वादामुळे त्यांची हत्या झाली असावी असाही अनेकांचा दावा होता. मात्र, आता लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. हिंदी भाषेतील पोस्ट टाकून बिश्नोई गँगने ही हत्या आम्ही केल्याचं म्हटलं आहे.
आम्हाला सलमान खानसोबत कोणतेही युद्ध नको होते, पण बाबा सिद्दीकींच्या हत्येचे कारण त्यांचे दाऊद इब्राहिम यांच्याशी असलेले संबंध होते. बाबा सिद्दीकी यांची कथित शालीनता हा निव्वळ भ्रम आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिम सोबत मकोका कायद्यातही त्याचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. सलमान खान आणि दाऊदच्या टोळीला जो कोणी मदत करेल त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असा दावा बिश्नोई गँगने केला आहे.