छत्रपती संभाजी नगर — परळीतील मरळवाडी चे सरपंच बापूराव आंधळे खून प्रकरणातील सहा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस जी मेहरे यांनी जामीन मंजूर केला आहे.
गाजलेल्या या बहुचर्चित खून प्रकरणी ग्यानबा उर्फ गोट्या गिते यांच्या फिर्यादीवरुन परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीत म्हटले होते की, 29 जुन 2024 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आरोपी महादेव गिते यांच्या घरासमोर बापुराव आंधळे यांना पैसे घेण्यासाठी बोलावले होते.
त्यानंतर आरोपी शशिकांत उर्फ बबन गिते व इतरांनी कट रचून बापुराव आंधळे याचा गोळया घालून खुन केला.त्याचप्रमाणे फिर्यादी ग्यानबा गिते यांच्यावरही गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरुध्द कलम 302, 307, 120 (ब), 201 भारतीय दंड विधान अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात सहा आरोपींना अटक करण्यात आली होती.
या सहा आरोपींचा जामीन अर्ज अंबाजोगाई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यातील पाच आरोपींनी ॲड. सुदर्शन जी. साळुंके यांच्यामार्फत तर एकाने ॲड. पी. पी. मोरे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. ॲड. साळुंके यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना आरोपींना केवळ राजकीय कारणास्तव अटक केल्याचे सांगीतले.तर न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे की, सरकार पक्षातर्फे आरोपी विरुध्द केलेले आरोप अविश्वसनीय आहेत. अर्जदार आरोपी हे प्रत्यक्ष मारेकरी नाहीत. गुन्ह्याचा तपास पुर्ण झालेला असून आरोपी हे जामीनावर सोडण्यास पात्र आहेत. सुनावणी नंतर न्यायालयाने आसाराम गव्हाणे, मयुर कदम, अनिल सोनटक्के, ज्योतीराम औताडे, रोहित गायकवाड, रजतकुमार जेधे या सहा जणांचा प्रत्येकी 50 हजाराच्या जात मुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात आरोपींतर्फे ॲड. सुदर्शन जी. साळुंके व ॲड. पी.पी. मोरे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील ॲड. ए. बी. गिरासे यांनी काम पाहिले. बीड जिल्ह्यातील परळीच्या बॅंक काँलनीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गिते याचाही समावेश होता. गिते हा खून झाल्यापासून अद्याप फरार आहे. सरपंच बापू आंधळे यांची आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.