अमरावती — लाडकी बहीण सारख्या योजना जनतेच्या, महिलांच्या हितासाठी राबवल्या जात नसून राज्यकर्त्यां च्या स्वार्थासाठी राबवल्या जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
लाडकी बहिण योजनेवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी नेत्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही भर पडली आहे. अशा योजना म्हणजे राज्याला खड्ड्यात घालण्याचे उद्योग आहेत.
त्यामुळे जानेवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही तिजोरी पैसे शिल्लक राहणार नाहीत, अशा शब्दात ठाकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर कठोर टीका केली.
समाजातील कोणताही घटक काहीही फुकट मागत नाही. महिलांना अशा प्रकारे पैसे वाटण्यापेक्षा राज्यात उद्योगधंदे आणा. उत्पन्नाची साधने वाढवा, असा सल्लाही ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. लाडकी बहीण सारख्या योजना जनतेच्या, महिलांच्या हितासाठी राबवल्या जात नसून राज्यकर्त्यां च्या स्वार्थासाठी राबवल्या जात असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत भाजपला पर्यायाने महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने मैदानात उतरण्याचे निश्चित केले आहे. त्या दृष्टीने दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांनी येथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरे यांच्या टीकेवर पलटवार केला आहे. सरकारच्या कामामुळे ज्यांच्या पोटात दुखते असेच नेते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारख्या महत्वकांक्षी योजनांवर टीका करत असतात, असे पटेल म्हणाले.