प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना
बीड — बीड मतदारसंघात जलसंधारण, जलसंपदा, जलजीवन मिशन विभागाशी संबंधित कामांच्या बाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी सदरील विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या. तसेच फुलसांगवी येथील आंदोलनच्या अनुषंगाने जिल्हा जलसंधारण अधिकारी व जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निर्देश दिले.
बीड मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. परंतु ही कामे अनेक ठिकाणी प्रलंबित आहेत. तसेच मतदारसंघात जलसंधारण, जलसंपदा विभाग यांच्याशी संबंधित नागरीकांच्या काही अडचणी आणि मागण्या होत्या याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.२४) रोजी बीडमध्ये शासकीय विश्रामगृह येथे जलसंधारण, जलसंपदा, पाटबंधारे विभाग, जलजीवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी नागरिकांच्या समोरच अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यासोबतच बीड मतदारसंघ क्षेत्रात शिरूर-कासार तालुक्यातील फुलसांगवी व इतर गावातील ग्रामस्थांचे काही दिवसांपूर्वी जलसंधारण विभागाशी संबंधित कामांच्या अनुषंगाने आंदोलन सुरू होते. या आंदोलनातील मागण्या मार्गी लावण्यासाठी आ.क्षीरसागर यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी व जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प कार्यकारी अभियंता तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना सूचना दिल्या. या बैठकीसाठी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित नागरिक, शेतकरी बांधव उपस्थित होते.