चौसाळा — प्रशासनाला लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने बीड चे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी चौसाळा महसूल मंडळाची आढावा बैठक आज घेतली. समाजातील सर्व घटकांशी चर्चा करून प्रश्न समजावून घेत सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना लोकाभिमुख प्रशासन राबवण्यासाठी जनतेचे प्रश्न समजून घ्या. त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील रहा, नागरिकांची काम प्रलंबित ठेवू नका अशा सूचना यावेळी दिल्या.
चौसाळा महसूल मंडळातील जनतेच्या अडीअडचणी जनतेत गेल्याशिवाय कळणार नाहीत. प्रश्न कळल्याशिवाय लोकाभिमुख प्रशासन राबवता येणार नाही. हे लक्षात घेऊन चौसाळा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जनतेसह सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी बोलवली होती. यावेळी बैठकीत ग्रामपंचायत तर्फे तहसीलदार शेळके यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीत शेतकऱ्यांसह, मजूर, वीज,अनुदान प्रश्न,श्रावण बाळ योजना, ई.के वाय सी, स्वस्त धान्य, मतदार नोंदणी, ई पिक पाहणी, अतिवृष्टी अनुदान, यासारख्या अनेक प्रश्नांची माहिती समाजातील सर्व स्तरातील नागरिकांशी चर्चा करून घेतली. नागरिकांची समस्या जाणून घेत. तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना तहसीलदार शेळके यांनी दिल्या.अधिकारी कर्मचारी यांच्यात समोरासमोर चर्चा व निराकरण झाल्यामुळे लोकाभिमुख प्रशासन कसं असतं याची चुणूक आज चौसाळकरांना पाहायला मिळाली.
यावेळी मंडळ अधिकारी जायेभाये, तलाठी शिवराम येवले, तलाठी कमलेश निर्मळ, तलाठी निशा खांडेकर, तलाठी उषा राठोड, स्वस्त धान्य दुकानदार, मंडळ कृषी कार्यालयातील कर्मचारी, शिक्षक, चौसाळा ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, पत्रकार व चौसाळा महसूल मंडळातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.