Home राज्य अंतरवाली सराटीत जरांगे आंदोलनाच्या छायेत ओबीसींचे प्रतिआंदोलन; आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला इशारा

अंतरवाली सराटीत जरांगे आंदोलनाच्या छायेत ओबीसींचे प्रतिआंदोलन; आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला इशारा

0
7

जालना —  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता त्याच ठिकाणी ओबीसी समाजानेही प्रतिआंदोलन सुरू केले आहे. अंतरवालीतील सोनिया नगर येथे अॅड. मंगेश ससाणे, प्रा. विठ्ठल तळेकर, सतीश कुलाल, बाबासाहेब बटुळे यांच्यासह सहकाऱ्यांनी रविवारी उपोषणाला सुरुवात केली.

ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण आणि संविधानिक आरक्षण व्यवस्था कायम ठेवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे अॅड. मंगेश ससाणे यांनी स्पष्ट केले. जरांगे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सरकारवर दबाव टाकला जात आहे

अॅड. ससाणे म्हणाले की, मराठा समाजाला आतापर्यंत २२ लाख दाखले देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यावरही त्यांनी टीका केली. ओबीसी समाज आपल्या हक्कांसाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

नोडल अधिकारी नेमण्याच्या निर्णयावरही त्यांनी आक्षेप घेतला. नोडल अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप करत, सरकारच्या या भूमिकेविरोधात ओबीसी समाजाची भूमिका तीव्र राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एका समाजाला स्पेशल ट्रीटमेंट का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ससाणे यांनी निशाणा साधला. एका समाजाला सरकारकडून विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एका व्यक्तीच्या भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्र वेठीस धरला जात असल्याचेही ते म्हणाले.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ‘मागेल त्याला कुणबी दाखला देणार’ या कथित वक्तव्याचा संदर्भ देत ससाणे यांनी ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्यासाठी काही मंत्री षड्यंत्र रचत असल्याचा आरोप केला. मात्र, ओबीसी समाज आपल्या मागण्या संविधानिक आणि लोकशाही मार्गाने मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनस्थळाजवळच प्रतिआंदोलन; वातावरण तापण्याची शक्यता

अंतरवाली सराटीतून ये-जा करणाऱ्या मंत्र्यांवरही ससाणे यांनी टीका केली. सरकारला इशारा देताना त्यांनी मंत्र्यांना या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल, असे म्हटले.

दरम्यान, आरक्षणाच्या प्रश्नावर ओबीसी समाजातील काही तरुणांनी आत्महत्या केल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील पात्र व्यक्तींना सरकारी नोकरी देण्याची मागणीही करण्यात आली.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळापासून काही अंतरावरच ओबीसी समाजाने सुरू केलेल्या या आंदोलनामुळे अंतरवाली सराटीतील आरक्षणाचा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारसमोर मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here