Home क्राईम आष्टीत भेसळयुक्त दूध प्रकरणाला नवे वळण; व्हे पावडर पुरवठ्याच्या आरोपावरून दिलीप हंबर्डे...

आष्टीत भेसळयुक्त दूध प्रकरणाला नवे वळण; व्हे पावडर पुरवठ्याच्या आरोपावरून दिलीप हंबर्डे अटकेत

0
8

आष्टी —  भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरच्या अवैध वाहतूक व पुरवठ्याच्या प्रकरणात आष्टी पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. दिलीप जानदेव हंबर्डे याला ३१ ऑगस्ट रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबर २०२६पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे व्हे पावडरचा पुरवठा नेमका कुठे आणि कोणासाठी केला जात होता, याचा तपास आता अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे.

आष्टी-जामगाव रोडवरील नक्षत्र लॉन्ससमोर व्हे पावडरची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून MH-13 CU-4141 क्रमांकाच्या पिकअप वाहनाची तपासणी केली. वाहनात २५ किलो वजनाच्या ४७ गोण्या व्हे पावडर आढळून आल्या.

चौकशीदरम्यान वाहनचालकाने आष्टी शहरातील एका ठिकाणी यापूर्वीच २५ गोण्यांचा पुरवठा केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकत आणखी २५ गोण्या व्हे पावडर जप्त केल्या. या कारवाईत एकूण ७२ गोण्या जप्त करण्यात आल्या असून, मुद्देमालाची अंदाजे किंमत २ लाख ६९ हजार ७०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी बीड येथील अन्न सुरक्षा अधिकारी अजय भगवान गाडे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत एका आरोपीने दिलीप जानदेव हंबर्डे यांचे नाव घेतल्याचे समोर आले. हंबर्डे यांच्या सांगण्यावरून व्हे पावडरच्या पुरवठ्याचे काम सुरू असल्याचा जबाब आरोपीने दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हंबर्डे यांना अटक केली.

आता पोलिसांकडून व्हे पावडरचा नेमका वापर कुठे केला जात होता, त्याचा पुरवठा कोणाला केला जात होता, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि या पावडरचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करून बाजारात विकले जात होते का, याचा तपास केला जात आहे.

या प्रकरणामुळे आष्टी तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करण्याच्या संभाव्य साखळीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या तपासातून या प्रकरणामागील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here