वडीगोद्री — धुळे-सोलापूर महामार्गावरील असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या मागील बाजूचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी बँकेत शिरून लुटण्याचा प्रयत्न केला. शनिवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. मात्र, बँकेतील मुख्य लॉकर सुरक्षित असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याला रुमाल बांधून तो निष्क्रिय करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.
चोरीचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी सकाळी सुमारे 11 वाजता उघडकीस आली. बँकेत चोरी झाल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली.बँकेकडे येताना व जाताना पाच चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, यामध्ये दोन बुरखाधारी चोरटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेच्या मागील बाजूला असलेल्या ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल परिसरातील कॅमेऱ्यातही हे चोरटे कैद झाले असून, शाळेजवळील शेतात मोठा गॅस सिलेंडर, एक फोटो गॅस टाकी आणि एक बॅग आढळून आली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमद्वारे पुरावे गोळा केले जात आहेत. या घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती
या घटनेमुळे वडीगोद्री परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास चालू आहे.

