नवी दिल्ली – 2008 च्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा अमेरिकेतून प्रत्यर्पणानंतर भारतात दाखल झाला आहे.एनआयएच्या पथकाने तहव्वूरला अमेरिकेतून दिल्लीला एका विशेष विमानाने आणले.
https://x.com/ani_digital/status/1910350519853342772
दरम्यान, भारतात दाखल झालेल्या तहव्वुर राणाचा एक फोटो समोर आला आहे. राणाचा हा पाठमोरा फोटो असून, यात त्याचे पांढरे झालेले केस आणि अंगावर चॉकलेटी रंगाचे कपडे दिसत आहेत.
पटियाला हाऊस कोर्टाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण केल्यानंतर एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी न्यायालय परिसरात सीआयएसएफसह निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
राणाला तिहार तुरुंगात ठेवले जाणार
तहव्वुर राणाला तिहार तुरुंग ठेवले जाणार आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, राणाला तुरुंगात उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. राणावर डेव्हिड कोलमन हेडली, लष्कर-ए-तैयबा (एलईटी), हरकत-उल-जिहादी इस्लामी (एचयूजी) आणि इतर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मदतीने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
विशेष एनआयए न्यायालयात खटला चालणार
दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. आता या प्रकरणाची सुनावणी दिल्लीत होणार असल्याने, राणाला मुंबईत पाठवले जाणार नाही. या हाय-प्रोफाइल प्रकरणात भारताच्या वतीने वरिष्ठ वकील दयान कृष्णन हे खटला चालवतील. त्यांच्यासोबत विशेष सरकारी वकील (एसपीपी) नरेंद्र मान हे कायदेशीर कार्यवाहीचे नेतृत्व करतील.
पाकिस्तानची हात झटकले
तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर त्याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे पाकिस्तानने गुरुवारी स्पष्ट केले. पाकिस्तानने म्हटले की, तहव्वुर राणा हा कॅनेडियन नागरिक आहे. त्याने जवळजवळ दोन दशकांपासून त्याचे पाकिस्तानी कागदपत्रे अपडेट केलेली नाहीत.

