धारूर — शिक्षण विभागाकडून विशेष खबरदारी घेतल्यानंतरही दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर जिल्ह्यातील धारुर येथील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रातून शनिवारी (दि. १ मार्च) सकाळी फुटला.पेपर सुरू झाल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता दोघांनी एका हॉलच्या खिडकीतून पेपर घेऊन पलायन केले. दरम्यान, पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी अतिशय शिताफीने अवघ्या अर्ध्या तासात पेपर फोडणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पेपर जप्त केला आहे. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी लागलीच तपास सुरू केला. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच घेऊन पळालेला इंग्रजी विषयाचा पेपर त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केला. दरम्यान, पेपरफुटीमुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी पेपर फोडणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. तसेच या प्रकाराची शिक्षण विभागातील वरिष्ठांना माहिती दिली असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रातून दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर घेऊन दोघे पळाले होते. त्या दोन तरुणांना आम्ही ताब्यात घेतले आहे. या पाठीमागे आणखीन कोण आहे? पेपर फोडणारी साखळी आहे का? या दृष्टिकोनातून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी दिली आहे.

