केज — तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची मालिका सुरू झाली असून वडिलांना शेतात जेवण देऊन घरी परतणाऱ्या अकरा वर्षीय मुलीचं दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं. मात्र या मुलीने हिम्मत दाखवल्याने तिला रस्त्यातच सोडून अपहरण कर्त्यांना पळून जावं लागलं. ही घटना जीवाची वाडी येथे घडली
जीवाचीवाडी येथील ११ वर्षीय मुलगी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारात शेतात वडिलांना जेवण देऊन पायी घराकडे परत येत होती. रस्त्यात तिला एकटी जात असल्याचे पाहून दुचाकीवरून आलेल्या अनोळखी इसमाने तिला अडवले. “तुझ्या वडिलांकडे माझे पैसे आहेत, मला त्यांना भेटायचे आहे,” असे खोटे सांगून मुलीला विश्वासात घेतले. या निष्पाप मुलीने त्याला वडिल असलेल्या शेतात घेऊन जाण्याचे कबूल केले. याच संधीचा फायदा घेऊन त्या विकृत व्यक्तीने मुलीच्या नाकासमोर पावडरचा वास देऊन तिचे तोंड दाबले आणि तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून तिला अपहरण कर्त्याने जीवाची वाडी येथून केजच्या दिशेने घेऊन निघाला. सुमारे २५ किमी प्रवासानंतर, केज जवळ असलेल्या कानडी रोड लगतच्या वीटभट्टीजवळ आल्यावर या हिंमतवान मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मुलगी ओरडत असल्याचे पाहताच, घाबरलेल्या अपहरणकर्त्याने तिला रस्त्यातच सोडून दुचाकीवरून पोबारा केला. अपहरण कर्त्याच्या तावडीतून आरडा ओरडा केल्यामुळे सुटलेली मुलगी पायी चालत केज बस स्थानकावर पोहोचली. तिथे तिची भेट एका नातेवाईक महिलेशी झाली. त्यांनी तातडीने मुलीच्या वडिलांना फोन करून माहिती दिली. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात अपहरण कर्त्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी लहूरी आणि कानडीमाळी मार्गे केजला आल्यामुळे येवता चौक, लहूरी आणि कानडीमाळी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचा दुचाकी नंबर व ते कैद झाले असून त्या आधारे आरोपीला लवकरच जेरबंद करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

