बीड — स्व. केशरबाई क्षीरसागर यांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेला डाॅ. योगेश क्षीरसागर यांनी मूठ माती देत भाजपची कास धरली. क्षीरसागर कुटुंबाच्या इतिहासाचा विचार केला तर राजकीय तडजोड म्हणून देखील काकूंच्या विचारांशी फारकत आज पर्यंत कोणीच घेण्याचं धाडस केलं नव्हतं. त्यामुळेच बीड करांनी या घराण्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. पण त्याच विचारांना तिलांजली देणाऱ्या डॉ.योगेश क्षीरसागरांच्या मतलबी राजकारणाला जनता थारा देत नसल्याचं चित्र सध्यातरी न प निवडणुकीत दिसत आहे.
स्व. केशरबाई क्षीरसागर यांनी कधीच जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं नाही. विरोधकांनाही आपलंसं करत बीडच्या विकासाला चालना दिली. अगदी त्याच धर्मनिरपेक्ष जात विरहित राजकारणाचा वसा पुढच्या पिढीने देखील घेतला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत डॉ.भारतभूषण क्षीरसागर असोत की जयदत्त क्षीरसागर असोत. पुढच्या पिढीत संदीप क्षीरसागर असोत यांनी कधीच मतलबी राजकारणासाठी स्व. काकूंच्या विचारधारेशी तडजोड अत्यंत बिकट परिस्थितीत देखील कधीच केली नाही. त्याच विचारधारेवर चालत असताना जयदत्त क्षीरसागर यांनी देखील कधीच विशिष्ट धर्माची विचारधारा बाळगणाऱ्या पक्षाचा हात स्वतःच्या सोयीसाठी धरला नाही. त्यामुळेच जयदत्त क्षीरसागर यांनी जातीयवादी पक्षात प्रवेश करण्याची भूमिका घेतली नाही. त्यामुळेच आजही बीडच्या राजकारणामध्ये त्यांची ताकद पूर्वी इतकीच टिकून आहे.डाॅ. भारतभूषण क्षीरसागर आणि नगरपालिका निवडणूक इतकं समीकरण पक्क होतं की “अध्यक्ष” म्हणून कायम त्यांचा गौरव बीडच्या जनतेने केला. त्यांच्याही विचारधारेपासून योगेश क्षीरसागर दूर गेले.संदीप क्षीरसागर देखील तोच राजकीय वसा घेऊन पुढे चालत आहेत. काकूंच्या विचार धारेवरच चालायचं कुठल्याही परिस्थितीत तडजोड करायची नाही हाच विचार स्वीकारत संदीप क्षीरसागरांनी कुटुंबातील वादाने तोंड काढल्यानंतर देखील मागच्या न.प. निवडणुकीत काकू – नाना विकास आघाडी स्थापन करून चांगलं यश मिळवलं. त्याचाच फायदा पुढे त्यांना कायम होत आला. त्यामुळेच प्रत्येक समस्येचे समाधान “बंगला”हेच आहे. असं सांगितलं जायचं. प्रत्येक जाती धर्मातील लोक हक्काने बंगल्यावर जाऊन आपली कैफियत मांडत काम करावंच लागेल म्हणून भांडायला देखील मागेपुढे पाहत नसल्याचं आज पर्यंतच चित्र कायम राहिलं गेलं.
मात्र जनतेत निवडणुकीपुरतचं मिसळायचं काकूंच्या नावावर मत मागायची त्यानंतर जनतेला विसरून जायचं. हा फंडा कायम ठेवत डॉ. योगेश क्षीरसागर यांनी जनतेच्या तोंडाला आजपर्यंत फक्त पानच पुसली. योगेश क्षीरसागर कडून आश्वासनांची खैरातच जनतेच्या वाट्याला आली. आता तर जातीयवादी चेहऱ्याच्या पक्षाशी हात मिळवणी करत बीडच्या जनतेला स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपाच्या दावणीला बांधण्याच काम डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सुरू केलं आहे. त्यांनाही राष्ट्रवादी अजित पवार गटाशी जमेनासं झाल्यानंतर या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांच्यासारखीच आघाडी करता आली असती.जनतेला काकूंच्या विचारधारेवर मत मागता आली असती. त्यात मोठ्या प्रमाणावर देखील यश निश्चित मिळालं असतं. मात्र स्वार्थाची पट्टी डोळ्यावर बांधली की कुटुंबाच्या वारसाने चालत आलेल्या विचारांची राख रांगोळी होते आणि तिथेच अध:पतनाला सुरुवात होते हा आजपर्यंतचा इतिहास आहे. मुस्लिम,दलित, मराठा इतर छोट्या छोट्या जाती धर्माच्या लोकांनी भाजपचा झेंडा हातात घेतलेल्या योगेश क्षीरसागर यांना का साथ द्यावी? जे स्वतःच्या कुटुंबाने जपलेल्या संस्कार, विचारधारेला मूठ माती स्वार्थासाठी देऊ शकतात ते प्रसंगी जनतेला मुठ माती द्यायला का मागे पुढे पाहणार नाहीत? असा प्रश्न बीडच्या जनतेतून विचारला जात आहे. जे काकूंचे ,डाॅ. भारत भूषण क्षीरसागर यांच्या विचारांचे झाले नाहीत ते बीडकरांचे कसे होणार? उद्या योगेश क्षीरसागर ज्या पक्षात गेले आहेत त्या पक्षाच्या विचारधारेनूरुप गरळ ओकणार नाहीत याची शाश्वती काय? असे एक ना अनेक प्रश्न योगेश क्षीरसागरांबाबत बीडच्या जनतेच्या डोक्यात घोंगावत आहेत.बीडकर स्वार्थी राजकारणाला नक्कीच बळी पडणार नाहीत असं सध्याचं तरी चित्र बीड नगरपालिकेत पाहायला मिळत आहे.

