गजानन सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा संत-महंतांच्या हस्ते शुभारंभ
बीड – गजानन सहकारी साखर कारखान्याच्या, सन २०२५-२६ चा मोळीपूजन आणि गळीत हंगामाचा रविवारी (दि.९) रोजी शुभारंभ झाला. यावेळी, स्वहितापेक्षा शेतकऱ्यांचे हित साधणे महत्वाचे असून हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून १० वर्षांपासून बंद असलेला गजानन सहकारी साखर कारखाना अथक प्रयत्नांनी सुरू केला. परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी मी आणि गजानन साखर कारखाना कायम कटिबद्ध असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

श्री. गजानन सहकारी साखर कारखानाच्या मोळीपूजन व गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि.९) रोजी संत-महंतांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प.शिवाजी महाराज, मंगलमूर्ती देवस्थान येथील ह.भ.प.अमृताश्रमजी महाराज, श्रीक्षेत्र ढेकळे महाराज संस्थान बेलखंडी पाटोदा येथील ह.भ.प. भक्तीदास महाराज, साधकाश्रम तिप्पटवाडी येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज आदी संत-महंत उपस्थित होते. यासोबतच माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह अनेक मान्यवर आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

