येवला — कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरांनी गेल्या दोन महिन्यांत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. १ डिसेंबर २०२५ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत सोयाबीनच्या सरासरी बाजारभावात तब्बल ३५.५६ टक्क्यांची वाढ झाली असून, त्यामुळे दीर्घकाळ कमी दरांमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक गणित जुळवतांना मेटाकुटीला येत होते.
उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र डिसेंबरनंतर हळूहळू परिस्थितीत बदल दिसू लागला आणि जानेवारी महिन्यात दरांनी वेग घेतला.
डिसेंबरच्या सुरुवातीला येवला बाजार समितीत सोयाबीनचा सरासरी दर प्रतिक्विंटल सुमारे ४,३०० रुपये होता. त्या तुलनेत २९ जानेवारी २०२६ रोजी हा दर थेट ५,८२९ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या ६० दिवसांत प्रतिक्विंटल तब्बल १,५२९ रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.२९ जानेवारी रोजी सोयाबीनला प्रतिक्विंटल ५,८५१ रुपये इतका उच्चांकी कमाल दर मिळाल्याची नोंद आहे. डिसेंबर महिन्यात बाजारात दर तुलनेने स्थिर होते. मात्र जानेवारीत जागतिक बाजारातील घडामोडी, सोयाबीनची वाढलेली मागणी आणि मर्यादित उपलब्धता यांचा परिणाम थेट स्थानिक बाजारावर दिसून आला.
महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाने सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ७,०७७ रुपये दराची शिफारस केली आहे. सध्याचा बाजारभाव या शिफारस केलेल्या दराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे. जर ही वाढ टिकून राहिली, तर येत्या काळात शेतकऱ्यांना आणखी चांगला दर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरातील टप्प्याटप्प्याने झालेली वाढ पाहिली असता, १ डिसेंबर २०२५ रोजी किमान ४,००० रुपये, कमाल ४,४४१ रुपये आणि सरासरी ४,३०० रुपये दर होता. १ जानेवारी २०२६ रोजी सरासरी दर ४,६०० रुपयांपर्यंत पोहोचला. २४ जानेवारीला सरासरी दर ५,३७५ रुपये झाला, तर २९ जानेवारीला तो ५,८२९ रुपयांवर स्थिरावला




