मुंबई — अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पीक उध्वस्त झालेली असताना थोड्याफार पिकलेल्या सोयाबीनला देखील भाव मिळेनासा झाल्याने खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत होती. दरम्यान शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सोयाबीन खरेदीविषयी माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार राज्यात कापूस आणि सोयाबीनची खरेदी सुरु करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ३० ऑक्टोबरपासून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर हमीभावाने खरेदी सुरु होईल. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने कमी भावात व्यापाऱ्यांना सोयाबीन विकू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच जे शेतकरी हमीभावाने आले सोयाबीन विकू इच्छितात त्या सर्वांचे सोयाबीन खरेदी केले जाणार आहे. कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. राज्य सरकार, पणन विभाग, नाफेड आणि केंद्र सरकारने राज्यात खरेदीचे जाळे निर्माण केले आहे.सरकार शेतकऱ्याच्या सर्व सोयाबीनची खरेदी करेल. व्यापारी हमीभावाने खरेदी करणार असेल तरच शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल द्यावा. अन्यथा सरकारी खरेदी केंद्रांवर हमीभावाने सोयाबीनची विक्री करावी,” असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

