हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी तत्काळ मुदतवाढ द्यावी
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह पणन मंत्र्यांशी आ.संदीप क्षीरसागरांचा पत्रव्यवहार
नाफेडकडे नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा विचार करण्याची मागणी
बीड — बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऐनवेळी आ.संदीप क्षीरसागर धावून आले आहेत. मतदारसंघासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या खरेदीसाठी नाफेडकडे नावनोंदणी केली, मात्र मुदत संपल्यानंतर आता ही खरेदी कधी होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असून शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी तत्काळ मुदतवाढी द्यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पणण मंत्री जयकुमार रावल व राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे. याबाबत लेखी पत्रही आ.क्षीरसागर यांनी दिले आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अन् त्यांच्या संवादातून लक्षात आलेल्या समस्या लक्षात घेवून आ.संदीप क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांच्या भावना पत्र लिहून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यापयंत पोहचवल्या आहेत. हंगाम २०२४-२५ मधील हमीभावाने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्यास सर्व शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी होवू शकते याकडे लक्ष वेधत आ.संदीप क्षीरसागर यांनी याबाबतच्या पत्रात नमूद केले आहे की, केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या संदर्भीय धोरणानुसार सुरूवातीला दि.३१ जानेवारी २०२५ पर्यंत त्यानंतर दि.६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सोयाबीन खरेदीच्या बाबतीत मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील नोंदणीधारक शेतकरी ४४ हजार ७०० च्या वर आहेत. त्यापैकी दि.६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत किमान २१ हजार शेतकरी बांधवांककडून सोयाबीन खरेदी झालेली आहे.
बीड मतदार संघासह जिल्ह्यातील किमान ४० टक्क्याच्यावर शेतकरी बांधवांची खरेदी अजूनही शिल्लक आहे. त्यामुळेच या सर्व शेतकरी बांधवांच्या सोयाबीनची खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी व त्यातून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी महत्वाची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. निवेदनातच्या प्रती राज्याचे मुख्य सचिव व अवर सचिवांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आ.संदीप क्षीरसागर यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न राज्य शासनापर्यंत पोहचवले आहेत. आता शासनाकडून मुदतवाढीचा निर्णय कधी होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

