बीड — माजलगाव मतदार संघाचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते आर टी देशमुख यांची गाडी लातूर औसा रस्त्यावरील बेलकुंडी गावाजवळ अपघातग्रस्त झाली. उपचारासाठी त्यांना लातूर येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचे निधन झाले.

माजलगाव चे माजी आमदार आर.टी.देशमुख हे सोमवारी गाडी क्रमांक एम एच 44 ए डी 27 97 ने लातूर औसा या मार्गावरून प्रवास करत होते. दुपारच्या वेळी बेलकुंड गावाजवळ गाडी आली असता रस्त्याच्या कडेला जमा झालेल्या पाण्यामुळे गाडी स्लीप होऊन चालकाचे नियंत्रण सुटले व रस्त्याच्या कडेला गाडीने पलटी मारली. यावेळी गाडीत त्यांच्यासोबत अंगरक्षक व चालक हे प्रवास करत होते. या रस्ता अपघातात तिघेही जखमी झाले. जखमी आर् टी. देशमुख यांना लातूर येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांनी केलेले संघटनात्मक कार्य मोलाचे ठरले पंचायत समिती सदस्य, प.स.सभापती, जि प सदस्य भाजपचे प्रदेश सरचिटणीस आदी पदावरही त्यांनी काम केले 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रकाश सोळंके यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत प्रकाश सोळंके यांचा पराभव करून त्यांनी पराभवाची परतफेड केली होती. राज्याच्या पंचायत राज समितीचे सदस्य देखील आर टी देशमुख आहेत. राजकारणातला सुसंस्कृत चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे, माजी आमदार विनायक मेटे यांच्यानंतर माजी आमदार आर टी देशमुख यांचे देखील रस्ता अपघातात निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून शोक कळा पसरली आहे.
परिवारातला सदस्य गमावला – धनंजय मुंडे
माझ्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत जिजा भाऊंचे एक अढळ स्थान आहे. मुंडे आणि देशमुख कुटुंबाचे पिढीजात नाते आहे. आज त्या नात्यातील आणखी एक छाया आम्हाला पोरके करून गेली. जिजा भाऊंच्या अकाली निधनाने आम्ही एक मार्गदर्शक नेतृत्वास मुकलो आहोत, त्याचबरोबर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
या दुःखद प्रसंगी मी संपूर्ण देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली…!

