पाटोदा — शिक्षण व सहकार क्षेत्रातील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे रामकृष्ण बांगर यांच्यासह त्यांचा मुलगा विजय बांगर, पत्नी सत्यभामा बांगर, मुख्याध्यापक आबासाहेब गोपाळघरे यांच्याविरुद्ध नोकरीसाठी रक्कम घेऊन फसवणूक,जातीवाचक शिवीगाळ धमकावणे, जिवे मारण्याचा प्रयत्न यासारखी कलम लावून बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणी रामकृष्ण बांगरसह चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी मंजूर केला. याप्रकरणी अमोल वाघमारे यांनी 11 नोव्हेंबर 2024 रोजी तक्रार दाखल केली आहे.
रामकृष्ण बांगर यांच्या संस्थेत नोकरी लावतो असे सांगून चार लाख रुपये घेतले. त्यानंतर सहा लाखांची मागणी रामकृष्ण बांगर यांनी केली . त्यानंतर नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे रामकृष्ण बांगर यांच्याकडे घेतलेले चार लाख परत द्यावेत अशी मागणी केली. यावेळी बांगर यांनी मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच बांगर यांच्या सहकाऱ्यांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 18 टक्के भाजलो असल्याचे वाघमारे यांनी तक्रारीत नमूद केले. खंडपीठात युक्तीवाद करताना विविध मुद्दे मांडण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणात सी-समरी अहवाल दिला आहे. रामकृष्ण बांगर यांच्याविरोधात कुभांड रचण्यात आले असून, त्यांचे व बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय वैर आहे. राजकीय वैर असल्याने आणि बांगर यांनी निवडणूक लढवू नये व त्या काळात अडसर ठरू नये, यासाठी 18 सप्टेंबर ते 11 नोव्हेंबर 2024 या काळात बांगर यांच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणात सुनावणीनंतर बांगर यांच्यासह चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. बांगर यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.

