Saturday, December 13, 2025

संदीप भैया, बजरंग बप्पा ची स्थिती अशी झाली; दुधीण बाय पसारली अन् मागचा सगळा ईसरली

बीड — ज्या बालाघाटाने निवडणुकीतून झोळीत भरभरून मतांचे दान दिलं. त्याच बालाघाटावरील शेतकरी पवन ऊर्जा कंपन्यांच्या जुलमी वरवंट्याखाली भरडली जात असताना, बजरंग सोनवणेंच्या मात्र विमानतळाच्या गप्पा सुरू आहेत. हीच स्थिती संदीप क्षीरसागरांची देखील आहे. यांच्या कारभाराचा विचार केला तर “दुधीणबाय पसरली अन मागचा सगळा ईसरली” असं म्हणत पश्चाताप करण्याची वेळ जनतेवर येऊन ठेपली आहे.
स्वतःच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाची काळोखी फासली गेलेली असताना बालाघाटाने लोकसभा निवडणुकीत इतिहास घडवला. बजरंग सोनवणें च्या रूपाने “नवा गडी नव राज्य“असं म्हणत स्वतःच्या भवितव्याचा शेतकरी मतदारांनी जुगार खेळला. मात्र नेहमीप्रमाणे हा जुगार सुद्धा हरण्याची वेळ नियतीने आणून ठेवली आहे. बजरंग सोनवणें च्या झोळीत बालाघाटावरील जनतेने मतदानाच्या रूपाने भरभरून दान टाकले. त्याच दानाच्या जोरावर बजरंग सोनवणे सर्वोच्च संसदेत जाऊन बसले. परिवर्तनाची “आशा” निराशेत पुन्हा एकदा परिवर्तित झाली.पवन ऊर्जा कंपन्यांनी बालाघाटावर नंगा नाच सुरू केला आहे. गुंडांसोबतच पोलीस बळाचा वापर करून शेतकरी राजाला त्राही माम् म्हणण्याची वेळ कंपन्यांनी आणून ठेवली आहे. रजाकारी राजवट काय होती कशी होती यासाठी इतिहासाची पान वाचण्याची गरज पडणार नाही तिच स्थिती पवन ऊर्जा कंपन्यांनी निर्माण केली आहे. मात्र लोकशाहीत निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देखील अशा घटनांकडे दुर्लक्ष करून स्वतःला “शेतकरी पुत्र “म्हणून घेत शेतकऱ्यांना मान खाली घालायला लावण्याची वेळ आणताना दिसून येत आहेत. निवडणूक काळात मारलेल्या गप्पा नुसत्या राव रंभाच्या ठरल्या. विमानतळाच्या गप्पा मारून मला बीडच्या विकासाची किती काळजी आहे याचा डांगोरा पिटला जात आहे. मात्र शेतकरी पवन ऊर्जा कंपन्यांच्या कारभारामुळे किती गलीतगात्र झाला आहे. हे पाहायला बजरंग सोनवणें ला वेळ मिळाला नाही. शेतकऱ्याचं हेच दुर्दैव आहे की त्यांचीच मुलं उच्च पदावर बसली की शेतकऱ्यांच्याच मुंडक्यावर पाय कसे द्यायचे याचीच चिंता त्यालाही लागते. पवन ऊर्जा कंपन्या अधिग्रहित क्षेत्रापेक्षा अधिकच क्षेत्र अतिक्रमण करून बळकावत आहेत. मावेजा न देता किंवा शेतकऱ्याची परवानगी न घेता. उभ्या पिकातून रस्ते तयार करू लागले. गुंडांसोबत पोलिसांची टोळी शेतकऱ्यांना धमकावत फिरू लागली आहे .मावेजा न देता कंपन्यांची लोक हैदोस घालू लागली. शेतकऱ्यांना विमानतळाचं पडलेलं नाही. ते झालं काय नाही झालं काय जीवनात फरक पडणार नाही. मात्र अर्धी भाकर देणारी काळ्या आईचा घास घेण्यास पवन ऊर्जा कंपन्यांची गिधाड आतुर झाली आहेत. त्याचं काय?
संदीप क्षीरसागरांची स्थिती देखील बजरंग सोनवणे पेक्षा वेगळी नाही. जनतेला आता त्यांच्याही रूपाने पश्चातापाची वेळ आली आहे. योगेश क्षीरसागर यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. संदीप क्षीरसागर यांच्यावर विश्वास दाखवून पुन्हा निवडून दिलं. तिथंच शेतकरी मतदारांचं चुकलं का? असा प्रश्न संदीप क्षीरसागरांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे विचारला जाऊ लागला आहे. किमान योगेश क्षीरसागर निवडून आले असते तर शेतकऱ्यांचा मुद्दा तरी विधानसभेत उपस्थित केला असता. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केलं असतं असा आता बालाघाटावर सूर आळवला जाऊ लागला आहे.
पवन ऊर्जा कंपन्यांच्या नंगा नाचाला कंटाळून शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल डिझेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शेतकरी ठाण्यात नेऊन डांबून ठेवला सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी एकट्यानेच या प्रश्न आवाज उठवला. त्याला प्रसार माध्यमांनी साथ दिली. माध्यमांनी ओरड करून देखील या दोन्ही लोकप्रतिनिधी पर्यंत आवाज पोहोचला नाही. किंवा पोहोचला असला तर त्यांना शेतकऱ्यांचं काहीही देणं घेणं नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनासह पोलिस यंत्रणा पवन ऊर्जा सौर ऊर्जा कंपन्यांचे दलाल म्हणून लोकशाहीला काळीमा फासू लागले आहेत .एवढं सगळं घडत असताना बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर हे धृतराष्ट्राची भूमिका घेऊन गप्प बसलेले आहेत. विधानसभेत लोकसभेत या प्रश्नी आवाज उठवलाच असता तर किमान जनतेला या लोकप्रतिनिधींचा अभिमान वाटला असता. पण हे घडलं नाही. विशेष म्हणजे एकीकडे राज्यात भाजप व त्याच्या मित्र पक्षांना जनतेने साथ दिली. त्यावेळी बालाघाटावरची जनता बजरंग सोनवणे व संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिली. हीच बाब शेतकऱ्यांना आता पश्चातापाची वेळ आणू लागली आहे.
दुधीण बाय पसारली अन् मागचा सगळा ईसरली“ही म्हण प्रत्यक्षात उतरली.दुधी भोपळ्याचा वेल एखाद्या मेढीवरून किंवा छोट्या खांबोळी वरून छपरावर चढवला जातो. छपरावर चढवला की हा वेल छान पसरतो. त्याला भरपूर फुले आणि भोपळे धरतात. पण तो ज्या मेढीवरून किंवा खांबोळीवरून वर गेलेला असतो तिकडे मात्र तो एकदम रोडावलेला मरतुकडा राहतो. तिथे ना पान ना फुल ना भोपळा. आपल्या नेहमीच्या वर जाऊन पसरलेल्या दुधी भोपळ्याच्या वेला सारखी परिस्थिती या दोन्ही लोकप्रतिनिधींची झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles